Wednesday, 1 May 2013

पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्राधान्य देणे आवश्यक : पालकमंत्री गुलाबराव देवकर



 पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्राधान्य देणे आवश्यक
: पालकमंत्री गुलाबराव देवकर

             जळगाव, दिनांक 1 - राज्यात सर्वत्र पाणी  टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली असून शासन टंचाई निवारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. परंतू भविष्य काळात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
           महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभप्रसंगी श्री. देवकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले, पोलीस अधिक्षक एस. जयकुमार, अपर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गप्फार मलीक, मनसेचे येथील जमील देशपांडे, शासकीय अधिकारी , कर्मचारी, स्वातंत्र्य  सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदि उपस्थित होते.
           श्री. देवकर म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आपल्या गावात / परिसरात जलपुर्नभरण, जलसंधारण आदि कामे हाती घेऊन पाणी अडवून ते जमीनीत जिरविले पाहीजे , भू-जल पातळी दिवसेंदिवस खोल जात असून त्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकेल. त्याकरिता पाणी  अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी  तलावातील गाळ काढणे व जलपूर्नभरणाची कामे   शासनाने हाती घेतली आहेत असेही त्यांनी सांगितले.
           महिला अत्याचार प्रकरणात प्रशासनाने अधिक जागृत राहून प्रतिबंधासाठी उपाय योजले पाहिजेत तसेच सामाजिक संस्था / कार्यकर्ते यांनी ही महिलांवर अत्याचार होऊ नयेत याकरिता अधिक दक्षता ठेवून काम करण्याचे आवाहन  ना. देवकर यांनी केले.
          यावेळी पालकमंत्री देवकर यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल अपर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी व पोलीस कॉ.  जीवन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर आदर्श तलाठी पुरस्कार सुरेश एकनाथ सूर्यवंशी (न्हावी ता. यावल) यांना पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला तर जिल्हा क्रीडा पुरस्कार शेख वाहिद जमानुद्दीन शेख ( खो – खो) , श्रृती जगताप ( तलवार बाजी), नितीन बरडे ( कबड्डी मार्गदर्शक) व प्रदीप तळवेलकर ( क्रीडा संघटक) यांना प्रदान करण्यात आले. या सर्वांनी क्रीडा पुरस्कारासोबत मिळालेली रोख रक्कम दुष्काळ निधीसाठी पालकमंत्री देवकर व  जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे सूपूर्द केली.
        प्रांरभी पालकमंत्री देवकर यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.      ना. देवकर यांनी परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे समवेत परेडचे निरीक्षण केले. या कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी , पदाधिकारी यांची पालकमंत्री  देवकर यांनी भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
         कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार अनिल पाटील व प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ
            दि. 1 एप्रिल 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यात सर्वत्र्‍ सुरु झालेला असून जळगांव जिल्हयात सदर कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी हिरवी झेंडी दाखवून आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले.
             या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील 8 ते 18 वयोगटातील सुमारे 16 लाख लाभार्थी व विदयार्थ्याना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या कार्यक्रमात 39 पथके असून ही पथके जिल्हयात सर्वत्र लाभार्थ्याना आरोग्य सेवा देतील.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment