Tuesday, 30 September 2014

अंगणवाडी सेवीकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा ! महिलांशी थेट संपर्क असल्याने होणार फायदा : नायब तहसिलदार विशाल सोनवणे


अंगणवाडी सेवीकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा !
महिलांशी थेट संपर्क असल्याने होणार फायदा
: नायब तहसिलदार विशाल सोनवणे

            चाळीसगांव,दिनांक 01:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघासाठी किमान 75 टक्के मतदानाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असून परदेशी बोर्डींग सभागृहात अंगणवाडी सेविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी  नायब तहसिलदार विशाल सोनवणे,  महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत, मास्टर ट्रेनर प्रा.डि.एल.वसईकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस आदि उपस्थित होते.
            भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने दिलेल्या नऊ मुद्यांचा  तपशि ल  श्री.सोनवणे यांनी उपस्थित ‍ महिलांना समजाऊन सांगितला तर एकूण लोकसंख्येमधील  महिलांचे प्रमाण आणि एकूण मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे (Gender Ratio) यावर अधिक भर देण्यात आला. अंगणवाडी सेविकांचा ग्रामीण भागात थेट महिलांशी येणार संपर्क लक्षात घेता महिला मतदारांमधील मतदानाविषयी असलेली उदासिनता घालविण्याची जबाबदारी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी घ्यावी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्याव असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी ‍ उपस्थित अंगणवाडी सेविकांना केले.
            यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.वनिता सोनगत म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन कामकाजातील गृह भेटी व माता बैठकीतून प्रबोधन करतांना आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. व दिलेले लक्ष यशस्वीपणे पुर्ण करावे. मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान हा संदेश घराघरात पोहचवून मतदारामध्ये जनजागृतीचे काम यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना सांगितले.
            यावेळी मास्टर ट्रेनर प्रा.डि.एल.वसईकर यांनी मतदान यंत्राविषयी  माहिती देऊन मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक दाखविले. मतदारांमध्ये जनजागृती करतांना आपल्याला एकही उमेदवार पसंत नसेल तर नोटा चा वापर करावा परंतु मतदान करावेच मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजवावा अशा प्रकराचे प्रबोधन आपल्यामार्फत गावोगावी करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिल कार्यालयातील ज्ञानेश्वर अमृतकर, विशाल मराठे, गिरीश पाटील यांनी योगदान दिले.

                                                        * * * * * * * *

भरारी पथकांच्या वाहनातून मतदान जागृतीचे अहिराणी बोल ! अहिराणी लोकगीतांव्दारे करणार मतदारांमध्ये प्रबोधन : प्रांताधिकारी गणेश मिसाळ


भरारी पथकांच्या वाहनातून मतदान जागृतीचे अहिराणी बोल !
अहिराणी लोकगीतांव्दारे करणार मतदारांमध्ये प्रबोधन
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ

            चाळीसगांव,दिनांक 01:- कटाया कराना नही, बठ्ठासनी मतदान करानं, मतदान हाऊ आपला हक्क शे !  असे आवाहन करणारी ध्वनी फित भरारी पथकांच्या वाहनावर बसविलेल्या ध्वनीक्षेपणाव्दारे प्रसारण करुन मतदान जनजागृतीचा शुभारंभ आज पाचोरा येथुन करण्यात आला. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, भडगांव तहसिलदार कापसे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, नायब तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार अमित भोईटे आदि उपस्थित होते.
 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 018-पाचोरा विधानसभा मतदार संघामधील ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रबोधन होण्यासाठी भरारी पथकांच्या वाहनातून मतदान जागृतीसाठी अहिराणी बोल असलेली अहिराणी लोकगीतांव्दारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असून या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल तसेच लोकसभेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वासही प्रांताधिकारी मिसाळ यांनी यावेळी बोलून दाखविला. त्याच बरोबर निवडणूकीत दाखविण्यात येणा-या प्रलोभनांवर आळा घालण्यासाठी भारतीय दंड विधान 1860 अन्वये 171 कलमाचे देखील या वाहनांवरून प्रबोधन करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.

                   
                                                        * * * * * * * *

Saturday, 27 September 2014

निवडणूक संदर्भातील तक्रारींसाठी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा ! निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांचे आवाहन

निवडणूक संदर्भातील तक्रारींसाठी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा !
निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांचे आवाहन
 
            चाळीसगांव,दिनांक 27:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 ची आचार संहिता लागू झाली असतांना निवडणूक प्रक्रियेच्या काळात मतदारास त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता प्रलोभन दाखविण्याच्या दृष्टीने, रोख स्वरुपात किंवा वस्तू रुपात पारितोषिक देणारी किंवा स्विकारणारी कोणतीही व्यक्ती, भारतीय दंड संहितेच्या कलम 171 ख नुसार, एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोघ शिक्षेस पात्र असेल. याशिवाय कोणत्याही उमेदवारास किंवा मतदारास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारची क्षती पोहचविण्याची धमकी देणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 171 ग नुसार एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोघ शिक्षेस पात्र असेल. लाच देणा-या व लाच घेणा-या अशा दोघांविरुध्द गुन्हयाची नोंद करण्यासाठी आणी मतदारांना धमकी देणा-या व धाकदपटशा दाखविणा-या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने 017 चाळीसगांव मतदार संघाकरिता वाहन क्रं. एमएच-19/जी 9018 व एमएच-19/सी-6579 या वाहनांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या वाहनांवरुन मतदारांमध्ये जागृकता निर्माण होण्यासाठी सदर वाहनांवरुन प्रचार प्रसिध्दी देखील करण्यात येत आहे. तरी सर्व जागरुक मतदारांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची लाच दिल्याबद्दल माहिती असल्यास त्याने तक्रार देण्यासाठी उभारण्यात आलेल्या 24X7 तहसिल कार्यालय, चाळीसगांव तक्रार संनियंत्रण कक्षाच्या 18002331342 या टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.
* * * * * * * *
निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर राहणार करडी नजर
तक्रारींसाठी 24X7 टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत
: प्रातांधीकारी मनोज घोडे पाटील
 
            चाळीसगांव,दिनांक 27:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर राहणार असून खर्चासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी  कॉल सेंटर व खर्चाच्या संनियंत्रणामध्ये सहभागी असलेल्या विविध कार्ययंत्रणांमधील संपर्कासाठी  नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, त्याचा टोल फ्री क्रमांक 18002331342 असा आहे. जनतेतील कोणत्याही व्यक्तीने/ जागृत व्यक्तीने प्रत्येक तक्रारीची वेळेसह तक्रार नोंदवहीत नोंदविण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे,  यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कक्ष प्रमुख म्हणून नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            अशा प्राप्त होणा-या तक्रारींच्या अनुषंगाने खर्चाच्या संबंधीत तक्रारी निवडणूक अधिका-यांच्या प्रतीसह तात्काळ खर्च निरीक्षकांना सुचना देऊन भरारी पथकाच्या संबंधित अधिका-याकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. आदर्श आचार संहितेशी संबंधित तसेच खर्चासंबंधी तक्रारींच्या बाबतीत निवडणूक आयोगाने कडक भुमिका घेतली असून या यंत्रणेतील अधिकारी कर्मचा-यांनी देखील आपल्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी तसेच जनतेनेही या बाबतीत जागृकता दाखवून यासंबंधीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अथवा 24x7  टोल फ्री क्रमांक 18002331342  संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
* * * * * * * *

Wednesday, 24 September 2014

निर्भय व निष्पक्ष निवडणूका होण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वीत : निवडणूक खर्च निरीक्षक नरेश बुंदेल



निर्भय व निष्पक्ष निवडणूका होण्यासाठी
निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वीत
: निवडणूक खर्च निरीक्षक नरेश बुंदेल
 
