जळगांव, दि. 10 :- जळगांव शहराला पाणी
पुरवठा करणा-या वाघूर धरणाच्या मृत साठयातून अतिरिक्त पाणी उचलण्यासाठी सुमारे 2
कोटी रुपये खर्चाची डाऊन स्क्रीम योजना मंजूर होऊन दोन महिन्याच्या कालावधीत योजनेचे
काम पूर्ण करण्यांत आले. सदर योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
यांचे हस्ते कळ दाबून आज सायंकाळी करण्यात आला.
यावेळी महापालिकेचे पाणी पुरवठा सभापती नितीन
बरडे, कार्यकारी अभियंता अ. वा. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी
अभियंता आर. सी. जैन, एस. एम. पाटील, एस. एल. पाटील, एस. व्ही. महाजन, ठेकेदार पी.
एल. आडके आदि अधिकारी / पदाधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर म्हणाले,
डाऊन स्क्रीम योजनेसाठी 2 कोटी 1 लाख रुपये खर्च करण्यात आले असून राज्य शासनाने 1
कोटी 36 लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित 65 लाख रुपये महापालिकेने खर्च केलेले
आहेत. त्यामुळे सदर योजना कार्यान्वित झाल्याने जळगांव शहराला ऑगस्ट 2013 अखेर
पर्यंत पाणी पुरवठा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाघुर धरणात मृत साठयाच्या वर 0.30 मीटर म्हणजेच 85 दशलक्ष घन फुट पाण्याची
आज उपलब्धता आहे. व हे पाणी मे 2013 अखेर पर्यत जळगांवकरांना पुरेल. त्यानंतर
मात्र मृत साठयातून अतिरिक्त् पाणी डाऊन स्क्रीम व्दारे उचलले जाऊन ते ऑगस्ट अखेर
पर्यंत पुरवठा करता येईल अशी माहिती अभियंता अ. वा. जाधव यांनी दिली.
डाऊन स्क्रीम योजनेसाठी धरणाच्या सांडव्यातून 1168 एम . एम. ची पाईप लाईन
जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला जोडण्यात आलेली आहे. सांडव्यातून पाणी
उचलण्यासाठी प्रत्येकी 100 एच पी चे चार पंप लावण्यात आलेले आहे. या पंपाव्दारे
पाणी उपसा करुन मुख्य पाईपलाईन मध्ये
सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जळगांव शहराला सध्याच्या टंचाईच्या काळात तसेच
भविष्य काळातही डाऊन स्क्रीमसारखी पर्यायी
पाणी पुरवठा योजना उपलब्ध झाल्याने पाणी टंचाई भासणार नसल्याचे अभियंत्यांकडून
सांगण्यात येत आहे.
डाऊन
स्क्रीम योजनेची चाचणी यशस्वी होऊन आज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर यांनी कळ दाबून योजना कार्यान्वीत केली सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी
महापालिका, जिल्हा प्रशासन पीडब्लूडी व एमजीपी यांनी मागील दोन महिन्यापासून
परिश्रम घेतले. सदर विभागाच्या संयुक्तीक प्रयत्नांतून आज डाऊन स्क्रीम
कार्यान्वीत झाली. या सर्व विभागातील अधिका-यांचे व ठेकेदारांचे जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment