Friday, 28 February 2025

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा


                  जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 02 ते 03 मार्च 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे

          रविवार, दिनांक 02 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता नवजीवन एक्स्प्रेस भुसावळ स्टेशन आगमन. सकाळी 07.30 वाजता भुसावळ जंक्शन येथून मोटारीने रवाना. सकाळी 08.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन रवाना. सकाळी 10.00 तास ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.00 ते दुपारी 4.00 मुक्ताईनगर येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक. मुक्ताईनगर येथे मुक्काम. 

            सोमवार, दिनांक 03 मार्च, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने रवाना, सकाळी 10:30 वाजता सावखेडा रावेर येथे आगमन. सकाळी 10.30 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत सावखेडा रावेर येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक. सकाळी 11.00 वाजता सावखेडा रावेर येथून रवाना (चोपडा आणि एरंडोल मार्गे, प्रत्येक ठिकाणी १५ मिनिटे थांबा). दुपारी 1.30 वाजता चाळीसगाव येथे आगमन. दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 चाळीसगाव येथे स्थानिक लोकांसोबत बैठक. दुपारी 2.30 वाजता चाळीसगाव येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे रवाना.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय मेळावा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन


  जळगाव, दिनांक  28 (जिमाका वृत्त ):  राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण राज्यातील शासकिय व निमशासकिय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता "राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम" राबविण्यात येणार आहे. शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलीची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामुल्य उपचार, संदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येणार आहे.

        राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार हे या कार्यक्रमाचे दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन करणार आहेत. तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.     

      उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांच्या हस्ते इंदीरा गांधी मॉडेल स्कुल, औंध, पुणे येथे दि.०१ मार्च २०२५ ला सकाळी ८.३० वा. दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

          त्याअनुषंगाणे जळगाव जिल्हयातील एकुण १५ तालुक्यात दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असुन उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्यालय, प्रताप नगर, जळगांव येथे सकाळी ८.३० वाजता करण्यात येणार आहे.

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन – 25 गावांना मोठा दिलासा


जळगाव, 25 फेब्रुवारी – जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे यांना तात्काळ उचित कार्यवाही करून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन आणि बुडीत क्षेत्रातील अनुषंगिक कामांना तृतीय सुप्रमा मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले.

या बैठकीला आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही

सध्या जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला त्वरित पाणीपुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः धरणगाव, जळगाव आणि यावल काठच्या गावांना तातडीने पुरेसा पाणीपुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.

"जनतेच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने आवर्तन सोडण्याचा त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होऊ नये, यासाठी शासन वचनबद्ध आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात."

पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावकऱ्यांना दोन महिन्यांचा दिलासा

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील 25 गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे आणि कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करत आहेत.

या गावांना होणार थेट फायदा

सध्या 67.50 द.ल.घ.मी. (61.15%) पाणीसाठा असून, आवर्तन सोडल्यानंतर प्रकल्पात 25.00 द.ल.घ.मी. (21.00%) पाणी शिल्लक राहणार आहे. 60 ते 70 दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे.

फायदा होणारी गावे:

▶ जळगाव तालुका: आसोदा, भादली, ममुराबाद, शेळगाव, तुरखेडे, आमोदे, भोकर, कानसवाडे, आवार, घार्डी, भोलाणे, विदगाव, धानोरे, सुजदे, डीकसाई, करंज, लिधुर, किनोद

▶ यावल तालुका: टाकरखेडे, भालशिव, शिरागड

▶ चोपडा तालुका: पुनगाव, मितावली, पिंप्री, वडगाव, वटार सुटकार, खेडी, भोकरी, कोळंबे, सनफुले, कठोर, कुरवेल, निमगव्हाण, तावसे, खाचणे

▶ धरणगाव तालुका: धरणगाव शहर, नांदेड, पिंप्री, पथराड या निर्णयामुळे गावकरी आणि शेतकरी संतोष व्यक्त करत असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प तृतीय सुप्रमा मिळाल्यास कामांना येणार गती

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन, बुडीत क्षेत्रातील रस्ते, कडगाव-जोगलखेडा उंच पूल, शेळगाव-बामनोद उंच पूल, तसेच यावल उपसा सिंचन योजना यांसारख्या अनुषंगिक कामांसाठी तृतीय सुप्रमा मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

तृतीय सुप्रमा प्रस्ताव  तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांना 6 ऑगस्ट 2024 रोजी तांत्रिक तपासणीसाठी सादर केला असून, मंजुरी मिळाल्यास या कामांना गती मिळणार आहे.

