जळगांव, दि. 14 :- अस्वच्छ पाण्याच्या एका थेंबामुळे सर्व पाणी दूषित होऊ शकते त्यामुळे जलपुर्नभरणाचा वापर करत असताना दूषित पाण्याचा एक थेंब ही जमिनीत जाऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले.
जळगांव महानगर पालिकेच्यावतीने कांताई
सभागृहात आयोजित दि. 14 ते 15 मे 2013 या दोन दिवसीय पाणी परिषदेच्या उदघाटन
सोहळयात राजेंद्रसिंह मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार ईश्वरलाल जैन, खा.
हरिभाऊ जावळे, महापौर किशोर पाटील, जलतज्ञ संध्याताई एदलाबादकर, जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, रमेश जैन आदि मान्यवर
व्यासपीठावर उपस्थित होते.
राजेंद्रसिंह म्हणाले जमीनीची
अंतर्गत रचना फारच संवेदनशील असल्याने जलपुर्नभरणाच्या वेळी दूषित पाण्याचा एक
थेंब ही सर्व पाणी दूषित बनवू शकतो. त्यामुळे जलपुर्नभरण करताना काळजी घेणे आवश्यक
असून जास्त खोलीवर जलपुर्नभरण करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्रयानंतर देशातील लहान लहान
नदया नाहीसा होऊन काही मोठया नदया नाल्याप्रमाणे बनल्या आहेत. त्यामुळे देशासमोर
दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. तसेच
जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जमीनीत जिरवला पाहीजे याकरिता राजकीय नेतृत्वाने
पुढाकार घेतला पाहीजे असे त्यांनी म्हटले.
तसेच भविष्य काळात दुष्काळाची
परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्या परिसरातील सर्व नदयांचा प्रवाह जीवंत ठेवण्याबरोबरच
प्रवाह वाढविले पाहिजेत असे राजेंद्रसिह यांनी स्पष्ट करुन जळगांव जिल्हयात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदया व तलावाच्या
पुर्नजीवनाची काम झाली पाहीजेत असे त्यांनी सांगितले. जळगांव महानगरपालिकेने
जलनिती धोरणाचा अवलंब करावा. रुफ वॉटर हॉर्वेस्टींग, पावसाच्या पाण्याचा स्थानिक
स्तरावर वापर, पाणी वापराची मार्गदर्शक तत्वे व पाणी वापर कृति समिती आदिचे पालन
जलधोरणात केल्यास जळगांव शहराला भविष्यकाळात पाण्याची समस्या भेडसावणार नाही असे
त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेने आपल्या भागातील सर्व तलावांची माहिती घ्यावी व
ते पुर्नजीवीत करण्याचे आवाहन राजेंद्रसिंह यांनी केले. हे सर्व करत असतांना
जळगांव शहरातील नागरिकांना माहिती देऊन यात त्यांचा सहभाग घेण्याची सूचना त्यांनी
केली.
पाणी मर्यादित असून वापर अमर्याद
असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा तसेच प्रत्येक गाव व शहरांने
पाणी वाटपाचे अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
यांनी केली. तर भविष्यकाळात पाणी प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी पाण्याचा
वापर जपून करण्याचे आवाहन खा. ईश्वरलाल जैन यांनी अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी
खासदार हरिभाऊ जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांची ही भाषणे झाली.
प्रारंभी जलतज्ञ राजेंद्रसिंह व
मान्यावरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जलनुर्पभरण करुन दोन दिवसीय पाणी
परिषदेचे उदघाटन करण्यात आले. महापौर किशोर पाटील यांनी जळगांवला ` जल `गांव
बनविण्याचा संदेश व पाणी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश प्रास्ताविकातून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा शर्मा यांनी केले तर
महापालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment