Tuesday, 31 July 2012

बाल हक्कांच्या संरक्षणासाठी समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे -प्रा.वर्षा गायकवाड



         मुंबई, दि. 31 : झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या बालकांपुढे  अनेक समस्या आहेत.  65 टक्के मुले ही झोपडपट्टयांमध्ये राहतात.  शासकीय स्तरावरुन या बालकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात.  बालकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, स्वयंसेवी संघटना यांच्याबरोबरच समाजातील सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज येथे केले.
           महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने 'झोपडपट्टी व बाल हक्क' या विषयावर  एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यशाळेचे धारावी येथील संत रोहिदास सभागृहात आयोजन केले होते.  त्याप्रसंगी प्रा.गायकवाड बोलत होत्या.  या प्रसंगी राज्यमंत्री प्रा.फौजिया खान, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
          प्रा.गायकवाड म्हणाल्या की बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी बाल हक्क सरंक्षण आयोग काम करीत आहे. त्याचबरोबर बाल मजुरी रोखण्यासाठीही कायद्याने प्रतिबंध केला आहे. मुलांना प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क बजाविता यावा यासाठी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण, कुपोषण निर्मूलनासाठी पूरक आहार योजना, अंगणवाडी आदी अनेक योजना कार्यान्वित आहेत.  शासनाच्या या प्रयत्नांना समाजाच्या सर्व घटकांची जोड आवश्यक आहे.
           त्या म्हणाल्या की राज्यात आणखी 5 हजार अंगणवाड्यांची आवश्यकता आहे.  अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या मुलांचे पुनर्वसन व्हावे म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आपल्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
          झोपडपट्यांमधील दारिद्रय, मूलभूत सेवांचा अभाव, अनारोग्य, रोजगाराचा अभाव, स्त्रीभ्रुण हत्या, मुलगा - मुलगी भेदभाव आदि अनेक समस्या आहेत.  या समस्या प्रथम समजून घेतल्याशिवाय त्या -सोडविता येणार नाहीत, असे प्रा.गायकवाड म्हणाल्या. या कार्यशाळेतून चांगले मुद्दे मिळतील. त्यांचा उपयोग बाल हक्कांच्या धोरणासाठी, अंमलबजावणीसाठी होईल.      
              प्रा.फौजिया खान म्हणाल्या की, शिक्षण हाच सर्व समस्यांवरचा उपाय आहे.  मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.  आजची बालके उद्याचे भविष्य आहे. हा दृष्टीकोन ठेऊन त्यांच्या विकासाकडे पाहिले पाहिजे.  बाल हक्क आयोगाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. बालकांच्या शिक्षण, आरोग्य, कुपोषण, स्त्रीभ्रुण हत्या आदि प्रश्नावर काम करण्याची आवश्यकता आहे.  बालकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे गरजेचे आहे.
           या कार्यशाळेत खासदार एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव ए.एन. त्रिपाठी, हरीजन  सेवक संघाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीदास, गांधी शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती राधा भट्ट, आसाम बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुचित्रा कोकटे, गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती समीरा काझी, अखिल भारतीय आदिम जाती संघाचे अध्यक्ष बनवारीलाल गौड, श्रीमती उषाबेन ठक्कर, डॉ. टी.एस.एन.शास्त्री, सुरेशभाई परमार, रमेशचंद्र शर्मा, डॉ. डी.ए. पटेल, जोसेफीन ॲन्थोनी, श्रीमती सोनिया नागराळे, डॉ. वीणा आर. पुनाचा, जयेशभाई पटेल, प्रा.डॉली सन्नी, डॉ. के.पी. आशा मुकुदंन, डॉ. प्रिती वर्मा, रोशन अय्यर, झुमेरलाल शर्मा, रमेशचंद्र शर्मा आदी मान्यवरांनी या कार्यशाळेत भाग घेतला.
            या कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी,अंगणवाडी सेविका, समाज विज्ञान शाखेचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठविषयक कायदे बनविताना अल्पसंख्याक समाजाचे हितरक्षण - राजेश टोपे


मुंबई, दि. 31 : विद्यापीठविषयक कायद्यांची निर्मिती करताना अल्पसंख्याक समाज तसेच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचे घटनात्मक हक्क अबाधीत राखले जातील अशी ग्वाही उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यावेळी उपस्थित होते.
मंत्रालयात श्री. खान यांच्या दालनात आज याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. भाषिक धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष पी. ए. ईनामदार, अंजुमन - - ईस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या मागणीवरुन ही बैठक बोलाविण्यात आली होती.
राज्यात विद्यापीठांविषयीचे Maharashtra public universities Act 2011 खासगी विद्यापीठांविषयीचे Maharashta Self financed universities (establishment & regulation) Act 2010 हे कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. या कायद्यांची निर्मिती करताना अल्पसंख्याक समाजाचे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचे हक्क अबाधीत राखले जातील, अशी ग्वाही श्री. टोपे यांनी दिली. अल्पसंख्याक समाजाला उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून अल्पसंख्याक विषयक कायदे बनविताना त्यांच्या हिताचे हक्कांचे संपूर्ण संरक्षण केले जाईल, असे यावेळी श्री. नसीम खान यांनी सांगितले.

दिलखुलास कार्यक्रमात नितीन राऊत


मुंबई, दि. 31 : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनलयाच्या दिलखुलास कार्यक्रमात राज्यातील रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी याविषयीची माहिती रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत देणार आहेत.
            ही मुलाखत दि. 1, 2, 3 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन प्रसारित केली जाणार आहे. ही मुलाखत श्रीमती वासंती वर्तक यांनी घेतली आहे.

राज्यात आज महसूल दिन
        मुंबई, दि. 31 : 1 ऑगस्ट 2002 पासून महसूल दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  दरवर्षी प्रमाणे या वर्षीही उद्या    1 ऑगस्ट रोजी हा दिन साजरा केला जाणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी, महसूली वसुलीचे उद्दिष्ठ ओलांडण्याकरिता तसेच महसूल खात्याच्या मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता अथव प्रयत्न करतात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्याकरिता दरवर्षी महसूल दिन साजरा करण्यात येतो.
महसूली वर्ष हे 1 ऑगस्ट ते 31 जुलै असे असते.  नवीन वर्षाची मागणी निश्चित करण्याचे काम 1 ऑगस्टपासून सुरु होत असते. तलाठी हा दरवर्षी 31 जुलै रोजी आपले गावबंदी करुन आपला वर्षाचा हिशोब पूर्ण करीत असतात.  सन 2011-12 या महसूली वर्षात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव महसूल दिनी करण्यात येतो. 

गाव व वाड्यांना 1980 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

मुंबई, दि. 31 : राज्यात 27 जुलै 2012 रोजी संपलेल्या आठवड्यात 1485 गावे आणि 6086 वाड्यांना 260 शासकीय व 1720 खासगी अशा एकूण 1980 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. जिल्हानिहाय पाणी पुरवठा करण्यात आलेल्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
नाशिक- 121 गावे, 256 वाड्या, 31 शासकीय टँकर्स, 62 खासगी टॅंकर्स;  धुळे- 2 गावे, 2 शासकीय टँकर्स; जळगांव- 30 गावे, 7 शासकीय टँकर्स, 13 खासगी टँकर्स; अहमदनगर- 236 गावे,  1079 वाड्या, 17 शासकीय टँकर्स, 245 खासगी टँकर्स;  पुणे- 94 गावे, 629 वाड्या, 35 शासकीय टँकर्स, 119 खासगी टँकर्स ; सातारा -192 गावे, 876 वाड्या, 17 शासकीय टँकर्स, 248 खासगी टँकर्स ;  सांगली- 179 गावे, 1549 वाड्या, 10 शासकीय टँकर्स, 250 खासगी टँकर्स ; सोलापूर- 181 गावे, 1435 वाड्या, 1 शासकीय टँकर, 294 खासगी टँकर्स; कोल्हापूर- 1 गाव, 2 शासकीय टँकर्स;  औरंगाबाद- 69 गावे, 1 वाडी, 18 शासकीय टँकर्स, 70 खासगी टँकर्स ; जालना-  43 गावे, 14 वाड्या, 18 शासकीय टँकर्स, 31 खासगी टँकर्स; बीड- 176 गावे, 205 वाड्या, 24 शासकीय टँकर्स, 144 खासगी टँकर्स;  परभणी- 3 गावे, 3 वाड्या, 7 शासकीय टँकर्स; नांदेड- 25 गावे, 33 वाड्या, 39 शासकीय टँकर्स, 17 खासगी टँकर्स ; उस्मानाबाद -61 गावे, 6 वाड्या, 7 शासकीय टँकर्स, 182 खासगी टँकर्स;  अमरावती- 8 गावे, 4 शासकीय टँकर्स ; अकोला- 7 गावे, 9 शासकीय टँकर्स, 1 खासगी टँकर; बुलढाणा- 41 गावे, 1 शासकीय टॅंकर; 44 खासगी टँकर्स नागपूर- 15 गावे, 10 शासकीय टँकर्स;  वर्धा- 1 गाव, 1 शासकीय टँकर.

Monday, 30 July 2012

"जय महाराष्ट्र" कार्यक्रमात आज डॉ.सुरेश बारपांडे


"जय महाराष्ट्र" कार्यक्रमात
आज  डॉ.सुरेश बारपांडे

       मुंबई, दि. 30 :  माहिती    जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या "जय महाराष्ट्र", कार्यक्रमात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबादचे अधिष्ठाता डॉ. सुरेश बारपांडे यांची  थेट मुलाखत  मंगळवार  दि. 31 जुलै 2012 रोजी  रात्रौ 8 ते 9 या वेळेत प्रसारित होणार आहे.
          या मुलाखतीत दंत आरोग्याच्या सोयी-सुविधा या विषयावर चर्चा करण्यात येणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपलक्ष्मी शिंदे करणार आहेत.
* * * * *

मंत्रालय लोकशाही दिन
6 ऑगस्ट रोजी
मुंबई, दि. 30 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी ज्या अर्जदाराने अर्जाच्या प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत त्यासह आवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडल्या असतील  व अर्ज स्वीकृतीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. अशाच अर्जदाराना मंत्रालयात लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांना समक्ष निवेदन करण्यासाठी सोडण्यात येईल.
* * * * *

अण्णा भाऊ साठे पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते बुधवारी वितरण


मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त बुधवार दि. 1 ऑगस्ट  2012 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन 2012-13 च्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार आहेत. 
            महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक आणि समाजसेवक यांना आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा अण्णा भाऊ साठे पुरस्कार दिला जातो.  प्रतिवर्षी 25 व्यक्तीं आणि 6 संस्था यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.  या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रुपये 25 हजार प्रती व्यक्तिस व संस्थेसाठी रोख रुपये 50 हजार असे आहे.
            या कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना कर्जाचे व अनुदानाचे धनादेश तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण केले जाणार आहे.
            सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती कार्यमंत्री, शिवाजीराव मोघे, ग्रामविकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, रोहियो व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत,  महिला व बालविकास, मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय, राज्यमंत्री, सचिन अहिर, आमदार तथा अध्यक्ष, अनुसूचित जाती कल्याण समिती, रमेश बागवे, मुंबई महानगरपालिकेचे, महापौर सुनील प्रभू, आमदार श्रीमती ॲनी शेखर, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
                                                                              * * * * * *

Saturday, 28 July 2012

पत्रकार कल्याण निधीत तीन कोटीची वाढ-मुख्यमंत्री


मुंबई दि. २८ : पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत तीन कोटी रुपयांनी वाढ करून ही रक्कम पाच कोटी रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
मुंबई मराठी  पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पुढारीकार डॉ.ग.गो. जाधव पत्रकारिता  पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार  कुमार केतकर यांना देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.   

