Thursday, 31 October 2013

जळगाव जिल्हयात 20 ठिकाणी आधारभुत धान्य खरेदी केंद्राची स्थापना

जळगाव जिल्हयात 20 ठिकाणी आधारभुत धान्य खरेदी केंद्राची स्थापना

           जळगाव, दि. 31 :- महाराष्ट्र शासनाने सन 2013 -2014 या ख्ररीप हंगामात तयार झालेली ज्वारी / मका हे धान्य आधारभुत किंमत योजने अंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्हयात एकूण 20 ठिकाणी खरेदी केंद्र स्थापित केलेले आहे. ज्वारी / मका या भरड धान्याची खरेदी किंमत ज्वारी 1500 प्रति क्विंटल, मका 1310 प्रति क्विंटल, बाजरी 1250 प्रति क्विंटल शासनाने निश्चित केलेली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाचेच धान्य खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येईल.
                सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाची ज्वारी म्हणजे काडी, कचरा व इतर अखादय दाणे बियाणे, दगड, माती, वाळू इत्यादी 1.0 टक्के, ज्वारी व्यतिरिक्त इतर अन्न धान्य 3.0 टक्के, अपरिपक्कव व सुरकुतलेले दाणे 4.0 टक्के, खराब दाणे 1.5 टक्के, अर्धवट खराब दाणे व रंगहीन 1.0 टक्के, किडांनी पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्क्यांपेक्षा कमी असावा खरेदीसाठी विक्रीस येणारी ज्वारी विक्री योग्य  पुर्णपणे कोरडी व दाणे तयार झालेली, स्वच्छ गोड सर्व अन्नतत्वे पुर्ण असणारी एकरंगी आणि एकसारखी असावी.
                सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाची बाजरी म्हणजे काडी, कचरा व इतर अखादय दाणे बियाणे दगड, माती, वाळू इत्यादी 1.0 टक्के, बाजरी व्यतिरिक्त इतर अन्न धान्य 3.0 टक्के, अपरिपक्व व सुरकुतलेले दाणे 4.0 टक्के, ,खराब दाणे 1.5 टक्के, अर्धवट खराब दाणे व रंगहीन 1.0 टक्के, किडांनी पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्क्यांपेक्षा कमी असावा खरेदीसाठी विक्रीस येणारी बाजरी विक्री योग्य पुर्णपणे कोरडी व दाणे तयार झालेली, स्वच्छ गोड सर्व अन्नतत्व पूर्ण असणारी एकरंगी  आणि एकसारखी असावी.
                  सर्वसाधारण गुणवत्तेचा मका म्हणजे ज्यात काडी, कचरा 1.0 टक्के, इतर अन्न धान्य 2.0 टक्के, खराब दाणे 1.5 टक्के, अपरीपक्व व सुरकुतलेले दाणे 3.0 टक्के, अर्धवट खराब रंगहीन व मार लागलेले दाणे 4.5 टक्के, किडयांनी पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्के पेक्षा कमी असावा.
                शेतक-यांनी खरेदी केंद्रावर येताना सातबाराचा उतारा आणणे आवश्यक आहे. जळगाव जिल्हयात, जळगाव 2, जामनेर 1, भुसावळ 2, यावल 1, रावेर  तालुक्यात 2, धरणगाव 1, एरंडोल तालुक्यात कासोदा 2, पाचोरा 1, चोपडा 1, अमळनेर 1, भडगाव 1, चाळीसगाव 1, बोदवड 1, मुक्ताईनगर तालुक्यात 2 ( कर्की, कोथळी), पारोळा 1 असे एकूण 20 केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. ज्वारी / मगा या भरड धान्यांच्या खरेदीचा कालावधी दिनांक  18 ऑक्टोबर 2013 ते 31 मार्च 2014 असा राहील.


