Tuesday, 22 April 2014

लोकसभा निवडणुक 2014 करिता चाळीसगांव महसुल व पोलीस प्रशासन सज्ज



लोकसभा निवडणुक 2014 करिता
चाळीसगांव महसुल व पोलीस प्रशासन सज्ज


            चाळीसगाव, दिनांक 22 एप्रिल :- 24 एप्रिल, 2014 रोजी होणा-या लोकसभा निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर 017 चाळीसगांव मतदार संघातील निवडणुकीसाठी महसुल व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे
            चाळीसगांव विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 327 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून पैकी शहरी भागात 71 व ग्रामीण भागात 256 असे एकूण 327 मतदान केंद्र स्थापीत करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष-1, मतदान अधिकारी-3 पोलीस कर्मचारी-1 व शिपाई-1 या प्रकारे कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रीयेमध्ये एकूण 20 उमेदवार व 1 नोटा असे एकूण 21 उमेदवारांची संख्या असल्याने दोन बॅलेट युनिट व 1 कंट्रोल युनिट असणार आहे. मतदान प्रक्रीया सुरु होण्याअगोदर प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपॉल घेण्याच्या सुचना संबंधितांना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
            चाळीसगांव मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 3,14,888 इतकी असून पैकी पुरुष मतदार 1,69,001 व स्त्री मतदार 1,45,887 अशी आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व आण्ण्यासाठी वाहतुक आराखडयानुसार 42 बसेस, 8 मिनी बस, 22 जिप असे एकूण 72 वाहनांचे नियोजन करण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकुण 9 अधिकारी, 237 पोलीस कर्मचारी व 93 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पोलीस मुख्यालय, जळगांव, चाळीसगांव, अमळनेर, मेहुणबारे व पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथुन पोलीसांची कुमक मागविण्यात आली आहे. दिनांक 23 एप्रिल, 2014 रोजी चाळीसगांव शहरातील राष्ट्रीय विद्यालय, हिरापुर रोड येथुन मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

या वेळी प्रथमच मोठया प्रमाणात ई.डी.सी. व पी.बी. प्रमाणपत्राचे वाटप

            मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रथमच मोठया प्रमाणात ई.डी.सी. (निवडणुक कार्य प्रमाणपत्र) एकुण 1350  व पी.बी. (टपाली मतपत्रीका) एकूण 165 चे वाटप करण्यात आले आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी हे जळगांव जिल्हयातील विविध तालुक्यातून नियुक्त केल्याने मतदान संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मुख्यालयी जाणेसाठी साहित्य संकलन केंद्र राष्ट्रीय विद्यालय येथुन शेवटचा कर्मचारी जाईपर्यंत पेमेंट बेसिसवर जादा बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याच बरोबर नियुक्त अधिकारी कर्मचा-यांना 23 व 24 एप्रिल रोजीची भोजन व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. बाहेर तालुक्यातील मतदान अधिकारी कर्मचा-यांना बसच्या प्रवास भाडे रक्कमही देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणा-या कामगारांना मतदान करण्यासाठी सुटी जाहिर करण्यात आली असून. लोकसभा निवडणुकीसाठी पुर्ण वेळ सुटी देण्याच्या सुचना कामगार कार्यालयाने दिल्या आहेत. कामगारांनीही मोठया प्रमाणात मतदान प्रक्रीयेत सहभाग नोंदवून मतदान करावे असे आवाहनही सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे. यावेळी मतदान प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला असून सकाळी 07:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस निरीक्षक संजय देशमुख

017 चाळीसगांव मतदार संघातील निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून चाळीसगांव पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 218 मतदान केंद्र येत आहेत. येथील निवडणुक कर्तव्यावर एकूण 9 अधिकारी, 237 पोलीस कर्मचारी व 93 होमगार्ड असे एकूण 339 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी प्रशिक्षणार्थी पीएसआय 2 व स्थानिक अधिकारी 7, जळगांव पोलीस मुख्यालय-107, चाळीसगांव-35, अमळनेर-40, मेहुणबारे-10, जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 35 व 10 महिला पोलीस कर्मचारी व 93 होमगार्ड अशी कुमक मागविण्यात आल्याचे चाळीसगांव पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले आहे.
तर मेहुणबारे पोलीस हद्दीत एकूण 109 मतदान केंद्र असून यासाठी एकूण 6 अधिकारी, 90 पोलीस कर्मचारी व 65 होमगार्ड असे एकूण 161 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी स्थानिक 2 अधिकारी व 4 नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी तर पोलीस कर्मचा-यांमध्ये 40 स्थानिक व 50 नागपुर रेल्वे पोलीस कर्मचारी, होमगार्ड मध्ये 20 स्थानिक व 45 भुसावळ असे एकूण 161 अधिकारी कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर नियुक्त केल्याचे मेहुणबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांनी कळविले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान प्रक्रीया भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी  तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चाळीसगांव पोलीस स्टेशनतर्फे शहरात रुट मार्च काढण्यात आला असून मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सर्व मतदारांना केले आहे.