            चाळीसगांव,दिनांक 24:- निवडणूकांच्या प्रचार कार्यासाठी पैसा आवश्यक असल्यामुळे पैशांचा वापर केल्याशिवाय बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही हे खरे असले तरी पैशांच्या गैरवापरामुळे निवडणूकांच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमधील विषमता, निकोप स्पर्धेचा अभाव, प्रचाराच्या नावाखाली अनेक राजकारणी व्यक्तींची अभिस्वीकृती आणि कायद्याची पायमल्ली करुन कलंकित शासन व्यवस्थेची निर्मीती यासारखे धोके निर्माण होऊ शकतात, हे धोके लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे व नागरी संस्था या सारख्या हितसंबंधितांशी विचारविनीमय करुन निर्भय  व निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. असे प्रतिपादन निवडणूक खर्च निरीक्षक नरेश बुंदेल यांनी आज या.ना.चव्हाण  महाविद्यालयातील कार्यक्रमात केले.
            या कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी  मनोज घोडे पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सहा. खर्च निरीक्षक ईश्वर घोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, या.ना.चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य ‍ आदि उपस्थित होते.
            महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना श्री.बुंदेल म्हणाले की, निवडणूकीच्या काळात करण्यात येणारे गुंतागुंतीचे अंतर्गत व्यवहार विचारात घेता, त्यासाठी होणा-या पैशांच्या गैरवापराला आळा घालणे हे एक मोठे आव्हान आहे. या प्रक्रियेत अजूनही अनेक बदल होत आहेत. आणि निवडणूकांचे पावित्र्य जपण्यासाठी भरघोस प्रयत्नांची व सर्व हितसंबंधितांकडून सहकार्य मिळविण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जागरूक मतदार म्हणून सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व  कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भय व निष्पक्षपणे मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तहसिल कार्यालयात घेतली आढावा बैठक
निवडणूक कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांची व स्थापन केलेल्या कक्ष प्रमुखांची आढावा बैठक आज निवडणूक खर्च निरीक्षक नरेश बुंदेल यांनी  तहसिल कार्यालयातील सभागृहात घेतली.यात प्रामुख्याने कॉल सेंटर मधून मतदारांना वेळोवेळी  माहिती उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्याच्या सुचना ‍संबंधितांना देण्यात आल्या तर सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या देखरेखीखाली उमेदवारांचे खर्चाचे रजिष्टर,दिलेला खर्च तपासणी  त्याची पडताळणी करुन वेळावेळी अहवाल पाठविणे, भरारी पथकांनी  व चेक पोस्ट वरील अधिकारी  कर्मचारी व पोलीस कर्मचा-यांनी वाहनांच्या तपासणीवेळी संयम व नम्रपणे आपले कर्तव्य बजवावे. व्हीडीओ व्हिव्हींग टीमचे चित्रीकरण हे प्रचार सभेतील खर्चासाठी महत्वपुर्ण असून कामात कुचराई करु नये अशा प्रकारच्या सुचना व मार्गदर्शन श्री.बुंदेल यांनी  या बैठकीत केले.
बिलाखेड चेकपोस्टला निवडणूक खर्च निरीक्षकांची भेट
            तालुक्यातील बिलाखेडे येथे स्थापन केलेल्या चेकपोस्टला निवडणूक खर्चनिरीक्षक नरेश बुंदेल यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच कर्तव्यावर उपस्थि त अधि कारी व कर्मचारी यांना कामकाजासंबंधी सुचना दिल्या  कामकाजात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास थेट संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही त्यांनी  सर्व अधिकारी कर्मचा-यांना दिला. कामकाजात पारदर्शीपणा ठेवून सोपविलेली जबाबदारी  यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.  आजचा नियोजीत दौरा असला तरी  भविष्यात  अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेण्यात येईल व कामात कुचराई करणा-या अधिकारी , कर्मचा-यावर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

                                                           * * * * * * * *

Sunday, 21 September 2014

मतदार शिक्षण व सहभागाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा : निवडणूक निरीक्षक मरिअप्पन


मतदार शिक्षण व सहभागाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा !

: निवडणूक निरीक्षक मरिअप्पन 

            चाळीसगांव,दिनांक 21 :- भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या साठी भारत निवडणूक आयोगाचा मतदार शिक्षण व सहभागाचा पध्दतशीर कार्यक्रम (SVEEP-II) हा अधिक प्रभावीपणे राबवावा असे प्रतिपादन मतदार जनजागृतीचे निवडणूक निरीक्षक मरिअप्पन यांनी आज तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीत केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे निरीक्षकांचे संपर्क अधिकारी ए.व्ही.भोकरे, उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद  रविंद्र जाधव यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी, बी.एल.ओ. कॅम्पस अँम्बेसेडर आदि उपस्थित होते.

            या बैठकीत निरीक्षक मरिअप्पन यांनी कॅम्पस अँम्बेसेडर यांच्याशी संवाद साधतांना विधानसभा निवडणूक-2014 करिता केलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेतली व नवीन पिढीमध्ये लोकप्रिय झालेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदान जनजागृती प्रभावीपणे करण्याच्या सुचना केल्या. तर एकूण मतदान केंद्राच्या कमी मतदान झालेल्या 10 टक्के मतदान केंद्रावरील बी.एल.ओ. यांच्याशी चर्चा करून सुयोग्य असे मार्गदर्शन केले.

            आढावा बैठकीत पुढे मार्गदर्शन करतांना प्रामुख्याने (SVEEP-II) कार्यक्रम प्रभावीपणे राबवितांना  शहरी व ग्रामीण भागात बॅनर्स व पोस्टर्स लावणे, चित्ररथाव्दारे मतदार जनजागृती करणे, मतदान यंत्राचे प्रशिक्षण राबविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, बी.एल.ओ. यांचा सहभाग वाढविणे, महाविद्यालय परिसरात लोकशाहीसाठी मतदान मोहिम राबविणे, मतदानाचे आवाहन करणारी स्क्रीप्ट स्थानिक केबल वाहिनीवरुन प्रसारीत करणे व सर्वात कमी मतदान झालेल्या 10 टक्के मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती करिता विशेष मोहिम राबविणे अशा विविध सुचना व मार्गदर्शन श्री. मरिअप्पन यांनी आजच्या आढावा बैठकीत केले.

            बैठकीत उपस्थितांना संबोधीत करतांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांपासून सुरुवात करावी व मतदान केल्याची बोटाची शाही तपासावी त्याच प्रमाणे मतदानाचे महत्व सर्व सामान्य मतदारांना समजावून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे. मतदान कार्डाचा उपयोग हा ओळख म्हणून  करतात परंतु मतदानासाठी होत नाही ही खेदाची बाब आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 मध्ये  75 टक्यापेक्षा अधिक मतदानाचे लक्ष ठेवून सर्वानी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे दाखल

            017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघाकरिता रॅली, प्रचारसभा, मद्यसाठा व खर्च निरीक्षण आदि कामकाजासाठी स्थापन केलेल्या तिनही पथकातील अधिकारी व कर्मचा-यांची आढावा बैठक सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे यांनी आज तहसिल कार्यालयात घेतली. मतदार संघात तळेगांव/हिरापूर, चिंचगव्हाण, बिलाखेड टोलनाका या ठिकाणी चेकपोस्ट लावण्याच्या सुचना करुन नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना रोटेशन प्रमाणे विविध चेकपोस्ट वर आता कर्तव्ये बजवावे लागणार असल्याच्या सुचना केल्या. निवडणूक खर्चासंबंधीचे शॅडो रजिष्टर तसेच पथकांकडून अचूक माहिती अपेक्षीत असून निवडणूक आयोगाला वेळोवेळी सादर करावयाचे अहवाल या बाबत सखोल चर्चा व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

                                           * * * * * * * *

                  

Friday, 19 September 2014

चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती साठी स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी : प्रातांधिकारी मनोज घोडे


चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती साठी
स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
: प्रातांधिकारी मनोज घोडे
 
            चाळीसगांव,दिनांक 19:- भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी मतदारांना अधिक साक्षर व जागृत करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 (SVEEP-II) (Systematic Voter’s Education & Electoral Participation)‍ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीचेवेळी मतदारांची मोठया प्रमाणावर नोंदणी होऊन विक्रमी मतदान झाले असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 करिता देखील स्वीप-2 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतदार जनजागृतीसाठी स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली.सदर बैठकीस  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी मार्गदर्शन केले.
            स्वीप-2 या कार्यक्रमात प्रामुख्याने 18 वर्षावरील लोकसंख्येएवढी मतदारांची संख्या असावी (100 % EP Ratio) एकूण लोकसंख्येमधील ‍ महिलांचे प्रमाण आणि एकूण मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे, 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानांच्या प्रमाणात वाढ करणे, शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, वंचित समाज/समुह यांची मतदार नोंदणी वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा, मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, निवडणूकीमध्ये मतदानाच्या सरासरी प्रमाणामध्ये वाढ करणे, टपाली मतदानाचे प्रमाण गेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा मोठया प्रमाणात वाढावे अशा प्रकारची प्रमुख उदिदष्टे ही या कार्यक्रमातंर्गत असून याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी  तहसिल कार्यालयात मतदान जनजागृती सेल (SVEEP-II) ची स्थापनाही करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून  रविंद्र जाधव, मुख्याधिकारी न.पा. व विशाल सोनवणे, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            स्वीप-2 कार्यक्रमाचे अंमलबजावणी संदर्भात झालेल्या बैठकीत शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्याची नेमकी कारणे शोधून त्यासंबंधी उपाययोजना करणे, आपल्या मतदार संघामध्ये जे समाज/समुह वंचित राहिले आहेत अशा समाज/समुहांचा शोध घेणे व त्यांची वस्ती आणि त्यांची संस्कृतीचा अभ्यास करुन त्यांना मतदान प्रक्रीयेमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आजही अशिक्षीत समाजातील मतदारांना निवडणूकीच्या कार्यक्रमाचे व लोकशाही प्रक्रीयेचे महत्व समजावून मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्यास प्रवृत्त करणे, लोक शिक्षण/प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे, मोबाईल व्हॅन्स, ग्रामसभा, सणासुदीच्या /जत्रांच्या काळात लोकजागृती करणे अशा विविध प्रकारच्या करावयाच्या उपाय योजनांबाबत नियोजन करण्यात आले.या बैठकीला सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी न.पा.चे रविंद्र जाधव, नायब तहसिलदार ‍विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, अनंत परमार्थी, जी.आर.वाघ, आर.बी.ब्राम्हणे यांच्यासह महसूल कार्यालयातील तसेच निवडणूक कामकाजासाठी सेवावर्ग केलेले अधिकारी ,कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.
विविध महाविद्यालयातील दहा कॅम्पस ॲम्बेसेडरांची मतदार जागृती अभियान
ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जानेवारी, 2014 रोजी अठरा वर्षे पुर्ण असून अशा नवमतदारांमध्ये मतदानाचे व लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची कॅम्पस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नियुक्ती आदेशांचे वितरणही करण्यात आले. तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांना नवमतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