                                                                   * * * * * * *

Tuesday, 29 October 2013

बाल हक्कांबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन

बाल हक्कांबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन

             जळगाव, दिनांक 29 :- महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाची स्थापना जुलै 2007 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, 2005 अन्वये करण्यात आलां. बाल संरक्षण आयोगामध्ये 0 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांबाबत विशेष संरक्षण चाइल्ड ट्रॅफिकिंग व भिक्षावृत्तीवर नियंत्रण, मोफत शिक्षणाचे अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे.
            राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यकक्षेत मुले / मुली बालमृत्यू, कुपोषण, बाल कामगार, ट्रॅफिकिंग, बालकाचे शिक्षण, निरीक्षणगृह, शेल्टर होम, सिव्हील अनरेट व प्रोजेक्टमुळे उदभवणा-या बालकांच्या समस्या, सामाजिक, आर्थिक राजनैतिक परिस्थिती विषयावर स्वतंत्ररित्या चौकशी करुन अहवाल शासनाला शिफारसीसह सादर करण्याचे अधिकार आहेत. बाल हक्क संरक्षण आयोग  अधिनियम 2005 अंतर्गत बाल हक्क आयोगाची कामे पुढीलप्रमाणे आहेत.-
              बाल हक्कांचे संरक्षण करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्याची तपासणी व परिक्षण करणे त्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शिफारस करणे, बाल हक्काच्या संरक्षणबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणे, बाल हक्क भंगाबाबत प्रकरणांची चौकशी करणे आणि अशा प्रकरणी कायदेशीर इलाजांची शिफारस करणे, जेथे बाल हक्कांवर दहशतवाद, जातीय हिंसात्मक कृती दंगल, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक हिंसात्मक कृती, एच आय. व्ही / एडस बाल, व्यापार, वाईट वागणूक, छळवणूक, पिळवणूक, अश्लिल चित्रे, वेश्या व्यवसाय यांनी परिणाम होतो याबाबत योग्य त्या उपायांची शिफारस करणे,  जेथे मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे आणि जेथे मुलांना यातना होत आहेत. त्यांच्यामध्ये भेदभाव ठेवला जात आहे. त्यांची गैरसोय केली जात आहे.कायदेशिर वागणूक दिली जात नाही, अशा ठिकाणी लक्ष घालणे पोरकी मुले आणि कैद्याची मुले यांना संरक्षण देणे, प्रबंध आणि आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा अभ्यास करणे, अस्तित्वात असलेल्या धोरणाची नियतकालिका परिक्षण हाती घेणे, बाल हक्काबाबत कार्यक्रम परिणामकारक उपायांची अंमलबजावणी होण्यासाठी शिफारस करणे.  याबाबत अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, तिसरा मजला, शासकीय परिवहन सेवा इमारत, सर पोचखानवाला रोड, वरळी मुंबई 30  mscper@gmail.com दूरध्वनी 022 - 24920897 येथे संपर्क साधावा बाल हक्काबाबत जागरुकता बाळगावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी केले आहे.              

* * * * * * *

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

              जळगाव, दिनांक 29 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोटार सायकल नवीन नोंदणी एमएच -19 / बीटी 0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज  करावा व विहित शुल्क भरुन पसंतीचा क्रमांक मिळवावा. नोंदणी शुल्क भरल्यानंतर वाहन 30 दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. या मुदतीत  वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क परत होणार नाही. अधिक माहितीसाठी  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

