Thursday, 28 February 2013

महालोकअदालतीत निघणार हजारो खटले निकाली जिल्हयात 03 मार्च ला महालोक अदालत



 जळगांव, दि. 28 :-  जिल्हयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जळगांव यांचे संयुक्त विदयमाने एकाच वेळी एकाच दिवशी 3 मार्चला या वर्षातील पहिली महालोकअदालत होत आहे. जळगांव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात सकाळी    10.00  वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश कु. आय.के जैन यांचे अध्यक्षतेखाली महालोकअदालतीस प्रारंभ होईल.
            लोकअदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी प्रकरणे तसेच सेंट्रल बॅक ऑफ इडिया, स्टेट बॅक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लि. आयडीया सेल्युलर इ. चे खटलापुर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायदयाने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
        महानगरपालिकेकडुन निवासी व खाजगी अनिवासी गाळेधारकांनी दाखल केलेल्या अपीलांमध्ये एकुण कराच्या मागणी रकमेत बिलातील अनु. क्रं. 2 पाणीपट्टीची रक्कम सोडुन इतर सर्व कराच्या रकमेवर म्यु. अपील दाखल झाल्यापासुन चालु आर्थिक वर्षापर्यंत सरसकट 20 टक्के व महानगरपालिका मालकीच्या अनिवासी गाळयांसाठी वरील पध्दतीप्रमाणे सरसकट 45 टक्के सुट देण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
       अनेक बॅका व पतसंस्था यांनी फक्त चेकची रक्कम अदा केल्यास तडजोडीची तयारी दर्शविलेली आहे आणि व्याज, दंडव्याज वकिल फी. माफ करण्याची तयारी दर्शवुन तडजोड करण्यांस तयार असल्याबाबतचे जाहीर केले आहे.
    ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबधीत सर्व पक्षकार व त्यांचे वकिल यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनासुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त खटले निकाली काढुन त्याच दिवशी त्वरीत निकाल घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांवचे सचिव श्री एम.आर. पुरवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

* * * * * * *

Wednesday, 20 February 2013

जळगांवकरांना मुक्ताई सरस व खान्देश महोत्सवातून मिळणार सांस्कृतिक मेजवाणी -शीतल उगले

           जळगांव, दि. 20 :- जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 25 फेब्रुवारी 2013 या कालावधीत सागर पार्क येथे मुक्ताई सरस व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या महोत्सवांतून जळगांवकरांना महिला बचत गटांची विविध उत्पादने, खादय संस्कृति स्टॉल तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले यांनी दिली.
            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रम मुक्ताई सरस 2012 -13 होणार आहे. सदर कार्यक्रमात जळगांव जिल्हयातील तसेच इतर जिल्हयातून सुमारे 200 बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे स्टॉल येणार आहेत. यापैकी 40 स्टॉल हे खान्देशी खादय संस्कृतिबाबत असल्याची माहिती श्रीमती उगले यांनी दिली. मुक्ताई सरस प्रदर्शनातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना  हक्कांची बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
             खान्देश सांस्कृतिक महोत्सवात दिनांक 21 ते 25 फेब्रुवारी 2013  सायंकाळी 6 ते रात्री 9-30 वाजे पर्यत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये पोवाडा, बंजारा नृत्य, कथ्यक, लोकगीत, समूह नृत्य, लोकनाटय, लावणी, भावगीत, मिमिक्री  विडंबन नाटय, भारुड, नाटक नृत्य नाटिका आदि कार्यकम आहेत.
           मुक्ताई सरसचे उदघान दिनांक 22 फेब्रुवारी 2013 रोजी सायंकाळी 5 वाजता ना. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
           सदरचे प्रदर्शन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदरच्या महोत्सवास भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर  व मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी केले आहे.
* * * * * *

Tuesday, 19 February 2013

माहिती अधिकाराचे कामकाज करित असतांना मानसिकता बदलणे आवश्यक : माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड



चाळीसगांव दि.19:-  शासकीय अधिकारी कर्मचा-यावर लोकसेवक म्हणुन महत्वपुर्ण जबाबदारी आहे त्यामुळे माहितीचा अधिकार बाबतचे कामकाज करित असतांना त्यांच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत केले. 
आज तहसिल कार्यालयात आयोजित माहिती अधिकार अधिनियम 2005 या विषयावर मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार शशिकांत हदगल, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड उपस्थित होते. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, जनता ही विविध प्रकारच्या कराच्या रुपातुन शासनाच्या तिजोरीत रक्कम जमा करत असते आणि त्याचे विनीयोजन करतांना आपले उत्तरदायीत्व बनते की जनतेला अपेक्षीत असलेली माहिती त्यांना वेळेवर उपलब्ध करुन देणे. त्याच बरोबर जनतेनेही मोजकी गरजेची माहिती मागावी त्यामुळे शासकीय कामाचा अपव्यय टाळता येईल. माहिती अधिकाराचे राज्य स्तरावरुन संगणकीकरण करण्यात येत असुन प्रत्येक विभागाने आपले स्वतंत्र संकेतस्थळे सुरु करावी त्यावर माहिती अधिकाराचे सेक्शन 4-1-ब नुसार जनतेला अपेक्षीत असलेली माहिती प्रसिध्द् केल्यास याचा नक्कीच फायदा होईल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे जनप्रबोधन होण्याकरिता यशदा प्रमाणेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत जनतेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गांच्या समस्या जाणुन त्यावरील उपाययोजना त्यांनी सांगितल्या.
            यावेळी उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी माहितीचा अधिकार कायदा अत्यंत चांगला असुन तो चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी पाचोरा विभागांतर्गत येणा-या महसुल यंत्रणेची स्वतंत्र संकेतस्थळ लवकरच सुरु करण्यात येणार असुन माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयीची संपुर्ण माहिती संकेतस्थळावरुन प्रसिध्द् करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या. या बैठकीचे सुत्रसंचलन आभार तहसिलदार शशिकांत हदगल यांनी मानले.
माहिती आयुक्तांची मेहुणबा-याला भेट
दरम्यान माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मेहुणबारे येथील स्व.दिवान चव्हाण रोपवाटीकेला भेट देऊन स्व.दिवान मास्तर बालोद्यान कोनशिलेचे अनावरण केले. प्रसंगी त्यांच्या पुर्वजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमंत्रीत जेष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्याचबरोबर मेहुणबारे येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची विचारपुस त्यांना देण्यात येणा-या आहाराविषयीची माहिती घेऊन अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणा-या दशपदी, कुपोषण मुक्ती, पोषण आहार विद्यार्थ्यांची उपस्थिती या विषयीची सर्व माहिती जाणुन घेतली.
* * * * * * *

Saturday, 16 February 2013

केळी पिकाला वर्षभर पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार - कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर

           जळगांव, दि. 16 – जिल्हयात बेमौसमी पाऊस व गारपीठ मुळे केळी फळ पिकाचे फार मोठे नुकासान झालेले आहे. त्यामुळे केळी पिकाला वर्षभर पिक विमा योजनेचे संरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
               रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करत असतांना उपस्थित शेतक-यांशी ना. देवकर चर्चा करत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार अरुण पाटील, रावेर पंचायत समिती उपसभापती श्रीमती विजया पाटील, तहसिलदार बबनराव काकडे, गट विकास अधिकारी श्री. भावसार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, तालुका  कृषि अधिकारी विजय भारंबे आदिसह नुकसानग्रस्त शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
              ना. देवकर पुढे म्हणाले हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत मागील वर्षापासून केळी फळ पिकाचा समावेश झालेला आहे. परंतू यामध्ये 8 डिग्री पेक्षा कमी तापमान,   वा-याचा वेग 40 किलोमीटर प्रतितास अशा निकषाप्रमाणे विमा सरंक्षण दिले जाते. परंतू यामध्ये गारपीट, अधिक तापमान, वादळ , अति थंडी अशा निकषांचा समावेश करुन केळीला जास्तीत जास्त विमा सरंक्षण लाभावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रावेर व यावल तालुक्यात गारपीटीमुळे झालेले केळी पिकांच्या नुकसानीसाठी शेतक-यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी म्हणून मंत्रालयात होणा-या  मदत व पुर्नवसनाच्या तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून पाठपुरावा केला जाईल,असे त्यांनी सांगितले.
               विमा कंपनीकडून गारपीटीमुळे केळीचे नुकसान झालेल्या शेतक-यांना जास्तीची भरपाई मिळावी म्हणून विमा कंपनीच्या अधिका-यांशी मुंबई येथे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केळीच्या वर्षभर पिक विम्याचे संरक्षण मिळाल्यास शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अधिक मदत मिळेल असे ना. देवकर यांनी सांगितले.
               जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत व सदरच्या पंचनाम्यांतून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश  ना. देवकर  यांनी दिले. तसेच केळी पिकाला वर्षभर विमा संरक्षण मिळावे व सदयस्थितीत झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत मदतीचे प्रस्ताव  तात्काळ तयार करुन प्रशासनाने शासनाकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले.
                दुष्काळी गावांच्या पुर्नगठनाबाबतच्या शासन निर्णयातील तरतूदी गारपीट मुळे नुकसान झालेल्या गावांना लागू कराव्यात म्हणून शासनाकडे प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये शेतक-यांना वीज बिलात सवलत व विविध सहकारी बॅका / संस्थांकडून घेतलेल्या व थकित असलेल्या कर्जाचे पुर्नगठन व्हावे आदि बाबींचा समावेश  असल्याचे त्यांनी सांगितले.
              जिल्हयात मागील तीन – चार दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, हरभरा व गहू पिकांचे अधिक नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली . जिल्हयात सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून यात रावेर तालुक्यातील शेतक-यांचे अधिक नुकसान झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.
                ना. देवकर यांनी रावेर तालुक्यातील कोचूर, चिनावल, वाघोदा बु. विवरे बु., खिर्डी व निंभोरा  तसेच यावल तालुक्यातील बामणोद, न्हावी, आमोदे, खिरोदा आदि गावातील शेती पिकांच्या नुकसानीची पहाणी करुन उपस्थित शेतक-यांशी संवाद साधून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मागण्या
                    केळी पिकाला वर्षभर पिक संरक्षण मिळावे त्याकरिता फळ पिक  विमा योजनेत गारपीट, अति थंडी ,अधिक तापमान आदि निकषांचा समावेश करावा,  फळपिक विमा योजनेतून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी  सर्व केळी उत्पादक शेतकरी फळ पिक विमा योजनेचा हप्ता प्रति हेक्टरी 6 हजारावरुन 12 हजारापर्यत भरण्यास तयार आहेत, सहकारी बॅकांच्या कर्जाचे पुर्नगठन व्हावे व दंड व्याज आकारले जाऊ नये,  केळी, गहू, हरभरा, मका, कांदा आदि पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असून जास्तीत जास्त भरपाई देण्याची मागणी, वीज बिलात सवलत मिळावी सदरच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करुन शासनाकडून तात्काळ मदत मिळावी  आदि.

* * * * * * *

Thursday, 14 February 2013

राज्य माहिती आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



           जळगांव, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड, यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 8-00 वाजता धुळे येथुन शासकीय वाहनाने चाळीसगांव जिल्हा जळगांवकडे प्रयाण, सकाळी 10-00 वाजता माहिती अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बी. डी. ओ. पंचायत समिती, तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे चर्चा, दुपारी 2-00 वाजता चाळीसगांव येथुन शासकीय वाहनाने जळगांवकडे प्रयाण, दुपारी 3-00 वाजता अजिंठा विश्रामगृह जळगांव येथे आगमन व राखीव, दुपारी 4-00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी समाजातील उपेक्षित वर्ग आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर जिल्हाधिकारी जळगांव यांचे कार्यालयात आढावा बैठक, संध्याकाळी 7-00 वाजता जळगांव येथुन शासकीय वाहनाने नाशिककडे प्रयाण