मुंबई मराठी  पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास मटाले,पुढारी वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव,संघाचे कार्यवाह प्रभाकर राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पत्रकारिता ही सदैव सामाजिक हितासाठीच असली पाहिजे. निव्वळ नकारात्मक बातम्यांना स्थान न देता  विकासाला पूरक वृत्तांकन झाल्यास समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होईल. राज्य शासनाने जनकल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.प्रशासनात पारदर्शकता आली आहे. माहितीचा अधिकार कायदा महत्वाची भूमिका बजावत आहे.आजही इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. हौसिंग रेग्युलेटिंग सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुमार केतकर यांचा गौरव करून मुख्यमंत्री म्हणाले की,त्यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार म्हणजे पत्रकारितेचा सन्मान आहे. श्री. केतकर यांनी नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले मत मांडले आहे.   केतकर आज ज्येष्ठ विचारवंताची भूमिका बजावत असून जनमत तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

सत्काराला उत्तर देताना  कुमार केतकर म्हणाले की, पत्रकारांनी केवळ वाईट घडामोडीचे वृत्त  देता अधिकाधिक चांगल्या आणि विकासशील घडामोडींचे वार्तांकन करावे.फक्त नकारात्मक लिहून आपण समाजात असंतोष वाढवण्याचे काम करतो आहोत. हे प्रमाण वाढले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल. भारतात जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे जगात कुठेच नाही. पत्रकारांनी समाजाकडे अधिक प्रगल्भ नजरेने पहिले पाहिजे.

यावेळी पत्रकार देवेंद्र गावंडे यांचाही पुरस्कार देऊन  सत्कार करण्यात आला. प्रारंभी संघाचे अध्यक्ष देविदास मटाले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजयकुमार बांदल यांनी केले. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Friday, 27 July 2012

रोजगार मेळावा


खादी व ग्रामोद्योग मंडळातील सचिव व सहाय्यक सचिव
पदाकरिता 31 जुलै पर्यत अर्ज करावेत
     जळगांव, दि. 27 जुलै – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापवनेवरील सचिव (120 पदे) व सहाय्यक सचिव (201 पदे ) भरण्यासाठी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुनयात महारार्ष्ट ज्ञान महामंडळ पुणे  ( एम के सी एल) या शासनमान्य संस्थेमार्फत अर्ज मागविण्यांत आलेले होते.
      अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 जुलै 2012 पर्यत वाढविण्यात आलेली आहे. कृपया अर्हता प्राप्त  उमेदवारांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ( एच के सी एल ) सेंटरवर दिनांक 31 जुलै 2012 पर्यत परस्पर अर्ज भरावेत असे आवाहन सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार जळगांव यांनी केले आहे.
                 


31 जुलै  रोजी ॲप्रेटिस भरती मेळावा

      जळगांव, दि. 27 :- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कार्यालया मार्फत अधिक दोन स्तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्मातील इयत्ता 12 वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी ( ॲप्रेटिस ) भरती मेळावा डॉ. अण्णासाहेब जे. डी. बेडाळे महिला महाविद्यालय, जळगांव यांच्या लेवा बोडिंग सरस्वती हॉल मध्ये दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11-30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जळगांव यांनी केले आहे.  


 जळगांवात  विभागीय रोजगार मेळावा 29 जुलै रोजी

        जळगांव, दि. 27 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद् कार्यालयामार्फत 29 जुलै 2012 रोजी सकाळी 11-00 वाजता सरदार लेवा हॉल आंबेडकर मार्केट जवळ टेलीफोन ऑफिसमागे जळगांव येथे राज्यमंत्री रोजगार व स्वयंरोजगार  तथा पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर  यांचे प्रमुख उपस्थितीत विभागीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 1054 रिक्तपदांची मागणी  अधिसूचत केलेली आहेत. यात धूत ट्रान्समिशन  प्रा. लि. औरंगाबाद ( 160 पदे) पॅजिओ व्हेईकल्स प्रा. लि. बारामती (410 पदे) तुलसी एक्सटूजन लि. ( 30 पदे) सुपीम इलेक्ट्रीज जामनेर ( 4 पदे ) व महिंद्रा ॲड महिंद्रा सातपूर (450 पदे )  आदि खाजगी कंपन्यांना  आय टी आय एससीव्हीसी, ग्रूज्युट बी. कॉम आदि  अभ्यासकमातील उमेदवारांची आवश्यकता आहे
.


शासकीय तांत्रिक विद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरु

      जळगांव, दि. 27 :- येथील शासकीय तांत्रीक विद्यालयात 10 वी उत्तीर्ण  विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर टेक्नीक ( 20 जागा ) मॅकॅनिकल्‍ टैक्नॉलॉजी (20 जागा ) व मेन्टेजन्म ॲड रिपेअर्स ऑफ डोमेस्टिक ॲलायन्सेस ( 20 जगा ) या व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश सुरु असल्याचे मुख्याध्यापक पी. के.  चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                00000

लोकराज्य मधील माहिती स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त - शिक्षणाधिकारी ‍ शशिकांत हिंगोणेकर


जळगांव, दि. 27 :-  लोकराज्य मासिकामधील माहिती साहित्य विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त असल्याने प्रत्येक शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार  व्हावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शशिकांत हिंगोणेकर यांनी भुसावळ येथील सेंट आलायसेस हायस्कूलच्या सभागृहात आयोजित मुख्यध्यापकांच्या सहविचार सभेत केले.
     यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा नाशिक मंडळाचे  विभागीय सचिव भगवान सुर्यवंशी, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी एल. जी. सोनवणे, एस. ई चौधरी, सेंट अलायसेस हायस्कूलच्या मुख्याध्यापीका सिस्टर अल्फासो, सेंट अलायसेस संस्थेच्या अध्यक्षा सिस्टर फिल्डा जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे आदि उपस्थित होते.
     लोकराज्य अंकामधील माहिती वाचून आपल्या ज्ञानात भर पडत असल्याने सर्व शिक्षक वर्गाने लोकराज्य अंकाचे सातत्याने वाचन केले पाहिजे तसेच विद्यार्थ्यानीही लोकराज्य अंकाबद्दल मार्गदर्शन केल्यास भविष्य काळात त्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षा देताना लोकराज्य मासिक हे एक मार्गदर्शक ठरेल असे श्री. हिंगोणेकर यांनी  सांगितले.
     लोकराज्य अंकामध्ये प्रसिध्द होणा-या विविध योजना, यशकथा आदिबरोबरच लोकराज्य मासिकाचे मराठी भाषा, चित्रलिपी, शेती, ग्रंथ वाचन, शिक्षण  आदि विषयावरील विशेषा अंकाची माहिती जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी उपस्थिंना करुन दिली. तसेच लोकराज्य मासिक शिक्षक व विद्यार्थ्याकरिता अत्यंत उपयुकत असलयाने त्यांनी लोकराज्याचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन  श्री. वसावे यांनी केले.
     प्रारंभी लोकराज्य मासिकाचा जुलै 2012 चा शिक्षण विषयक विशेषांक रजेसिंग वसावे यांनी विभागीय सचिव भगवान सुर्यवंशी व शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी भेट म्हणून दिला.
     सदरच्‍या कार्यशाळेच्या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आलेला होता. या स्टॉलला मुख्याध्यापकांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद  दिला व लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदारही बनविले.
                                0000