* * * * * * * *

Friday, 18 April 2014

चाळीसगाव येथील निवडणुक प्रशिक्षण शिबीरास जिल्हाधिका-यांनी केले मार्गदर्शन


चाळीसगाव येथील निवडणुक प्रशिक्षण शिबीरास
जिल्हाधिका-यांनी केले मार्गदर्शन


            चाळीसगाव, दिनांक 18 एप्रिल :- जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित अखेरच्या निवडणुक प्रशिक्षण शिबीरास भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना निवडणुक कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, नायब तहसिलदार ए.एम.परमार्थी यांच्यासह महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            येथील अखेरच्या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी मतदान अधिका-यांना दिनांक 23 व 24 तारखेच्या कार्यपध्दतीबाबत योग्य त्या सुचना देऊन निवडणुक कामाची महत्वपुर्ण जबाबदारी आपल्यावर असुन ती योग्यरितीने पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.  
            यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, चाळीसगांव मतदार संघात एकूण 327 मतदान केंद्र असुन एकुण उमेदवारांची संख्या 21 असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट असणार आहे. असे या मतदार संघात एकुण 654 बॅलेट युनिट व 327 कंट्रोल युनिट राहणार असुन याच्या 10 टक्के जादा बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हे राखीव ठेवण्यात येणार आहे. याकरिता पुर्व तयारी म्हणून या बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची तपासणी व मुलभूत सेटींग्ज करण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात सेटींग्ज व सिलींग चे कामकाज पुर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            या वेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत गरजा जसे फर्निचर, विज, पाणी आदि सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे सांगितले तर आचारसंहिता कक्ष प्रमुख नानासाहेब आगळे यांनी आचारसंहिता भंगाच्या एकूण 3 तक्रारी प्राप्त झाल्या असुन पैकी 2 तक्रारी अर्ज निर्गत व एक तक्रार अर्ज खुलास्या अभावी प्रलंबीत असल्याची माहिती  यावेळी दिली.

                                               * * * * * * * *

Wednesday, 16 April 2014

मतदानासाठी अंगणवाडी सेविकांना प्रांताधिका-यांनी दिली शपथ


मतदानासाठी अंगणवाडी सेविकांना
प्रांताधिका-यांनी दिली शपथ

            चाळीसगाव, दिनांक 16 एप्रिल :- मागील मतदानाची कमी टक्केवारी पहाता महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी दिसुन आलेली उदासिनता घालविण्यासाठी महिलांशी थेट संपर्क होणा-या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविकांचा मेळावा परदेशी बोर्डींग हॉल येथे आयोजित करुन त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी शपथ दिली. तसेच आपला संपर्क हा थेट महिला वर्गाशी होत असल्यामुळे निवडणुक आयोगाच्या मतदार शिक्षण कार्यक्रम (sveep) च्या अनुषंगाने आपण प्रत्येक घरा-घरात जाऊन महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.
            अंगणवाडी सेवीकांना मार्गदर्शन करतांना प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, आपण दैनंदिन करित असलेल्या कामकाजात जसे महिला व बालकांचे संगोपनाबाबत काम करित असतात त्याच पध्द्तीने या बालकांच्याच भविष्यासाठी व लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच चांगले सरकार देण्यासाठी आपण मतदान करा असा संदेश प्रत्येक महिला मतदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही त्यांनी यावेळी या महिला कर्मचा-यांवर सोपविली. त्याच बरोबर मतदानाच्या दिवशी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी  मतदान केंद्रावर जाऊन महिला पुरूषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यास मदत करणे, तसेच बाहेरुन येणा-या मतदान केंद्रावरील कर्मचा-यांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यासाठी  आवाहन केले.
तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक संपन्न
पोलीस पाटलांनी आपल्या पदनामातील पोलीस या शब्दाची व्याख्या ओळखुन निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या उपक्रमातील शस्त्र साठा, मद्य साठा व रोख रकमेची वाहतुक या विषयी काही बाबी आढळुन आल्यास महसुल व पोलीस प्रशासनास अवगत करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले यावेळी केले. त्याच बरोबर या निवडणुक कालावधीत रहिवास दाखल्या प्रमाणेच इतर प्रकारचे दाखले देतांनाही काळजी घ्यावी व पोलीस पाटील या नात्याने सर्वसामान्य नागरिकांशी  आपला संपर्क सातत्याने येत असल्याने आपणही नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करुन आपल्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहयोग करण्यासाठीचे आवाहन केले.


* * * * * * * *

Sunday, 13 April 2014

सर्वाधिक मतदान होणा-या केंद्रावरील बी.एल.ओ.चा गौरव करणार : निवडणुक निरीक्षक व्हि.पलानी चामी



सर्वाधिक मतदान होणा-या केंद्रावरील
 बी.एल.ओ.चा गौरव करणार
                                                 : निवडणुक निरीक्षक व्हि.पलानी चामी

            चाळीसगाव, दिनांक 13 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर सर्वाधिक मतदान होणा-या केंद्राच्या बी.एल.ओ. चा सर्वोत्कृष्ट बि.एल.ओ. म्हणुन प्रमाणपत्र देऊन गौरव करणार असल्याचे प्रतिपादन निवडणुक निरीक्षक व्हि.पलानी चामी यांनी आज येथील हंस चित्रपट गृहात आयोजित बि.एल.ओ.प्रशिक्षण शिबीरात केले. यावर्षी प्रथमच निवडणुकीमध्ये मतदान चिठ्ठीचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज सर्व बी.एल.ओ. यांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. तसेच मतदान चिठ्ठीचे वाटप करण्याच्या हेतुने प्रत्येक घरा-घरापर्यंत जाऊन केवळ मतदान चिठ्ठी न देता संकल्प पत्र भरुन घेणे, मतदानाविषयीचे महत्व मतदारांना पटवून देणे तसेच निवडणुक कामात तळागाळापर्यंत जाऊन मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी बी.एल.ओ.नी यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहनही त्यांनी या प्रशिक्षण शिबीरात केले.
            या प्रशिक्षण शिबीरास सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.व्हि.भोकरे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार सुर्यवंशी यांच्या सह सेक्टर ऑफीसर, एन.जी.ओ., कॅम्पस ॲम्बेसेडर व बी.एल.ओ. मोठया संख्येने उपस्थित होते.
            प्रथम मार्गदर्शन करतांना श्री.चामी म्हणाले की, मतदान चिठ्ठी वाटपाचे काम संवेदनशिल असून एक गठ्ठा स्लिपा कुणाकडेही सोपवू नका तर प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्यांचे वाटप करा या निमीत्ताने मतदारांमध्ये जनजागृती करण्याची संधी आपल्याला मिळाली असून आपल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी मनापासून काम करा व बेस्ट बी.एल.ओ. च्या स्पर्धेत उतरा. भारतात महाराष्ट्र्‍ हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते तरी या प्रगत राज्यात मतदानाची टक्केवारी वाढवून राज्याच्या प्रगतीमध्ये हात भार लावा. असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

बी.एल.ओ.नी निवडणुक कामात कुचराई करु नये : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

बी.एल.ओ. यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ओळखुन कामाला लागावे, मतदान चिठ्ठी मिळाली नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित बी.एल.ओ.वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदारांनी आपल्याला मतदान चिठ्ठी न मिळाल्यास तहसिल कार्यालयातील आचार संहिता कक्षाशी संपर्क साधावा अथवा आचार संहिता कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02589-224022 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन सर्व मतदारांना सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
            श्री.चामी यांनी बी.एल.ओ. प्रशिक्षणानंतर सर्व सेक्टर अधिकारी, कॅम्पस ॲम्बेसेडर, एन.जी.ओ. यांच्याशी संवाद साधुन त्यांनी केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेतला व सविस्तर मार्गदशनही केले. त्यानंतर श्री.चामी यांनी शासकीय विश्रामगृहात संपुर्ण पोलीस यंत्रणेची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. त्यानंतर शहरातील अंधशाळेतील मतदान केंद्रास तसेच पातोंडा व वाघळी येथील काही मतदान केंद्रांची पहाणी करुन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. शेवटी लोकसभा निवडणुक कामकाजात चाळीसगांव प्रशासनाने केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन निवडणुक  कामासाठी शुभेच्छाही दिल्या.

                                                           * * * * * * * *

Saturday, 12 April 2014

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक : निवडणुक निरीक्षक डॉ.अवतारसिंग


मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे
 मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक
                                                          : निवडणुक निरीक्षक डॉ.अवतारसिंग

            चाळीसगाव, दिनांक 12 एप्रिल :-  मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक असुन आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही निष्ठापुर्ण व निपक्षपातीपणे पार पाडण्याची महत्वपुर्ण जबाबदारी ओळखुन कामकाज केल्यास अडचण येणार नाही असे मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ.अवतार सिंग यांनी चाळीसगांव येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना सांगितले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  काय करावे व काय करु नये याविषयीचे मार्गदर्शन करुन अंध व अपंग मतदारांच्या मतदानाविषयीची कार्यपध्दतीही त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचा-र्यांना समजावून सांगितली.
                या वेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सोनार, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार सुर्यवंशी, मंडळ अधिकारी निकुंभ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी  म्हणून  यावेळी तब्बल 1500 अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षण शिबीरास उपस्थित होते.
                या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदान केंद्रामध्ये छायाचित्र किंवा चित्रीकरण करण्यास निवडणुक आयोगाने मनाई केली आहे. तरी मतदान केंद्रामध्ये छायाचित्र अथवा चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्याबाबत सांगितले. त्याच बरोबर मॉकपॉल चे प्रात्यक्षिक देणे, घोषणापत्र, अहवाल व विविध नमुने भरण्याविषयी आवश्यक ते मार्गदर्शनही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थितांना केले. त्याच बरोबर याठिकाणी मतदार मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी निवडणुक कर्तव्यावर असणा-या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी आपल्या स्वत:च्या मतदानासाठी ई.डी.सी. फॉर्म भरुन देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणु‍क निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची पहाणी
निवडणुक प्रशिक्षणांनतर मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ.अवतार सिंग यांनी  अल्पसंख्याक असलेल्या मतदान केंद्रांना  तसेच तालुक्यातील दुर्गम भागातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रांची पहाणी व तेथील सोयी सुविधांविषयीची सर्व माहिती जाणून घेतली यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख मुख्याधिकारी रविंद्र जाधव व महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पहाणी दरम्यान त्यांनी  चाळीसगांव शहरातील मतदान केंद्र काद्रीया एज्युकेशन तहसिब हायस्कुल येथील मतदान केंद्र क्रमांक 204 ते 209 तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीतील  मतदान केंद्र कं. 219 तसेच राष्ट्रिय विद्यालय येथील मतदान केंद्रं. क्रं. 187, 190 व 197 यांच्यासह ग्रामीण भागातील टाकळी, पिलखोड येथील मतदान केंद्रांची पहाणी केली. तसेच मतदान साहित्य ठेवण्यात येणा-या स्ट्राँग रुमची पहाणी देखील निवडणुक निरीक्षकांनी  यावेळी केली व चाळीसगांव प्रशासनाने केलेल्या निवडणुक कार्यक्रमाच्या तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  
निवडणु‍क कामात हलगर्जीपणा करणा-यांवर कडक कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 ची जबाबदारी ज्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी या कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याच्या सुचनाही सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबीरात केल्या आहेत. तसेच या प्रशिक्षण शिबीरास अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांना देखील नोटीसा बजावून त्यांच्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या बाबतचे खुलासा पत्र मागविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीची जबाबदारी म्हणजे केवळ डयुटी म्हणून नाही तर आपणही देशाचे नागरिक असुन देशाचे आपण काही देणे लागतो, तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपलाही हातभार याठिकाणी लागावा ही भावना मनात ठेवून कर्तव्य बजवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

* * * * * * * *

Friday, 11 April 2014

निवडणुक काळात मद्यविक्रेत्यांवर महसुल व पोलीस प्रशासनाची करडी नजर : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


निवडणुक काळात मद्यविक्रेत्यांवर
महसुल व पोलीस प्रशासनाची करडी नजर
                                                              : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगाव, दिनांक 11 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने दिनांक 22 ते 24 एप्रिल, 2014 व दिनांक 16 मे, 2014 या कालावधीत मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 नुसार जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हयातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी जळगांव यांनी पारित केले असून मद्यविक्रेत्यांवर पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क व महसुल प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व मद्यविक्रेत्यांची आज तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते.  या बैठकीला सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते.
            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाने तिन प्रकारच्या कामकाजासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात प्रामुख्याने मतदार जागृती, उमेदवारांचे खर्च निरीक्षण व अवैध मद्य, शस्त्र  व रोख रक्कमेच्या वाहतुकीचे निरीक्षण केले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध मद्य साठा करुन त्याव्दारे मतदारांना प्रलोभन दाखविण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील सर्व मद्य विक्रेत्यांना एकत्रीत रित्या बोलावून बैठक घेण्याचा उद्देश प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांना बैठकीत विषद करतांना सांगितले की, आपली दुकाने व बियरबार धारकांनी  राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करावे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल. ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. अधिकृत परवानाधारकांनाच मद्यविक्री करण्यात यावी. विक्री मालाचे स्टॉक रजिष्टर अद्यावत ठेवण्यात यावे. निरीक्षकांच्या आदेशानुसार भरारी पथकाच्या कारवाईत मोठया प्रमाणात मद्यसाठा मिळून आल्यास पुरवठादाराचा तपास लावून पुरवठादारावर देखील कारवाई करण्याच्या सुचना असल्याने भविष्यात आपल्यावर या कटु कारवाईचा प्रसंग येणार नाही याची पुर्वकल्पना देण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमुद केले.

ड्राय-डे चे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करणार : पोलीस निरीक्षक संजय देशमुख

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 नुसार जिल्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी श्रीमती रुबल अग्रवाल (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी जळगांव यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व मद्यविक्री दुकाने दिनांक 22 ते 24 एप्रिल व 16 मे, 2014 रोजी बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. तरी त्या आदेशाच्या अनुषंगाने तालुक्यातील कुठेही मद्यविक्री सुरु असल्याचे दिसुन आल्यास कडक स्वरुपाची कारवाई करण्यात येईल अशा सुचना पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या व आपण भारताचे नागरिक या नात्याने निवडणुक प्रक्रीया मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आपले सहकार्य व योगदान महत्वाचे असुन ड्राय डे निमीत्त जरी आपला व्यवसाय बंद ठेवण्यात आला असला तरी आपण या सुटीच्या दिवशी आपल्यासोबत आपल्या ग्राहकांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.


* * * * * * * *

Tuesday, 8 April 2014

मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


मतदानाचा पवित्र हक्क बजावून
लोकशाही बळकट करावी
                                                              : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगावदिनांक 8 एप्रिल :- सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
            लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर महसुल प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करिता चित्ररथ तयार करण्यात आला असुन या चित्ररथाचे उदघाटन आज प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, नायब तहसिलदार ए.एम.परमार्थी आदि उपस्थित होते.
            यावेळी माहिती देतांना प्रांताधिकारी म्हणाले की, भारतीय दंड संहिता कलम 171(ख) नुसार निवडणुक काळात मतदान करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रलोभन किंवा अमिष देणे किंवा इतरांसाठी स्विकारणे हा गुन्हा असुन सदर गुन्हयासाठी 1 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपाची शिक्षा संबंधित व्यक्तीला होऊ शकते. तसेच कोणतीही व्यक्ती एखाद्या मतदाराला त्याचे इच्छे विरुध्द् जबरदस्तीने मतदान करण्यास भाग पाडेल किंवा त्याला कोणत्याही प्रकारची शारीरीक दुखापत करेल, धमकी देईल अशा व्यक्तीला 1 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपाची भारतीय दंड संहिता कलम 171(ग) नुसार संबंधित व्यक्तीला होऊ शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा या करिता महसुल प्रशासनाने विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले असुन त्याअनुषंगाने चित्रफित तयार करण्यात आली आहे व ही चित्रफित चित्रपट गृहात चित्रपट सुरु होण्याआधी व मध्यांतराच्या वेळी प्रसारण करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. सदर चित्रफितीचे प्रसारण हे स्थानिक केबलवरुनही सुरु करण्यात आल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले. मतदार जनजागृतीसाठी मतदारांकडुन संकल्प पत्र भरुन घेणे, गावागावात सभा घेऊन मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण देणे, मतदानासाठी प्रबोधन करणे, पोस्टर्स, बॅनर्स लावणे, मोबाईल व्हॅन व्दारे जनजागृती करणे असे विविध प्रकारचे कार्यक्रम महसुल प्रशासनाने हाती घेतले आहेत. महाविद्यालयांमध्ये युवा मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कॅम्पस ॲम्बेसेडरची नियुक्ती केल्याने मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पहाता तालुक्यातील आशा सेवीका व आरोग्य सेवीकांनाही मतदार जागृतीसाठी सहभागी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा मतदार संघातून आजतागायत 47,160 इतके संकल्प पत्र भरुन घेण्यात आले असून मोहिम सुरुच ठेवण्यात आली आहे. यावेळी किमान 75 टक्के पेक्षा अधिक मतदानाचे लक्ष प्रशासनाने निश्चित केल्याचेही यावेळी सांगितले.
            शहरातील मतदार जनजागृतीसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन नगर परिषदेमार्फतही मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले.
           

* * * * * * * *

Monday, 7 April 2014

प्राथमिक शाळा प्रवेश प्रक्रीया पारदर्शक व्हावी

प्राथमिक शाळा प्रवेश प्रक्रीया पारदर्शक व्हावी

            चाळीसगाव, दिनांक 7 एप्रिल :- नगर परिषद शिक्षण मंडळ, चाळीसगांवच्या कक्षेतील सर्व खाजगी प्राथमिक शाळांना शासन आदेश व बालकांचा शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 चे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी  नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांनी परिपत्रक निर्गमीत केले असून सर्व खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश प्रक्रीया पारदर्शकपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.
            बालकांना शाळेत प्रवेश देतांना कोणत्याही स्वरुपाची देणगी वा शुल्क आकारण्यात येऊ नये, शिक्षण हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, शाळेने आपल्या अधिकार क्षेत्रात प्रत्येक तुकडीस विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये, प्रत्येक शाळेत पहिलीच्या वर्गास 25 टक्क्यांपर्यंत जागा वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवण्यात याव्या तसेच अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पुर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे क्रमप्राप्त राहील. मात्यापित्याचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपये असल्यास त्यांच्या आपत्यांना दुर्बल गटातील बालकांना समाविष्ठ करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वहया, पुस्तके इतर स्टेशनरी विकता येणार नाही. शालेय साहित्य कोठेही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य पालक व विद्यार्थी यांना राहील. अशा विविध प्रकारच्या सुचना प्रशासन अधिकारी यांनी परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना केल्या असुन. या परिपत्रकाची अंमलबजावणी सर्व संबंधितांनी काटेकोरपणे करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

* * * * * * * *
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने
पत्रकार परिषदेचे आयोजन

चाळीसगाव, दिनांक 7 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या अनुषंगाने चाळीसगांव महसुल प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करिता चित्ररथ तयार करण्यात आला असून या चित्ररथाचे उदघाटन तसेच जनजागृतीपर माहिती सादरीकरणासाठी तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे दिनांक 08.04.2014 रोजी सकाळी 11:00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनीधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
                                         

* * * * * * * *

Saturday, 5 April 2014

निवडणूक प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण


निवडणूक प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (दृक श्राव्य, श्राव्य व इंटरनेट) प्रसारित होणा-या राजकीय प्रचार जाहिरातींबाबर निवडणूक आयोगाने  काही नियमावली ठरवून दिली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ती समजावून घेणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना अथवा उमेदवाराची जाहिरात दूरचित्रवाणी वाहिनी/केबल नेटवर्क अथवा सोशल मिडिया साईट्सवर प्रसारीत करण्यापूर्वी स्थापित करण्यात आलेल्या समितीची मंजुरी घेणे (प्रमाणिकरण करणे)आवश्यक आहे.
उमेदवाराच्या राजकीय जाहिरातीच्या प्रमाणीकरणासाठी समितीमध्ये, निवडणूक अधिकारी (संसदीय मतदारसंघाचा), सहाय्यक निवडणूक अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी दर्जाचा) यांचा समावेश आहे. संसदीय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची केबल नेटवर्क किंवा दूरचित्रवाणींवर दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठीचे अर्ज ही समिती स्वीकारते. हे दोन अधिकारी जिल्हास्तरीय माध्यम समितीचे सदस्य असतात.
 राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समिती – या समितीत अतिरिक्त/संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी – अध्यक्ष,  राज्याच्या राजधानीतील कोणत्याही संसदीय मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील किमान प्रथम श्रेणीचा अधिकारी यांचा समावेश असतो. या समितीकडे राज्यात/केंद्रशासित प्रदेशात मुख्यालय असलेल्या सर्व मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्रमाणीकरणासाठी अर्ज येतात. राज्यस्तरीय अपीलेट समितीमध्ये, मुख्य निवडणूक अधिकारी – अध्यक्ष, निवडणूक आयोगाने नेमलेला एखादा निरीक्षक, एक तज्ज्ञ असतात. राज्यस्तरीय अपीलेट समितीकडे राज्यस्तरीय समितीने प्रमाणीकरण केल्याच्या अथवा नाकारल्याच्या निर्णयासंबंधी कोणताही राजकीय पक्ष/उमेदवाराच्या तक्रारी येतात.
दिल्ली स्थित समितीत  संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी-अध्यक्ष, दिल्लीतील कोणत्याही संसदीय मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी, एक तज्ज्ञ यांचा समावेश असतो. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्ष, नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत पक्ष आणि प्रत्येक उमेदवारासाठी जाहिरात प्रसारणाच्या प्रस्तावित तारखेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रमाणीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अन्य संस्था/संघटनेसाठी प्रस्तावित तारखेपूर्वी सात दिवस अगोदर प्रमाणीकरण गरजेचे आहे.
प्रमाणीकरणासाठीच्या अर्जासोबत प्रस्तावित जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील दोन प्रती त्याच्या ट्रान्स स्क्रिप्ट जोडणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जाहिरात निर्मितीचा खर्च, दूरचित्रवाणी किंवा केबल दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीचा अंदाजे खर्च, उमेदवाराच्या फायद्यासाठी जाहिरात असल्याबाबतचे निवेदन, राजकीय पक्ष अथवा व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणी जाहिरात दिली असल्यास, त्याने शपथ घेऊन सांगावे की, ही जाहिरात कोणत्याही राजकीय पक्ष/व्यक्तीच्या लाभासाठी नाही आणि ही जाहिरात पुरस्कृत नाही, सर्व देयके धनादेश/डिमांड ड्राफ्टने देण्याबाबत निवेदन यासंदर्भातील कागदपत्रेही सोबत जोडावीत.
या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीची संरचना - निवडणूक अधिकारी (संसदीय मतदारसंघ), सहाय्यक निवडणूक अधिकारी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अधिकारी, स्वतंत्र नागरिक/पत्रकार, जिल्हा माहिती अधिकारी/डीपीआरओ अशी असेल.
ही समिती प्रमाणीकरण केल्यानंतर जाहिरातीचे प्रसारण केले आहे का याची तपासणी करणे, अन्य माध्यमांतील राजकीय जाहिरातींवर देखरेख ठेवणे, प्रिंट माध्यमातील कोणतीही जाहिरात उमेदवाराच्या परवानगीने अथवा परवानगीशिवाय प्रसिध्द केली आहे का ते तपासणे, प्रकाशकाचे नाव व पत्ता निवडणूक माहितीपुस्तिकेवर, पोस्टर, हॅण्डबिलवर छापला आहे का ते तपासणे, खर्चासंबंधी दैनंदिन अहवाल पाठवणे, ही कार्य करेल. प्रसारण योग्य जाहिरात नसल्यास वरील समित्यांना प्रमाणीकरण नाकारण्याचा अधिकार आहे. दिल्लीत मुख्यालय असलेल्या कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाची प्रादेशिक भाषेतील जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची इच्छा असल्यास, त्यांना संबंधित राज्याच्या राज्यस्तरीय समितीकडे अर्ज करावा लागेल. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला बहुभाषिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करायचे असल्यास त्यांना प्रत्येक भाषेतील जाहिरातीचा मसुदा प्रमाणित ट्रान्स्क्रिप्टसह दिल्लीतील समितीकडे पाठवावा लागेल आणि त्याबरोबरच प्रादेशिक भाषेतील मजबूत योग्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. या समितीच्या आदेशाविरोधात कोणत्याही राजकीय पक्ष/उमेदवार वरील समितीच्या आदेशाविरुद्ध्‍ राज्यस्तरीय अपीलेट समितीकडे अपील करू शकतो. तर राज्यस्तरीय अपीलेट समितीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते.                                   