Wednesday, 13 February 2013

जलसंधारणाच्या कामांचा निधी योग्य पध्दतीने खर्च करावा - जिल्हाधिकारी

        जळगांव, दि. 13 :- महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान सन 2012-2013 अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी संबंधीत यंत्रणांना वाटप करण्यात आलेला निधी योग्य पध्दतीने व मंजूर केलेल्या कामांवरच खर्च करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
          महात्मा फुले जल व भूमी  संधारण अभियान अंतर्गत जिल्हा अभियान समितीच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, वरिष्ठ भू -वैज्ञानिक ए. आर. वाघमारे, जळगांव उपवनसंरक्षक सुरेंद्र चोपडे, यावल उप वनसंरक्षक श्री. राहुरकर, एनजीओचे प्रतिनिधी डॉ. रंजना बोरसे, डॉ. हेमंत पाटील आदि उपस्थित होते.
          सदरच्या निधीचा वापर कोल्हापूर बंधा-याची दुरुस्ती करणे, गेट टाकणे, पाझर तलावाची दुरुस्ती करणे आदि कामासाठी वापरण्यात यावा. तसेच सदरची कामे करत असतांना संबंधीत गावांमधील लोकांचा सहभाग घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली. तर तलावातील काढलेला गाळ शेतक-यांच्या शेतावर पोहोचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
           या अभियानातंर्गत यापूर्वी जळगांव जिल्हाला 7 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून त्याअंतर्गत कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,  दुरुस्ती व गेट बसविणे आदिची 3 कोटी 24 लाख 13 हजार 807 रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी दिली. तसेच सदयस्थितीत जिल्हयातील  जळगांव, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगांव, चाळीसगांव व जामनेर तालुक्यांतील जलसंधारणाच्या कामांसाठी 2 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची त्यांनी सांगितले.
           यावेळी अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधी जलसंधारणाच्या कामांबाबत सूचना मांडल्या. यामध्ये सिमेंट बंधा-याची कामे, तलावातील गाळ काढण्यासाठी तसेच खोलीकरणासाठी पोकलेनच्या  वापरास परवानगी आदिचा समावेश आहे. जिल्हयातील जलसंधारणात काम करणा-या एनजीओंनी सदरची कामे करत असतांना लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले

Thursday, 7 February 2013

ना. देवकर यांच्या हस्ते उदया बाल महोत्सव 2013 चे उदघाटन



           जळगांव, दि. 7 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांचे वतीने बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय / स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ , निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले यांचेसाठी चाचा नेहरु बालमहोत्सव – 2013  दि. 8 फेब्रुवारी 2013 ते 10  फेब्रुवारी  2013 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल, जळगांव येथे जिल्हा स्तरावर घेण्यात येणार आहे त्यात विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, इ. घेण्यात येणार आहेत, सदर महोत्सवाचे उदघाटन समारंभ दि 8 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल, जळगांव येथे मा.ना. गुलाबराव देवकर, पालकमंत्री, जळगांव यांचे हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.        

निवृत्ती वेतनधारकांनी बचतीचा तपशील सादर करावा



           जळगांव,दि. 7 :-  जळगांव कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणा-या व आयकरास पात्र असलेल्या राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना सुचित करण्यात येते की, सन 2012-13 या वित्तीय वर्षात आपण आयकर भरणा करण्यास पात्र असल्यास त्या बाबतीत चालू आर्थिक वर्षात केलेल्या बचतीचा तपशिल झेरॉक्स प्रतिसह तसेच आपले पॅन कार्डच्या छायांकित प्रतिसह अर्ज या कार्यालयास कार्यालयीन वेळेत दि. 11 फेब्रुवारी 2013 पर्यत सादर करावे त्यांनतर मुदतीत तपशिल प्रदान न झाल्यास माहे फेब्रुवारी 2013 ची निवृत्ती वेतनातुन अनुज्ञेय असणारा आयकराची कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जळगांव यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे. 

लोकांनी वेळेवर वीज बिले भरण्याची मानसिकता ठेवावी --पालकमंत्री ना. देवकर



         जळगांव, दि. 7 :- थकित वीजबिला अभावी वीज कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही याकरिता लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल करुन वेळेवर वीज बिले भरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
      क्रॉम्प्टन ग्रीव्हज व नांद्रा बु. ग्रामस्थ यांचे समवेत आज सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत ना. देवकर मार्गदर्शन करत होते. यावेळी  क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या वाणिज्य प्रमुख श्रीमती वंदना यरमाळकर, ग्रामीण भागाचे प्रमुख यु.डी. चौधरी , विदयुत अभियंता संदीप वराडे आदिसह नांद्रा ग्रामस्थ उपस्थित होते.
      ना. देवकर म्हणाले क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने नांद्रा गावाला योग्य दाबाने व सुरळितपणे वीज पुरवठा व्हावा म्हणून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बसविण्याची कार्यवाही करावी तसेच गावांमध्ये अनाधिकृत वीज कनेक्शन असणा-या लोकांवर कारवाई करुन त्यांना तात्काळ विहित पध्दतीचा अवलंब करुन नवीन वीज कनेक्शन दयावे असे त्यांनी सांगितले.
       नांद्रा बु. मधील सर्व वीज ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकित वीज बिलाची रक्कम तात्काळ भरण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच लोकांनी जी सेवा वापरली आहे. त्यासंबंधीचे शुल्क सदरच्या कंपनीला अदा करणे आवश्यक असून त्याबाबत लोकांनी मानसिकतेत बदल करुन चांगली सेवा मिळण्यासाठी वेळेवर वीज बिले भरावी असे त्यांनी सांगितले
              नांद्रा बु. गावांमध्ये  क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी मार्फत दोन दिवसाच्या शिबीराचे आयोजन केले जाऊन त्यामध्ये गावांमधील अनाधिकृत वीज जोडण्या असलेल्या लोकांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच त्यांना तेथेच नवीन कनेक्शन दिले जाईल अशी माहिती श्रीमती यरमाळकर यांनी दिली. तसेच सदरच्या लोकांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करुन थकित वीज बिले भरणे, वीज कनेक्शन घेणे आदि साठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.              

ॲप्रेन्टीसशिपसाठी 21 फेब्रुवारी रोजी भरती



        जळगांव, दि. 7 :- शिकाऊ  उमेदवारी योजना 1961 अंतर्गत फेब्रुवारी – 2013 सत्रात 8 वी, 10 वी, व 12 वी सायन्स उत्तीर्ण उमेदवारांसाठी फ्रेशर ॲप्रेन्टीसशिपसाठी दिनांक 21 फेब्रुवारी  2013  रोजी भरती मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे (मेस हॉलमध्ये ) 11.00 वाजता आयोजित केला आहे. तरी जे उमेदवार ॲप्रेन्टीसशिप करण्यासाठी इच्छूक असतील त्यांनी स्वखर्चाने वरील ठिकाणी हजर रहावे व संधीचा लाभ घ्यावा. असे अशंकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी कळविले आहे.

सैन्य दलात अधिकारी पदांची सुवर्णसंधी



         जळगांव, दि. 7 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिका-यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्री व्दारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवकतींना सशत्र सैन्यदलाकडून एस.एस.बी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना SSB मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्येकी 10 दिवसाचे दोन प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी दिनांक 21 फेब्रुवारी 2013 ते 2 मार्च 2013 (एकूण 10 दिवस) आणि दिनांक 12 मार्च 2013 ते 21 मार्च 2013 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी  प्रती दिवस रु. 50/- प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.  
             इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणेसाठी दिनांक 14 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगांव येथे खालील प्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतींसह मुलाखतीस हजर राहवे.
एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठीची खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे.
       SSB मुलाखतीचे पत्र (प्राप्त झाले असल्यास ) किंवा CDS लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्री व्दारे SSB करिता अर्ज पाठवले बाबतचा पुरावा आणावा, एनसीसी (C) सर्टिफिकेट A / B ग्रेड धारक ( उमेदवाराने एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने शिफारस केल्याचे प्रमाणपत्रा बरोबर आणावे.)
एनडीए मधील परिक्षा उतीर्ण असल्याचा पुरावा आणावा.
     तरी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीयन तरुण / तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. संचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक यांनी आवाहन केले आहे.नाशिक प्रशिक्षण केंद्र दुरध्वनी क्र. 0253 / 2451032 व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव क्र. 0257 – 2241414 येथे संपर्क करावा.  असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.

Saturday, 2 February 2013

महापालिकेने रेल्वे उड्डाणपुलाच्या तांत्रीक मंजुरीची रक्कम त्वरित भरावी -- पालकमंत्री ना. देवकर



       जळगांव, दि. 2 :- शासनाकडून शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झालेला असून जळगांव महानगरपालिकेने चालू एसडीआर प्रमाणे सदरच्या पुलाच्या तांत्रीक मंजुरीची रक्कम त्वरित भरण्याची सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केली.
        आज दुपारी 4 वाजता पदमालय शासकीय विश्रामगृह येथे उड्डाण पुलाच्या कामाबाबत आयोजित बैठकीत ना. देवकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.आर.टेंभुर्णे, महानगरपालिकेचे अभियंता श्री खडके, श्री. भोळे,  श्री योगेश बोरोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, भू-संपादन अधिकारी श्रीमती दीपमाला चौरे आदि उपस्थित होते.
       ना. देवकर पुढे म्हणाले शहरात वाहतुकीची कोंडी मोठया प्रमाणात होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिंप्राळा व शिवाजीनगर उड्डाण पुलाकरिता निधी मंजुरीचे व समांतर रस्त्याबाबतची रेल्वे बोर्डचे सुमारे 3 कोटीचे रक्कम महापालिकेने लवकर भरणे आवश्यक आहे. सदरची रक्कम त्वरित भरली गेल्यास उड्डाण पुलाचे काम पुढील दोन – तीन महिन्यात पूर्ण होऊन वाहतुक सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त श्री. राजूरकर  यांनी पुढील दोन महिन्यात तांत्रिक मंजुरीचे सुमारे 25 लाख रु. व रेल्वे बोर्डाचे 2.99 कोटी रु. भरण्यात येतील असे सांगितले. त्याकरिता महापालिका निधीची बचत करुन सदरची रक्कम अदा करेल असे त्यांनी सांगितले.
      पिंप्राळा व शिवाजीनगर उड्डाण पुलाचे रेल्वे जागेत करण्यात येणा-या कामाचे डिझाईन तयार करुन त्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात येईल. तसेच महापालिकेने समांतर रस्त्याकरिता 2.99 कोटी अनामत रक्कम जमा केल्यास सदरच्या कामास परवानगी दिली जाईल, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.आर. टेंभुर्णे यांनी दिली.
            यावेळी ना.देवकर यांनी पिंप्राळा, शिवाजीनगर, म्हसावद रेल्वे उड्डाण पुलाबाबतच्या कामाचा व समांतर रस्ते , बोगदे आदिचा आढावा घेतला. तसेच म्हसावद उड्डाण पुलाकरिता भू- संपादन बाबत सर्व शेतक-यांना नियमाप्रमाणे जमिनीचे पैसे मिळाले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन खात्यामार्फत सेवादाता भरती



        जळगांव, दि. 2 :- पशुसंवर्धन खात्यामार्फत गुरांमध्ये कृत्रिम रेतन कार्यासाठी सेवादात्याची निवड करावयाची आहे. त्यासाठी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता , दुचाकी वाहनाचा परवाना, रहिवाशी दाखला, अनुभव इत्यादी कागदपत्रासह खालील नमूद केलेल्या तालुकानिहाय दिलेल्या तारखेस मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, महाबळ रोड, जळगांव हया ठिकाणी उपस्थित राहावे.
      1) दिनांक 6 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगांव, एरंडोल तालुका .
      2) दिनांक 7 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता, यावल, पारोळा, अंमळनेर, बोदवड, चाळीसगांव तालुका
        3) दिनांक 8 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता जामनेर, भडगांव, चोपडा, रावेर, पाचोरा , वेळापत्रका प्रमाणे हजर रहावे असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.