जळगांव, दि. 24 :- जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणी पुरवठा
करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात
आलेला आहे. सदर निधीतून प्रशासन 10 टॅकरची खरेदी करणार असून त्यापैकी 3 टॅकर
प्रशासनाकडे आलेले आहेत. या टँकरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर
यांचे हस्ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत,
नायब तहसिलदार अश्वीनकुमार पोतदार, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, सार्वजनिक
बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता बोरोले आदि उपस्थित होते.
जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ पाणीपुरवठा करता यावा यासाठी
जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री ना. देवकर व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
यांनी शासकीय टँकरची खरेदी करुन टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी 1 कोटी 50
लाखाच्या खर्चास मंजुरी दिली. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग 10 टँकरची खरेदी
करणार आहे. त्यातील तीन टँकर आज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ज्या गावांना
पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी तात्काळ पाणी पुरवठा केला जाणार आहे. टँकरची पाणी
साठवण क्षमता 10 हजार लिटर इतकी आहे उर्वरित सात टँकर ही लवकरच प्राप्त होणार
आहेत.
No comments:
Post a Comment