 बळीराजा जलसंजिवनी योजनेअंतर्गत यावल उपसा सिंचन योजनेस शासनाने 12 जुलै 2024 रोजी तत्त्वतः मान्यता दिली असून, तृतीय सुप्रमा प्रस्तावात योजनेचा समावेश केला असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हा नियोजन विकास कामांचा आढावा


                       जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्यात होत असलेली सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा नियोजन समिती मार्फत पी डब्ल्यू डी, पोलीस विभाग , नाविम्यापूर्ण , सिव्हील हॉस्पिटल, डीन, अपारंपारिक उर्जा, व इतर  मंजूर करण्यात आलेल्या 141 कोटी 63 लाखांच्या निधीतून 507 कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील  100 कोटींच्या कामांबाबत  सविस्तर आढावा अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांनी सादर केला. 

या बैठकीस आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावणे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

 जिल्ह्यातील 68 मोठया विकासकामांपैकी 40 पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामानंद पोलीस स्टेशन पूर्णत्वास येत असून 10 पोलीस चौक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या 16 पैकी 13 इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

महत्त्वाची प्रकल्पे प्रगतीपथावर

महाराष्ट्रातील पहिले पशु रेतन केंद्र - जिल्हा नियोजन निधीतून हे अभिनव केंद्र उभारले जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे*. भरोसा सेल इमारत, संविधान भवन बांधकाम, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, वारकरी भवन*-राज्यातील अनोख्या वारकरी भवनाच्या बांधकामालाही गती मिळाली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन वारसा इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा हेरिटेज दर्जा कायम ठेवत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेरिटेजच्या नियमांचे पालन करत कार्यालयाचे नूतनीकरण होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर हिरवाईयुक्त असा विकसित करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता श्री. सोनावणे यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Thursday, 27 February 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा


                   मुंबई, दि. २७: राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई.रविंद्रन, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात जलजीवन निशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्यामाध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. 

मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली. 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोन बाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विभागाला सांगितले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये हर घर जल अंतर्गत १०० टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट्य पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक बसस्थानक व आगाराचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 


जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम

जळगाव, दि 27 ( जिमाका वृत्तसेवा ) :

       राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या "कार्यालयीन सुधारणा" विशेष मोहिमेच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विशेष अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव मा. श्रीमती सुजाता सौनिक यांचीही उपस्थिती होती.

प्रशासनाच्या या यशामागील महत्त्वाचे टप्पे:

✅ पारदर्शक व गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी

✅ नागरिक सेवा सुविधा सुधारणा आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे

✅ नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व डिजिटल प्रशासनाचा विकास

✅ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे

✅ संकेतस्थळ सुधारणा व ऑनलाइन सेवा पोहोचविणे

         या उल्लेखनीय यशामुळे जळगाव जिल्हा राज्यभर एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. महसूल विभागाच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले असून, संपूर्ण जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन

 


नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


२७ फेब्रुवारी दिनविशेष

 


जिल्हाधिकारी कार्यालयात 3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

                      जळगाव, दिनांक  27 (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक  3 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे. 

           या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Monday, 24 February 2025

जळगाव संवाद सेवा

 


निवासी आयुक्त पदाचा कार्यभार आर. विमला यांनी स्वीकारला

 



                नवी दिल्ली, 24:  येथील महाराष्ट्र सदनच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार श्रीमती आर. विमला यांनी आज स्वीकारला. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयात आज श्रीमती विमला यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार आणि व्यवस्थापक भगवंती मेश्राम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी कस्तुरबा गांधीस्थित नवीन महाराष्ट्र सदनाची पाहणी केली.

 

श्रीमती विमला यापुर्वी समग्र शिक्षाच्या राज्य प्रकल्प संचालक या पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्रातील सरकारच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीच्या पदावर 30 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. त्यात नागपूर जिल्हाधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, जलजीवन मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन,  उद्योगांचा विकास आणि फिल्मसिटी आदींचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सुमारे पाच लाख बचत गट आणि समुदाय आधारित संघटना निर्माण केल्या आहेत, ज्यातून 50 लाखांहून अधिक कुटुंबे जोडली गेली आहेत. या गटांनी 18 लाखांहून अधिक कुटुंबांमध्ये शाश्वत उपजीविका निर्माण केली आहे ज्यामध्ये, शाश्वत शेती करणाऱ्या 14 लाख महिला शेतकरी समाविष्ट आहेत याची आर्थिक उलाढाल 1100 कोटी रुपयांपर्यंत आहे.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे स्वागत

 

महाराष्ट्र सदन निवासी आयुक्त कार्यालयाच्या सचिव तथा निवास आयुक्त आर. विमला यांचे  दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक हेमराज बागुल यांनी स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती श्री बागुल यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 फेब्रुवारी रोजी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध

                         

                              जळगाव दि. 24 ( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी "सहाय्य संकल्प" या डिजिटल उपक्रमांतर्गत 25 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.


डिजिटल माध्यमातून संवाद

"सहाय्य संकल्प" अंतर्गत जिल्ह्यातील विविध योजनांचे लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. याच अंतर्गत जिल्हाधिकारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.


"सहाय्य संकल्प" उपक्रम

या उपक्रमाद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग निवृत्तीवेतन योजना यांसारख्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना यासाठी तालुका किंवा तहसील कार्यालयांना भेट देण्याची गरज भासणार नाही.


नागरिकांनी ऑनलाइन उपस्थित राहावे

या संवादासाठी नागरिकांना "आपले सरकार" पोर्टल किंवा महा ई-सेवा केंद्राद्वारे अर्ज सादर करता येईल. तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकृती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, यामुळे नागरिकांना अधिक सोईस्कर आणि पारदर्शक सुविधा मिळणार आहे.


तक्रारी आणि अर्जांची तत्काळ सोडवणूक

तक्रारींच्या संदर्भात तहसीलदार आणि संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती 15 दिवसांत निर्णय घेईल. मंजूर किंवा नामंजूर अर्जांची माहिती लाभार्थ्यांना थेट कळवली जाईल.


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, "सहाय्य संकल्प" उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या सेवांचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या तक्रारींवर वेगाने कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी या डिजिटल संवादात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा.स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन




जळगाव, दिनांक 24 फेब्रुवारी ( जिमाका ) : मेरा युवा भारत - नेहरू युवा केंद्र जळगाव द्वारे १३-१७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबईतील २७ तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. १५ फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्रकल्प अधिकाऱ्यांनी लालमती आश्रम शाळा आणि गावाला भेट दिली आणि तेथील लोकांचे जीवन समजून घेतले. त्यानंतर मनोलव प्रकल्प, दीपस्तंभ संस्थेतील अपंग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली जेथे युजवेंद्र महाजन यांच्या दृढ निश्चय आणि समर्पणाने तरुणांना समाजसेवेची प्रेरणा दिली. १६ फेब्रुवारी रोजी अजिंठा लेण्यांना भेट देऊन भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ १७ फेब्रुवारी रोजी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रास्ताविकात, नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी ०५ दिवसांच्या उपक्रमांची माहिती दिली. विभागीय नियंत्रक, एमएसआरटीसी भगवान जगनोर यांनी तरुणांना जळगावमधील वाहतूक परिस्थिती आणि भविष्यातील नियोजित विकास कामांबद्दल माहिती दिली आणि तरुणांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जळगाव येथील प्राचार्य सोना कुमार यांनी तरुणांना नवीन शिक्षण प्रणाली आणि करिअरबद्दल मार्गदर्शन केले.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ तरुणांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी तरुणांना देश आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. जळगावमध्ये होत असलेल्या आर्थिक विकासाविषयी, जसे की एमआयडीसी, विमानतळ इत्यादींचे अपग्रेडेशन, याबद्दलही तरुणांना माहिती देण्यात आली. दुर्गम आदिवासी गावांच्या विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीचीही तरुणांना माहिती करून देण्यात आली. त्यांनी भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया इत्यादी युवा विकास योजनांचे कौतुक केले. व्यावसायिकतेवर भर देत, तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रेरित केले. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगले समन्वय साधण्यासाठी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तरुणांना सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तरुणांनी देखील त्यांचे ५ दिवसांचे अनुभव सांगितले. अजिंक्य गवळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुषार साळवे, तेजस पाटील, अनिल बाविस्कर, मुकेश भालेराव आणि रोहन अवचरे यांनी प्रयत्न केले.