                                                    * * * * * * * *

Tuesday, 16 September 2014

निवडणूक कामासाठी लागणारे विविध परवाने मिळणार एक खिडकी कक्षात


निवडणूक कामासाठी लागणारे
विविध परवाने मिळणार एक खिडकी कक्षात 

            चाळीसगांव,दिनांक 16 :- विधानसभा निवडणुक 2014 च्या अनुषंगाने निवडणूक कामी विविध शासकीय विभागांमार्फत विविध परवाने तसेच ना-हरकत दाखले एकाच ठिकाणी मिळण्यासाठी 017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघाकरिता तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख नायब तहसिलदार नानासाहेब आगळे तर सहाय्यक म्हणून श्रीमती के.बी.परदेशी यांची नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, नगर परिषद, पोलीस स्टेशन चाळीसगांव व मेहुणबारे, पंचायत ‍ समिती  या विभागातील प्राधिकृत  अधिकारी, कर्मचारी या एक खिडकी कक्षात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून विविध विभागामार्फत देण्यात येणारे परवाने जसे वाहन परवाना, बॅनर, होर्डींग, प्रचार सभा, रॅली आदींसाठी लागणा-या परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याने वेळेचा अपव्यय व गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. या एक खिडकी कक्षाचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

            महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या नवमतदार नोंदणी कार्यक्रम आज शहरासह ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला.  दिनांक 01 जानेवारी, 2014 रोजी ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पुर्ण आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणींचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील 13 राजपत्रीत तर 39 अराजपत्रीत अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे.


                                                      * * * * * * * *

Monday, 15 September 2014

महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी

महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी 

            चाळीसगांव,दिनांक 15 :- विधानसभा निवडणुक 2014 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार दिनांक 16 सप्टेंबर, 2014 रोजी तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. दिनांक 01.01.2014 या अर्हताकारी दिनांकाला ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पुर्ण झालेले आहे अशा नव मतदार विद्यार्थ्यांनी या विशेष  मोहिमेत सहभागी होऊन आपले नाव मतदार यादी समाविष्ठ करुन घ्यावे असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी केले आहे.
            भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 12.09.2014 च्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 ची घोषणा झाली असून महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणीबाबत विशेष  मोहिम राबविणेकामी  017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघात दिनांक 16 सप्टेंबर, 2014 रोजी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी भारतीय लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 13 क अन्वये तालुक्यातील 13 राजपत्रीत अधिकारी तर सहाय्यक व कर्मचारी मिळून 39 कर्मचा-यांची सेवा अधिग्रहीत करुन या विशेष मोहिमेसाठी त्यांची नियुक्ती देखील  प्रातांधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मनोज घोडे यांनी केली आहे. तरी मतदार संघातील ज्या विद्यार्थ्यांचे मतदार यादीत नाव नाही अशा नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ठ करून आपला मतदानाचा हक्क प्राप्त करावा व राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
तहसिल कार्यालयात मतदार सहाय्य्‍ता केंद्राची स्थापना

            017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघासाठी चाळीसगांव तहसिल कार्यालयात मतदार सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली असून तेथील दुरध्वनी क्रं. 02589-224011 असा आहे. व या मतदार सहाय्यता केंद्राचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांची नेमणूक प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केली आहे. मतदार आपले नाव मतदार यादी असल्याची खातरजमा व मतदान कार्यक्रमाविषयी आवश्यक असलेली माहिती या मतदार सहाय्यता केंद्रातून प्राप्त करु शकतात असेही प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. उमेदवारांनी काय करावे किंवा काय करु नये या बाबतची माहिती व सुचनांचा तपशिल हा निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे तर उमेदवारांनी दाखल केलेली शपथ पत्र व खर्चाचे तपशिलांची माहिती ही वेळोवेळी http://ceo.maharashtra.gov.in किंवा http://ceo.maharashtra.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार असल्याचे  त्यांनी कळविले आहे.

                                                        * * * * * * * *

Saturday, 13 September 2014

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे



आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार !
                                                              :प्रांताधिकारी मनोज घोडे

            चाळीसगांव,दिनांक 13:- आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत सांगितले. चाळीसगाव 17 विधानसभा मतदार संघा करिता जाहिर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गट विकास अधिकारी मालती जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सातव, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी व तालुक्यातील सर्व कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
            महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 या अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या मालकी हक्काच्या जागेतील बॅनर, बोर्ड काढण्याची कार्यवाही त्वरीत करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. कुठल्याही सभा, मोर्चा, रॅलींची परवानगी पोलीस प्रशासनाकडुन तर बॅनर, होर्डींग ची परवानगी शहरी भागात नगर परिषद तर ग्रामीण भागात पंचायत समिती व वाहन परवाना हा तहसिल कार्यालयातील एक खिडकी योजनेतून घेण्याचे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.  आदर्श आचार संहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे किंवा काय करु नये या बाबतची माहिती व सुचनांचा तपशिल हा निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी दाखल केलेली शपथ पत्र व खर्चाचे तपशिलांची माहिती ही वेळोवेळी http://ceo.maharashtra.gov.in किंवा http://ceo.maharashtra.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक कार्यक्रमा दरम्यान नवरात्र, दसरा व बकरी ईद हे धार्मीक सण-उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास यावेळी दिल्या तसेच निवडणूकीच्या संदर्भात आयोजीत बैठकीस अनुपस्थित राहणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही यावेळी दिल्या.