                                                                                       – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

Friday, 4 April 2014

मतदानाचा नकाराधिकार अर्थात ‘नोटा’

मतदानाचा नकाराधिकार अर्थात ‘नोटा’
ज्या मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल ते मतदार आपला मतदानाचा हक्क कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता गोपनीयरित्या बजावू शकतील कारण आता त्यांच्या साठी उपलब्ध झालाय 'नोटा' चा पर्याय. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर सर्व उमेदवार आणि त्यांच्या चिन्हांखाली 'यापैकी एकही नाही' असा पर्याय असेल. 'वरीलपैकी एकही नाही' (None of the above) म्हणजेच 'नोटा' (NOTA) नकाराधिकार वापरणारा मतदार या पर्यायासमोरील बटण दाबून आपला मतदानाचा हक्क बजावेल.
आपल्या राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकांचे, लोकांनी निवडून दिलेले आणि लोकांसाठी असलेले शासन म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्वाचे असते. कारण या मताद्वारेच आपण लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाची निवड करत असतो. आपल्या पसंतीचा किंवा आपल्याला योग्य वाटणारा उमेदवार नसेल तर मतदाराला मतदान करावेसे वाटत नाही. परंतु आता असे वाटत असेल तरीसुद्धा त्याला मतदान करता येऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाच्या 27 सप्टेंबर, 2013 च्या आदेशान्वये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांना नकाराधिकाराचा 'नोटा' हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नकारात्मक मतदान करण्याचा नागरिकांचा अधिकार मान्य करून मतदान प्रक्रियेत सर्वच उमेदवारांना नकार देण्याचा पर्याय समाविष्ट करण्याचा आदेश दिला. जनप्रतिनिधीत्व कायद्यात अशी तरतूद आहे. परंतु त्यासाठी मतदाराला अर्ज करावा लागतो. आता या निर्णयामुळे अर्ज करण्याची गरज भासणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी 'नोटा' हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर तशी सुधारणा करण्यात आली आहे.
1 डिसेंबर, 2013 पासून झालेल्या राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या, नगर परिषदा/ नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणारे  महाराष्ट्र  हे देशातील पहिले राज्य आहे.
अलिकडेच  झालेल्या  5 राज्यांच्या विधानसभा तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या, नगर परिषदा/ नगर पंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नकारात्मक मतदानाचा अधिकार (नोटा) वापरण्यात आला.
निकाल  जाहीर  करताना 'नोटा' च्या पर्यायासमोर नोंदविलेल्या मतांची संख्या विचारात न घेता ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली असतील त्याला विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच 'नोटा' या पर्यायासमोर नोंदविलेल्या मतांची संख्या सर्वाधिक मते मिळविलेल्या उमेदवारास मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा जास्त असली तरी त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यासप्रतिबंध राहणार नाही.
कोणताही उमेदवार योग्य नाही? सारेच सारखे , एकाच माळेचे मणी असे म्हणत मतदानाच्या दिवशी घरी बसून राहण्यापेक्षा ‘नोटा’चा वापर करा, पण मतदानाचा हक्क बजावा. कारण लोकशाहीच्या संवर्धनासाठी मताधिकाराचा वापर हा सर्वात महत्त्वाचा आहे.

- जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव

Thursday, 3 April 2014

24 एप्रिल मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

24 एप्रिल मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

           जळगाव दिनांक 3 :- जळगाव जिल्हयात दिनांक 24 एप्रिल 2014 गुरुवार रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीत विविध आस्थापनांमध्ये काम करणा-या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिनांक 28 मार्च 2014 च्या शासन परिपत्रकान्वये 24 एप्रिल 2014 रोजीची भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
        दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृहे व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्सच्या चालक, मालक यानी शासन परिपत्रानुसार मतदनाचा हक्क बजावणीसाठी. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हयात दिनांक 24 एप्रिल 2014 गुरुवार रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीत विविध आस्थापनांमध्ये काम करणा-या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी कामगारांना सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त श्री. जी. जे दाभाडे यांनी केले आहे.                                                                  
* * * * * * * *
मान्यता नसलेली वसतिगृहे तात्काळ बंद करावे
        जळगाव, दिनांक, 3 :-  दुर्लक्षित, अनाथ तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांकरीता निवासी संस्था वसतिगृह, अनाथ आश्रम, बालगृहे, बालसदन आणि विशेष काळजी संरक्षणाची गरज असलेल्या मतीमंद तसेच एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी वसतिगृहे किंवा निवासी संस्था सुरु करावयाचे असल्यास अनाथालये व इतर धर्मदाय गृहे ( पर्यवेक्षण व नियंत्रण) बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम अन्वये मान्यता नोंदणी प्रमाणपत्र महिला व बाल विकास विभागाकडून घेणे बंधनकारक आहे.
         मान्यता नोंदणी प्रमाणपत्रशिवाय अशा मुलांमुलीसाठी निवासी संस्था चालविणे हे बेकायदेशिर आहे. अनाथ निराधाराच्या नावे लोकांकडून बेकायदेशिरपणे देणग्या घेवून फसवणुक करणे, अशा निवासी संस्थांच्या वसतिगृहामध्ये मुलांचे व्यापार करणे व अवैध दत्तक घेणे, अनधिकृतपणे मुलांना ठेवणे याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना कळविण्यात आलेले आहे.
     जिल्हयातील मुला-मुलींसाठी मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र शिवाय निवासी संस्था असल्यास त्यांनी सदरचे वसतिगृह, बालगृहे तात्काळ बंद करावे व बालकांना जिल्हयाच्या बाल कल्याण समिती समोर निरीक्षणगृह , बालगृहे जळगाव येथे हजर करावे. मान्यता प्राप्त संस्थामध्ये प्रवेश हा केवळ बाल कल्याण समिती यांच्यामार्फत दिला जातो. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला आकाशवाणी चौक जळगाव  ( 0257-2228828) येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालाविकास अधिकारी यांनी केले आहे.

* * * * * * * *

Tuesday, 1 April 2014

खर्च करा पण नियमाला धरून ! : खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया


खर्च करा पण नियमाला धरून !
                                  : खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया

            चाळीसगाव, दिनांक 1 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या पार्श्वभुमीवर निवडणूक खर्च संनियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले होते. या आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना उमेदवारास व राजकीय पक्षांना विविध बाबींवर खर्च करावा लागतो. मात्र हा खर्च आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत व नियमानुसार करणे आवश्यक असून निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रत्येक खर्चाची व्यवस्थीत व सुयोग्य नोंद ठेवणे गरजेचे असल्याचे निवडणुक खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे, उपविभागीय अधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मेहुणबारे सहा.पोलीस निरीक्षक विजय देवरे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, ए.एम.परमार्थी आदि उपस्थित होते.
            श्री.भलोटीया मार्गदर्शक करतांना म्हणाले की व्हिडीओ सर्वेक्षण पथक, फिरते भरारी पथकांनी आपले कर्तव्य बजावतांना  मतदारांमध्ये जागृती आणून मतदारांना प्रलोभनासंदर्भात 1 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते याची जाणीव करुन देणे तसेच या संदर्भात समाजातील सर्व थरात जनजागृती करणे तसेच कुठल्याही भुलथापांना बळी न पडता भयमुक्त वातावरणात मतदान करावे अशा प्रकारचे संदेश देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  तसेच चित्रीकरणासाठीच्या मुलभूत सुचना, अपेक्षीत असलेले चित्रीकरण, प्रचार सभेत उमेदवार व पक्ष यांचा सुक्ष्म अभ्यास करुन खर्चाचे वर्गीकरण करणे, तालुका स्तरावर दुय्यम शॅडो रजिष्टर अद्यावत करणे या सारख्या सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.
            सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मतदार संघातील निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आलेल्या संपुर्ण कामकाजाची माहिती निवडणूक खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे यांना दिली. तसेच तालुक्यात नेमण्यात आलेल्या रोहिणी, चिंचगव्हाण व जांभडी प्र.ब. येथे नेमण्यात आलेल्या चेक पोस्ट वरील अधिकारी कर्मचा-यांनी कुठल्याही वाहनाची तपासणी करतांना वाहन धारकास त्रास व विलंब होणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच आयोजित करण्यात येणा-या सभा, बैठका, रॅलीचे चित्रीकरण करतांना सदर सभा, बैठका, रॅलीवर होणा-या खर्चाचे वर्गीकरण करण्यास अपेक्षीत असलेल्या चित्रीकरणाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

चिंचगव्हाण चेक पोस्टची खर्च निरीक्षकांनी केली पहाणी

सदर आढावा बैठकीनंतर निवडणुक खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया यांनी चिंचगव्हाण फाटयावरील चेक पोस्टची पहाणी केली यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, यांच्यासह महसुल व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या पहाणी दरम्यान भलोटीया यांनी चेकपोस्ट वरील कामकाजाची माहिती जाणून घेतली व योग्य त्या सुचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व छायाचित्र हे  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* * * * * * * *