बुलेटीन-2025 दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2025

 जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025

दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2025

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन






यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

                         नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करतांना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, जगातील अनेक प्रगत देश कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा शोध घेत आहेत. ते त्यांची भाषा जाणणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी करतात. या पार्श्वभूमीवर जपानी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच किंवा अगदी इंग्रजी भाषेतील लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा. देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनण्यासाठी  सक्षम करेल आणि  2047 पर्यंत 'विकसित भारताचे' स्वप्न पूर्ण करण्यास पूरक ठरेल, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

भारतामध्ये 2036 पर्यंत उच्च शिक्षणात 50 टक्के नोंदणी साध्य करण्याचे स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल. दुर्गम भागातील आणि शैक्षणिक प्रवाहापासून दूर असणाऱ्या व्यक्तींना यामुळे शिक्षणाची संधी मिळू शकेल.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गृहिणी, कामगार, आदिवासी भागातील नागरिक आणि बंदिजनांनाही शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.  विद्यापीठाचे हे कार्य कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे शिक्षण देण्यासाठी नवा विचार आणि नवकल्पनांचा समावेश अभ्यासक्रमात करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यापीठाचे रूपांतर डिजिटल विद्यापीठात करण्यासाठी निधी मिळण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. कोळसकर म्हणाले, विविध तंत्रज्ञानाच्या प्रगती आणि वापरामुळे बाह्य जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्ससह विविध घटक आपल्या उपजीविकेवरच नव्हे, तर समाज व्यवस्थेवर परिणाम करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने शिक्षण क्षेत्रात भौगोलिक सीमारेषा पुसल्या जाऊन यापूर्वी कधीही उपलब्ध नसलेल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डिजिटल बँकिंग सुविधा, ई कॉमर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात नव्या संधी निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हांनाना संधीमध्ये रुपांतर करावे, असेही आवाहन डॉ. कोळस्कर यांनी केले.

कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले, विद्यापीठाद्वारे नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संधी निर्माण करून देत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, आदिवासी भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी विद्यापीठ कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोग करता यावा या दिशेने विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाला डिजिटल विद्यापीठात परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. असे झाल्यास १ कोटी विद्यार्थ्यांशी विद्यापीठ जोडले जाईल. वाढवण बंदराच्या ठिकाणी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. आज पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी देशाच्या उभारणीत योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलपती तथा राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध विद्या शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थांना पदके प्रदान करण्यात आली.

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी











नवी दिल्ली, 23: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या या दालनाला गेल्या तीन दिवसापासून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आमदार विश्वजीत कदम, सीमा हिरे, मोनिका राजळे तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ . किरण कुलकर्णी, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह मान्यवर संपादक, साहित्यिक आणि माध्यम प्रतिनिधींनी या दालनास भेट दिली.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा


जळगाव दि. 22 ( जिमाका वृत्तसेवा ) : केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा दौरा खालील प्रमाणे
रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायं. 7 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे प्रयाण, रात्री 10:30 वाजता मुक्ताईनगर आगमन व मुक्काम, सोमवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मुक्ताईनगरहून रावेर तालुक्यातील पाल येथे प्रयाण, दुपारी 1:30 ते 3:50 वाजता कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे 'किसान सन्मान कार्यक्रम', संध्याकाळी 5 वाजता पालहून मुक्ताईनगरकडे प्रयाण व मुक्काम, मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगरहून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक, संध्याकाळी 3 वाजता जळगावहून मुक्ताईनगरकडे प्रयाण, संध्याकाळी 4 ते 6 वाजता मुक्ताईनगर येथे निवासी शिबिर कार्यालयात शासकीय कामकाज, संध्याकाळी 6 ते 8 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक, मुक्ताईनगर येथे मुक्काम.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात चौऱ्याऐंशी हजार चारशे चौपन्न लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित










▪️ वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे हस्ते मंजुरी आदेशाचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण
जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) – प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एक सुंदर आणि सुरक्षित घर असावे. सामान्य माणसाचे हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असून जळगाव जिल्ह्याला या योजनेत सर्वाधिक घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार चारशे चौपन्न लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये वितरित करण्यात आले. ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर एकेऐंशी हजार आठशे अठ्ठावन उद्दिष्टांपैकी चौऱ्याऐंशी हजार चारशे चौपन्न लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण आणि घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम नियोजन भवन, जळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते निवडक पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक राजीव लोखंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचा संदेश
पालकमंत्री गुलाबराव पाटील काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, जिल्ह्यात ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत, त्यांनी निर्धारित मुदतीत गुणवत्तापूर्ण घरे बांधावीत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांचा हा संदेश प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांनी उपस्थितांपर्यंत पोहोचवला.
जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, हे अनुदान लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात आले आहे. लाभार्थी स्वतःच्या बचतीतून किंवा बँकांकडून कर्ज घेऊन अधिक मोठे घर बांधू शकतात. साधारणतः एक घर बांधण्यासाठी बहात्तर दिवस लागतात, त्यामुळे मान्सूनपूर्वी घरे पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
राज्यस्तरीय डिजिटल वितरण कार्यक्रम
पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्यभरातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता डिजिटली वितरित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संपूर्ण राज्यभर करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील अठ्ठावन ग्रामपंचायतींसह तालुकास्तरीय आमदारांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तसेच, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील लाभार्थ्यांनी ऐकले.

आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान;जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक




जळगाव दि. 22 ( जिमाका वृत्तसेवा ) आपत्ती व्यवस्थापन कार्यात आपले रोजगार सांभाळून सेवा देणाऱ्या आपदा मित्र आणि वन्यजीव संस्थेच्या टीमने ममुराबाद रोड येथील प्रजापत नगरमध्ये एका घरगुती मांजराच्या पिलाला जीवदान दिले.

गेल्या आठ दिवसांपासून वैष्णवी पंडित यांच्या घराजवळील विहिरीत एक मांजर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच आपदा मित्र आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, सदस्य गणेश सपकाळे, राजेश सोनवणे आणि संरक्षण संस्थेचे खुशाल पंडित यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले.

विहीर खोल असल्याने बचाव कार्य कठीण होते. विशेषतः मांजर एका कपारीत लपल्यामुळे तिला बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर, गणेश सपकाळे यांनी हॅन्ड ग्लोजच्या मदतीने मांजराला सुरक्षितरित्या वर काढले बाहेर येताच मांजराने उडी मारून पळ काढली, मात्र ती सुखरूप असल्याची खात्री करून मदतकार्य पूर्ण करण्यात आले.

वन्यजीव संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील हा संवेदनशील आणि तत्परतेने केलेला प्रयत्नाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले आहे.

जळगाव विद्युत क्रांती- भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती..!

 






विशेष लेख क्रमांक 08                                              

          ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण सुधारणा आणि सौरऊर्जेच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकल्पांमुळे जळगाव भविष्यात महाराष्ट्राच्या ऊर्जाधारी जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे. त्यासंदर्भात घेतलेला आढावा...!!

दीपनगर भुसावळ थर्मल पॉवर प्लांट- विद्युत उत्पादनाचा मजबूत कणा

           जळगाव जिल्ह्यातील वीज निर्मितीचा कणा म्हणजे दीपनगर, भुसावळ थर्मल पॉवर प्लांट. हे राज्यातील प्रमुख थर्मल पावर (तापीय) वीज प्रकल्पांपैकी एक असून, येथे विद्यमान 1210 मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे.

✅ सध्याची उत्पादन क्षमता:

दोन युनिट्स प्रत्येकी 500 मेगावॅट

एक युनिट 210 मेगावॅट

✅ वाढीव क्षमता:

लवकरच 660 मेगावॅट क्षमतेचे चौथे युनिट कार्यान्वित होणार आहे.

सर्व परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल. हा प्रकल्प केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगाव- सौरऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल!

 

          जळगावचे ऊन हे पूर्ण राज्यात किती 'ताप' ट आहे ही सांगण्याची गरज नाही. आता या त्रासदायक तापमानाचा फायदा घेतला जातो आहे. जिल्हा प्रशासनाने यात आघाडी घेतली असून जिल्ह्यातील अनेक जागा सौरऊर्जा प्रकल्पाला उपलब्ध करून दिल्या आहेत.

सौरऊर्जा हे भविष्यातील स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचे सर्वात प्रभावी साधन आहे. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळत असून, भविष्यात हा जिल्हा सौरऊर्जा हब म्हणून विकसित होण्याच्या मार्गावर आहे.

          3900 एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून त्यातून 900 मेगावॅट नवीन सौरऊर्जा निर्मिती केली जाईल एवढी क्षमता आहे. 328 मेगावॅट प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहे तर 20 मेगावॅट आधीच कार्यान्वित झाला आहे. कृषी आणि घरगुती पातळीवर सौर पंप व छप्परावरील सौर पॅनेल द्वारे अतिरिक्त ऊर्जा निर्मिती होणार आहे.

          महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सौरऊर्जा वापर प्रोत्साहन योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून विद्युत प्रसारण आणि वितरणात मोठ्या सुधारणा करण्यात येत असून त्यामुळे वीज उत्पादनाबरोबरच तिचे प्रसारण आणि वितरण सुयोग्य असणे आवश्यक आहे. म्हणूनच जळगाव जिल्ह्यात महत्त्वपूर्ण सुधारणा पुढील प्रमाणे राबवल्या जात आहेत.

181 उपस्थानके-एकूण क्षमता 1790 मेगावॅट RDSS योजनेअंतर्गत सुधारणा:

800 नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवले जात आहेत.कृषी क्षेत्रासाठी फीडर विभाजनाचे काम प्रगतीपथावर.

43 नवीन किंवा अद्ययावत उपस्थानके – 300 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निर्माण होणार. "वन नेशन, वन ग्रिड" – अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणारी योजना

          यामुळे जळगाव जिल्ह्याचा वीज पुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होणार आहे.

वीज चोरी आणि अनधिकृत टॅपिंग – मोठे नुकसान!

          वीज चोरीमुळे जळगाव जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. 40,000 वितरण ट्रान्सफॉर्मर्सपैकी 20% ट्रान्सफॉर्मर्स ओव्हरलोड होतात. गेल्या काही वर्षांत 1400 ट्रान्सफॉर्मर्स जळाले, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.

          ✅ प्रशासनाची नागरिकांना विनंती: आपल्या भागातील अवैध वीज जोडण्यांची माहिती प्रशासनाला द्या. वीज चोरी रोखण्यासाठी सहकार्य करा आणि प्रामाणिक वीज वापरास चालना द्या.

विद्युत पुरवठा आणि मागणी- भविष्याचा वेध

           सध्या जळगाव जिल्ह्यातील वीज मागणी 1074 मेगावॅट आहे. उन्हाळ्यात ही मागणी 1408 मेगावॅट पर्यंत वाढते. नियोजित सुधारणा आणि नवीन प्रकल्पांमुळे 682 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निर्माण होईल. यामुळे जळगाव जिल्हा ऊर्जा निर्यात करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे!

नवी संधी-उद्योग, गुंतवणूक आणि विकास!

          ऊर्जा हा उद्योग आणि व्यवसायांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जळगाव जिल्ह्यातील वीज उपलब्धता वाढल्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.औद्योगिक क्षेत्रासाठी मुबलक वीज उपलब्ध होणार असून कृषी उत्पादन प्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळेल. स्थानिक व्यवसायांना मोठा वेग – नवे उद्योग, नव्या संधी निर्माण होणार आहेत.

ऊर्जासंपन्न जळगाव – ही ओळख भविष्यातील औद्योगिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे.

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

           वीज चोरी आणि अनधिकृत टॅपिंग रोखण्यासाठी सहकार्य करा. नवीन ऊर्जेच्या संधींचा लाभ घ्या – व्यवसाय व उद्योग वाढवा. शाश्वत, स्वच्छ आणि सक्षम ऊर्जा व्यवस्थेसाठी योगदान द्या असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

     मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी जिल्हा वार्षिक नियोजनच्या बैठकांमध्ये आणि दिशा समितीच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून या सर्व प्रकल्पांचे नियमित परीक्षण करत आहेत.

जळगाव- ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने!

          जळगाव जिल्हा आता केवळ कृषी आणि व्यापारासाठीच ओळखला जाणार नाही, तर ऊर्जा उत्पादन आणि व्यवस्थापनातील यशस्वी प्रयोगशील जिल्हा म्हणूनही पुढे येणार आहे. थर्मल आणि सौरऊर्जेच्या सहाय्याने, तसेच वितरण आणि प्रसारण सुधारणा यामुळे हा जिल्हा ऊर्जास्वयंपूर्णतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. जळगाव जिल्हावासियांनो प्रगतीत आपले योगदान द्या आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करा..!! जिल्ह्यातील विकासाचे नवे पर्व तुमच्या सर्वांचे सहकार्याने सुरु होणार आहे. चल संकल्प करू या, जळगावचा विकास करू या...!!

- युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी,

जळगाव.