तहसिल कार्यालयात आदर्श आचार संहिता कक्षाची स्थापना

            आदर्श आचार संहितेसंदर्भातील मार्गदर्शन व तक्रारींचे निराकरणासाठी तहसिल कार्यालयात आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे प्रमुख निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे काम पाहणार असून या कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02589-224011 असा आहे. तरी आदर्श आचार संहितेसंदर्भातील मार्गदर्शन अथवा तक्रारी करिता या कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहनही  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

                                           * * * * * * * *

Tuesday, 9 September 2014

प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेसाठी प्रयत्नशील : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेसाठी प्रयत्नशील !
                                                              :तहसिलदार बाबासाहेब गाढवे

            चाळीसगांव,दिनांक 09:- प्रशासकीय यंत्रणेत गतिमानता, सुसूत्रता आणता येईल अशा प्रकारचे अभिनव प्रयोग सुवर्ण जयंती राजस्व अभियांनातंर्गत राबवून प्रशासकीय यंत्रणेतील पादर्शकतेसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आज पातोंडा येथील दाखले वाटप  शिबीरात केले.
            महसूल प्रशासनामार्फत आज ‍पातोंडा, शिरसगांव, तळेगांव, मेहुणबारे व बहाळ या पाचही मंडळ स्तरावर सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत विविध दाखले वाटप  शिबीरांचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व प्रशासनातील सर्व कर्मचा-यांसह पाचही मंडळ स्तरावर  शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पातोंडा मंडळातील ‍ शिबीरास स्वत: तहसिलदार बाबासाहेब गाढवे तर शिरसगांव मंडळात निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, तळेगांव मंडळात निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, मेहुणबारे मंडळात नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, बहाळ मंडळात संजय गांधीचे नायब तहसिलदार अनंत परमार्थी  यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात रेशन कार्ड, रहिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॅशनॅलीटी, डोमिसाईल, सातबारा उतारे, दुय्यम  शिधा पत्रीका, विद्यार्थ्यांना शैक्षणीक कामासाठी लागणारे विविध दाखले आदि वाटप करण्यात आले यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या प्रसंगी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित असल्याने  वेळीच समस्यांचे निराकरणही करण्यात आले.
            तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, गावातील सार्वजानिक स्वरुपाचे हक्क ‍निश्चित करुन ते दर्शविणारी पत्रके गावाच्या दप्तरात असावी याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तरी अशा प्रकारच्या नोंदी हया प्रत्येक गावाच्या दप्तरी असणे जरूरीचे असल्याने निस्तार पत्रके व वाजिब-उल-अर्ज तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशी पत्रके व नोंदी हया अद्यावत नसल्याने सार्वजानिक जागांबाबत व वहिवाटींबाबत होणा-या वादांची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात व काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात त्याअनुषंगाने गावातील सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
            सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवितांना लोक सहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी ‍मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतक-यांना जाण्यायेण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध करुन देणे हा असून ब-याच शेतक-यांना इच्छा असूनही उस, केळी, फळबाग, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतरस्ता उपलब्ध नसल्यामुळे घेता येत नाही. बैलगाडी किंवा इतर वाहने  अतिक्रमीत रस्त्यावरुन जावू शकत नसल्यामुळे पावसाळयात पेरणी वेळेवर होऊ शकत नाही. आंतर मशागतीसाठी आवश्यक अवजारांची ने-आण करणे कठीण होते. शेतमाल तात्काळ बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे शेतरस्त्याअभावी जिकरीचे होते. शेतरस्त्याअभावी काढणी, कापणी यंत्रे शेतापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहनही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी केले.
तालुक्यात पाचही ठिकाणी राबविण्यात आलेले शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व विविध विभागातील अधिकारी कर्मचा-यांनी  परिश्रम घेतले असून गांवक-यांनीही या ‍शिबीराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला आहे.

        
                                                         * * * * * * * *

Thursday, 4 September 2014

एक गाव एक गणपती ही 32 वर्षापासूनची परंपरा जपणारे आदर्श गाव तळेगांव पालकमंत्री : ना.संजय सावकारे


एक गाव एक गणपती ही 32 वर्षापासूनची
परंपरा जपणारे आदर्श गाव तळेगांव
पालकमंत्री : ना.संजय सावकारे

            चाळीसगाव,दिनांक 04:- एक विचारसरणी मुळे गावाचा विकास निश्चीत साधता येत असतो एक गाव एक गणपती ही 32 वर्षापासूनची परंपरा जपणा-या चाळीसगांव तालुक्यातील तळेगांवचा एकोपा पाहून तळेगांवचा आदर्श सर्व जिल्हयातील गावांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी आज तळेगांव येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले. या कार्यक्रमास आमदार राजीव देशमुख, जेडीसीसी बँकेचे संचालक प्रदिप देशमुख, सरपंच अतुल देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उप नगराध्यक्ष सिताराम अजबे, सभापती पंचायत ‍ समिती विजय जाधव, सभापती मार्केट कमिटी आर.एल.पाटील उपसभापती मार्केट कमिटी झालम पाटील, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील आदि उपस्थित होते.
            सर्व प्रथम तळेगावचे वटवृक्ष म्हणून संबोधल्या जाणारे स्व.बंडु नाना देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ना.सावकारे म्हणाले की, जात, पात, धर्म विसरून गावाचा विकास साधणारे आदर्श व्यक्तीमत्व गावचे सरपंच अतुल देशमुख व माजी सरपंच सोनाली देशमुख हे कौतुकास पात्र असून त्यांनी गावात राबविलेले उपक्रम असेच पुढे सुरु ठेवावे. घटना दुरुस्ती नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेल्या अधिकाराचा पुरेपुर वापर करुन विकास साधणारे गाव म्हणून तळेगांव व चाळीसगांव नगर परिषदेचाही त्यांनी आपल्या भाषणातून गौरव केला. देशमुख कुटूंबाने तळेगावातील नागरिकांचा ख-या अर्थाने विकास साधुन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार व नुकताच मिळालेला तंटामुक्त गाव पुरस्कार या पुरस्काराचे मानकरी सरपंचासोबत सर्व ग्रामपंचात सदस्य, पंचायत ‍समिती व जिल्हा परिषद सदस्यांचेही पालकमंत्री ना.सावकारे यांनी अभिनंदन केले.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजीव देशमुख यांनी गावातील सर्व विकास कामांची विस्तृत माहिती देतांना गावातील मुलभूत गरजा ओळखुन रस्ते, विज, पाणी, शाळा या गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक गावाच्या विकासाबरोबर संपुर्ण तालुक्याचे नेतृत्व करतांना जाहिरनाम्याची पुर्तता केल्याचा आनंद असून शहराचा पिण्याच्या पाण्यासोबत वर्षानुवर्षे रखडलेल्या वरखेडे येथील धरणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंदही त्यांनी त्यांचा भाषणातून व्यक्त केला.
            यावेळी जेडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, ‍अनिल कासार, आर.एल.पाटील यांची समायोचित भाषणे झाली. तर तळेगांवचे आजी माजी सरपंचाचा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले.
            या कार्यक्रमाला श्रीमती पुष्पा वाघ, किशोर पाटील, बाजीराव दौंड, भोजू शेठ, रामचंद्र जाधव, दिलीप चौधरी, मंगेश राजपूत, दहिवदचे सरपंच बारकु बापुजी, सुरेश चौधरी, किशोर देशमुख,विश्वास चव्हाण, हाजी गफ्फुर, वसंत चव्हाण, प्रशांत पाटील, हरिनाना देशमुख,दिलीप देशमुख, अरुंधती पाटील, आर.के.मोराणकर, सी.बी.साळुंखे  आदि मान्यवरांसोबत पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्रयांच्या हस्ते चाळीसगांव शहरासोबत पातोंडा व वाघळी येथील विकास कामांचा शुभारंभ

दरम्यान चाळीसगांव शहरातील संजय गृहनिर्माण सहकारी सोसायटी व  शिवाजी चौक ते भडगांव रस्ता या कामांचे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला तर तितुर नदीवरील ओझर-पातोंडा-वाघळी दरम्यान 2 कोटी 65 लाख रुपये खर्चाच्या पाच बंधा-यांचे भुमिपूजनही ना.सावकारे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यामुळे भुजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी यावेळी  सांगितले

                                                 * * * * * * * *

लोहारी साजगांव पानंद रस्त्यापासून प्रेरणा घेऊन परधाडे-वडगांव टेक शिवाररस्ता झाला मोकळा


लोहारी साजगांव पानंद रस्त्यापासून प्रेरणा घेऊन
परधाडे-वडगांव टेक शिवाररस्ता झाला मोकळा