Thursday, 26 July 2012

19 वर्षाखालील खेळाडूंचे प्रस्ताव स्विकारण्यास मुदतवाढ


जळगांव, दि. 26 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा फेबू / मार्च 2012 परीक्षेस प्रविष्ठ झालेले  व सन 2011-12 या वर्षी खुल्या वयोगटातील क्रीडा स्पर्धामध्ये खेळलेल्या 19 वर्षाखालील खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यास शासनाने दिनांक 31 जुलै 2012 पर्यत मुदतवाढीस खास बाब म्हणून मान्यता दिलेली असल्याने अशा खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिनांक 31 जुलै 2012 पर्यत गुणपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसह मंडळ कार्यालयात स्विकारण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी, विद्यार्थी व पालकांनी तसेच सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे विभागीय सचिव महाराष्ट् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार- मुख्यमंत्री


मुंबई, दि. 26 : राज्यातील माजी सैनिक, देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या  वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
            कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 26 जुलै,  हा कारगील विजय दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. 13 वा कारगील विजय दिवसाचा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार श्रीमती ॲनी शेखर, मेजर जनरल राजेश बावा, ले.जनरल राजीव चोप्रा आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माजी सैनिक तसेच देशाच्या संरक्षणासाठी विविध मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहेत. माजी सैनिकांच्या अनुदान योजनेत, पेन्शन, तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कार रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. माजी सैनिकांना पोलीस दलात भरती होता यावे  यासाठी असणाऱ्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. असे असले तरी आजही माजी सैनिकांचे कांही प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आणि जे दिले त्यापेक्षा अधिक देण्यासाठी शासन प्रयत्न करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कारगिल युध्दात देशाच्या सैनिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन विजय मिळविला. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण देश नेहमी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबाचा त्याग मोठा आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासन तत्परतेने निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिकांना तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना समाधानी ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
            प्रारंभी शहीद जवानांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार,आणि उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली.                        
        याप्रसंगी देशाच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या आणि विविध मोहिमेत शौर्य गाजविलेल्या जवानांना, मोहिमेत शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा धनादेश तसेच ताम्रपट देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्याची नावे पुढील प्रमाणे -
            शहीद जवान मेजर अतुल उत्तमराव गर्जे यांच्या वीरपत्नी श्रीमती हर्षला अतुल गर्जे, रुपये 3 लाख व ताम्रपट, वीरपिता श्री. उत्तमराव दामोदर गर्जे, रुपये 1 लाख, वीरमाता सौ. चंद्रभागा उत्तमराव गर्जे, रुपये 1 लाख;  शहीद जवान लान्स नायक दयानंद नागनाथ पाटोळे यांच्या वीरपत्नी श्रीमती चंचला दयानंद पाटोळे, रुपये 3 लाख व ताम्रपट,  वीरपिता श्री. नागनाथ श्रीपती पाटोळे, रुपये 1 लाख, वीरमाता सौ. भारतबाई नागनाथ पाटोळे, रुपये 1 लाख;  लान्स दफेदार दिपक लक्ष्मण धायगुडे यांना रुपये 3 लाख आणि ताम्रपट;  शिपाई संदीप शामराव मगदूम यांना रुपये 1 लाख व ताम्रपट;  मेजर वरुण विजय गिध, सेना पदक यांना रुपये 5 लाख; मेजर प्रणय पद्माकर पवार, रुपये 5 लाख; शिपाई मनोज शामरावजी राजूरकर यांना रुपये 5 लाख व  ब्रिगेडिअर अरुण बी. हरोलीकर यांच्या पत्नी श्रीमती जया अरुण हरोलीकर यांना निवृत्तीवेतनाचा रुपये 1 लाख 33 हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
        सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
        या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सुब्रत रथो, राज्याच्या विविध भागातील माजी सैनिक उपस्थित होते.
0 0 0 0 0