जळगांव , दिनांक 15 :-
कवि संमेलनातून वाचन चळवळीला बळ दिले जात आहे.
अशा संमेलनातून शब्दांचा जागर निर्माण करुन वाचन संस्कृतीचे जतन केले जात
असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवि अशोक सोनवणे यांनी केले. ते ग्रंथोत्सवात आयोजित
कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांचा समारोप
कवी संमेलनाने झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे, कवि सर्वश्री प्रभाकर महाजन, अशोक जोशी, अशोक
सोनवणे, किसन पाटील, शशिकांत हिंगोणेकर,
महेंद्र पाटील, गो.शि. म्हसकर, नामदेव कोळी, अशोक कोतवाल, सुभाष कुळकर्णी, प्रफुल्ल
पाटील, भाग्यश्री देवरे, विजय लुल्हे, शशिकांत चौधरी, श्रीकांत निकुंभ, सुरेश
चौधरी, रा.ना. कापुरे, निकीता पाटील, आदी
उपस्थित होते.
यावेळी दुष्काळ, कुपोषण, पाऊस, मातृत्व,
स्त्रीत्व आदि विषयांवर कवितांचे सादरीकरण करण्यात आले. कवि गो.शी. म्हसकर यांनी “पाणी गळून गेलं ” या कवितेच्या माध्यमातून दुष्काळाचे भयाण वास्तव
मांडले तर नामदेव कोळी यांनी काबाडकष्ट करणाऱ्या निरक्षर मायबापांची ओढ “हिशोब” कवितेतून चित्रीत केली.
ज्येष्ठ कवि प्रभाकर महाजन यांनी “माय” या कवितेतून श्रम करणाऱ्या आईची व्यथा मांडली तर “घास” कवितेतून जीवनभर आपल्या शेतावर श्रम करणाऱ्या
शेतकऱ्यांचा “घास” कसा
पळविला जातो व तो कशाप्रकारे सावकारी पाशात अडकला जातो याचे विदारक चित्रीकरण
करण्यात आले आहे. तर कवि हिंगोणेकर यांनी “रुतून
काळीज” मधून माणसाची
दिवसभराच्या कष्टातून, ताणतणावातून होणारी मनातील घुसमट सांगितली आहे.
“मन” कवितेतून अशोक जोशी यांनी मनाचं प्रकार कथन केले
असून सुरेश यशवंत यांनी “ओंजळ भर फलं” कवितेतून पावसाचं वर्णन केले आहे. कवि अशोक
कोतवाल यांनी कुपोषणावर तावातावाने बोलणाऱ्या फॅशनेबल स्त्रीचं उपाहासात्मक वर्णन
करुन समाजाच्या दांभिकेतेवर “बोलू द्यावं कुणाला
कशावर ही” या कवितेतून जबरदस्त
प्रहार केला आहे.
किसन पाटील यांनी “कोरडं आभाळ”
मधून
दुष्काळी परिस्थिती व त्यामुळे निर्माण झालेली हलाखीचे वर्णन केले तर गोधडी या
दीर्घ कवितेच्या सादरीकरणातून कवि अशोक सोनवणे यांनी “गोधडी” व आजच्या चादरीतील
फरकांचे वर्णन अत्यंत भावनिक पध्दतीने केले आहे. यातून त्यांनी आईने माया, प्रेम,
श्रम व आपुलकीतून विणलेली गोधडी व आजच्या ममीने विकत आणलेले चादर यातून आईच्या
मातृत्वातील फरक दाखवून दिला आहे.
यावेळी महेंद्र पाटील, भाग्यश्री
देवरे, प्रफुल्ल पाटील, सुभाष कुळकर्णी , निकिता पाटील आदिनी आपल्या कवितांचे
सादरीकरण केले. सदर कार्यक्रमातील कविंना रसिकांनी भरभरुन दाद दिली.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवि किसन
पाटील, विनोद ढगे यांनी केले तर आभार सुनिल सोनटक्के यांनी मानले.
No comments:
Post a Comment