            पाचोरा,दिनांक 04:-  तालुक्यातील लोहारी-साजगांव पानंद रस्ता लोकसहभागातून मोकळा होऊन लोकवर्गणीतुन रस्त्याची डागडुजी करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे वर्तमान पत्रातील बातम्यांमधून समजताच परधाडे येथील शेतकरी श्री.वसंत पाटील यांनी लगतच्या आठ-दहा शेतक-यांसह प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांची भेट घेतली व  लोहारी-साजगांव पानंद रस्ता ज्या सामंजस्यातुन व लोकसहभागातून शेतक-यांसाठी शिवार रस्ता म्हणून मोकळा करण्यात आला त्याच धर्तीवर परधाडे-वडगांव टेक शिवार रस्त्याचेही काम लोकवर्गणीतुन करुन देण्याची सहमती दर्शविली या कामी  प्रांताधिकारी या नात्याने आपण पुढाकार घेऊन शासनाच्या या मोहिमेत आम्हालाही सहभागी करुन घ्यावे अशी ‍विनंती केली.
प्रातांधिका-यांनी केली 15 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पहाणी
            प्राताधिकारी श्री.गणेश मिसाळ, तहसिलदार गणेश मरकड, नायब तहसिलदार आबा महाजन यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका भुमी निरीक्षक, भूमापक यांच्यासह सर्वांनी  शिवाराची पहाणी केली. प्रांताधिका-यांनी ग्रामीण गाडी मार्ग साडे सोळा फूट ते एकविस फुटाचा असतो या विषयी सांगितल्यावर सर्व संबंधित शेतक-यांनी लागलीच अतिक्रमण काढून  शिवार रस्त्याच्या मोजणीला संमती दिली तेंव्हा दोन्ही बाजुच्या शेतात कापूस पिकांच्या दोन ओळींचे नुकसान होणार होते. तरीही लोकसहभागाचा उत्साह पहाता नुकसानीची पर्वा कुणीच केली नाही. लोकवर्गणीमध्ये श्री.रमेश बळीराम पाटील, श्री.बाळू बळीराम पाटील, श्रीमती गयाबाई पंडीत पाटील, श्री.गोपाळ किसन पाटील, श्री.सुभाष काशिनाथ पाटील, श्री.रविंद्र उत्तमराव पाटील यांनी लोकवर्गणी गोळा करुन जेसीबी मशिन भाडयाने आणून दोन गावांचा  शिवार रस्ता मोकळा करण्यात आला सायंकाळी सर्व शेतक-यांच्या आग्रहास्तव प्रांताधिकारी, नायब तहसिलदार यांनी शेतक-यांसह शेतात बसून झुणका भाकरीचा आस्वादही घेतला.


                                                 * * * * * * * *

Monday, 1 September 2014

कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धनादेशांचे आमदार राजीव देशमुखांच्या हस्ते वितरण


कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धनादेशांचे
आमदार राजीव देशमुखांच्या हस्ते वितरण

            चाळीसगाव,दिनांक 01 :- राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत कुटूंबातील कर्ता प्रमुखाच्या मृत्युनंतर शासनामार्फत देण्यात येणारी मदत म्हणून प्रत्येकी रुपये 20 हजार इतके अर्थसहाय्य वितरीत करण्यात येत असते. त्याअनुषंगाने तालुक्यातील एकूण 109 मंजूर प्रकरणापैकी 29 लाभार्थ्यांना आज तालुक्याचे आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती ‍विजय जाधव, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, संजय गाधी योजनेच्या गठीत समितीचे शाम देशमुख, प्रदीप निकम, ईश्वर ठाकरे, सुभाष पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार संगायो अनंत परमार्थी आदी उपस्थित होते
            महसुल प्रशासनास प्राप्त निधी रुपये 5 लाखाच्या अनुषंगाने 29 लाभार्थ्यांना आज वितरण करण्यात आले असून उर्वरित निधी प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी  सांगीतले.
            यावेळी लाभार्थ्यांमध्ये सर्व श्रीमती लताबाई बावीस्कर, दिपमाला  पाटील, वैजंताबाई राठोड, मिराबाई चव्हाण, अनिता सोनवणे, शोभा ठाकरे, इंदुबाई गुजर, सुरेखा देवरे, व्दारकाबाई घुगे, लताबाई गायकवाड, चंद्रकलाबाई पाटील, शैला भावसार, लता जाधव, आबेदाबी मजीद, पार्वताबाई शिरसाठ, अंजनाबाई रामवंशी, शालुबाई राठोड,निर्मलाबाई पवार, रेखाबाई सुर्यवंशी, मुलकनबाई शिंदे,  सिंधुबाई जाधव, मायाबाई गायके, उषाबाई रावते, मनिषा इंगळे, रुख्मीणी पडवळकर, ज्योतीबाई कसबे, सरला चौधरी, रेखाबाई कोळी, कमलाबाई धनगर या लाभार्थ्यांना आज राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धनादेशांचे वाटप करण्यात आले.
                                                          * * * * * * * *