कशासाठी जगायचं
हे ग्रंथच शिकवतात : कविवर्य ना.धों.महानोर
जळगाव,
दि.27- पोटापाण्याचा उद्योग
म्हणून घेतलं जाणारं शिक्षण हे आणि त्यानिमित्तानं होणारं वाचन हे जगण्यासाठी
आवश्यक आहेच. पण जगण्याचं भान येण्यासाठी अधिकाधिक वाचन केलं पाहिजे आणि
म्हणूनच कशासाठी जगायचं हे शिकवण्याचं काम
फक्त ग्रंथच करतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समितीचे अध्यक्ष
पद्मश्री कविवर्य ना. धों महानोर यांनी आज केले.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथोत्सव-2013- 14 रविवार दि.26 जानेवारी ते मंगळवार दि.28
जानेवारी 2013 या कालावधीत सरस्वती सभागृह (लेवा बोर्डीग हॉल ) जळगाव येथे संपन्न होत
आहे. या सोहळ्याच्या दुस-या दिवसाच्या द्वितीय सत्रात श्री. महानोर “ग्रंथचळवळ आणि महाराष्ट्र”, या विषयावर उपस्थित रसिक
वाचकांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. एस.एस. राणे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. महानोर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी स्व.
यशवंतराव चव्हाणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी साहित्य संस्कृती
मंडळाची स्थापना करुन महान लेखकांची साहित्य संपदा संपादित करुन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी
ग्रंथ प्रकाशित केले ते स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करुन दिले. माझ्या घरातील पुस्तकांचा कोनाडा हाच माझा देव्हारा
असे यशवंतराव म्हणत, अशी आठवण सांगून ते म्हणाले की, आज आपल्यापैकी किती जण ग्रंथ खरेदी
करतो आणि ते वाचतो? असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात महाराज
सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या प्रांतात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या फिरते
वाचनालय, ग्रंथालये या उपाययोजनांची माहितीही त्यांनी सांगितली. ते पुढ़े म्हणाले की, महाराष्ट्रात नवसाहित्यिकांचे साहित्य प्रकाशित
करण्यासाठी अनुदान योजनाही आहे. वाचनाची गोडी
लागावी यासाठी शालेय पाठ्यक्रमात स्वाध्याय दिलेले असतात . त्यानुसार वाचन करण्याचे
मार्गदर्शन शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ योग्य वयात शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे
वाचनाची गोडी लागून अनेक जण पुढे आयुष्यात खूप मोठे झाले. म्हणूनच परिपूर्ण पुरुषोत्तम
होण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानाच्या प्रारंभी श्री. महानोर यांचा जिल्हा माहिती अधिकार मिलिंद
दुसाने यांनी पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह
देऊन सन्मान केला. सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद दुसाने
यांनी केले. या ग्रंथोत्सवास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यानिमित्त आयोजित विविध
कार्यक्रमांनाही जळगाव शहरातील रसिकांची चांगली गर्दी लाभत आहे.
No comments:
Post a Comment