* * * * * * *

19 ते 28 नोव्हेंबर रोजी सैन्य भरतीचे आयोजन

            जळगाव, दि. 29 :- स्पोर्टस स्टेडियम नांदेड येथे दिनांक 19 ते 28 नोव्हेंबर 2013 या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.  जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील इच्छूक तरुणांनी सैन्य भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
         सैन्य भरतीचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.- जळगाव येथे दिनांक 22 नोव्हेंबर 2013, धुळे 25 नोव्हेंबर 2013, नंदुरबार 20 नोव्हेंबर 2013,  भरतीची वेळ सकाळी 4 वाजे पासून ते सकाळी 6 वाजेपर्यत राहिल. भरतीचा ट्रेड सैनिक जनरल डयुटी, सैनिक टेकनिकल, सैनिक  नर्सिग असिस्टंट, सैनिक क्लर्क, सैनिक स्टोअर किपर, सैनिक ट्रेडमन.
         शारिरीक  व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे -  ट्रेड सैनिक जनरल डयुटी , उंची 168 से. मी., वजन 50 किलो ग्रॅम, छाती 77-82 से.मी.,  वय  17 ½ ते 21 वर्ष, शैक्षिणक पात्रता इयता 10 वी एस. एस. सी 45 टक्के गुण आवश्यक
        सैनिक टेक्निकल  - उंची 167 से.मी., वजन 50 किलो ग्रॅम, छाती  77-82 से.मी., वय  17 ½ ते 23 वर्ष, शैक्षणिक पात्रता - भौतिक, रसायन, गणित, विषय घेवून इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक.
        सैनिक टेक्निकल नर्सिग असिस्टंट - उंची 167 से.मी., वजन 50 किलो ग्रॅम, छाती 77-82, वय 17 ½ ते 23, शैक्षणिक पात्रता- भौतिक, रसायन, जीवशास्त्र, इंग्रजी विषय घेऊन इयत्ता 12 वी 50 टक्के पास आवश्यक व प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक.
           सैनिक क्लर्क व स्टोअर किपर :- उंची 162 से.मी. , वजन 50 किलो ग्रॅम, छाती 77-82 से.मी. वय 17  1/2 ते 23 शैक्षणिक पात्रता- कुठल्याही माध्यमातून व इंग्रजी विषय घेऊन 12 वी 50 टक्के गुण मिळवून व 40 टक्के गुण प्रत्येक विषयात असणे आवश्यक , पदवीधर असल्यास वरील गुणवत्ता लागू नाही.
             सैनिक ट्रेडमॅन :- उंची 168 से. मी., वजन 48 किलो ग्रॅम, छाती 76-81 से.मी. वय 17 1/2 ते 23 वर्षे, शैक्षणिक पात्रता - इयत्ता 8 वी पास व इयत्ता 10 वी पास.
           आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे -एस. एस. सी, एच. एस. सी . च्या गुणपत्रक व बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या मुळप्रती, बोर्ड प्रमाणपत्र नसल्यास मुळ प्रोव्हीजन प्रमाणपत्र ज्यावर जन्म तारखेचा उल्लेख करुन संबंधित बोर्डाकडून सही व शिक्का लावलेले असावे. ट्रान्सफर प्रमाणपत्राची मुळप्रत किंवा शाळा कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र, सरपंचाचा दाखला व सहा महिन्याच्या आतील कालावधीतील चरित्र प्रमाणपत्र , ओपन कॅटेगिरीच्या उमेदवाराकरीता सरपंचाचा दाखला, 5 से. मी. x 4 से. मी. आकाराचा नुकत्याच काढलेल्या रंगीत 14 फोटोंच्या प्रती, ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो चालणार नाही. तसेच अटेस्टेड करु नये, जिल्हा दंडाधिकारी यांच्याव्दारा सही केलेले रहिवास प्रमाणपत्र,  वय व राष्ट्रीयत्वाचे तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांचे हस्तांक्षर असलेले प्रमाणपत्र, संपूर्ण तपशिल असलेला तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला, माजी सैनिकाचा पाल्य असल्यास संबंधित अभीलेख कार्यालयाकडून प्राप्त झालेला अभिलेख अधिका-यांकडील दाखला.
           सैनिक भर्ती ही विनामुल्य केली जाते. भरती प्रक्रियेत कोणत्याही एजंटला थारा नाही. दलालांच्या फसवेगिरी पासून सावध रहावे अशा दलालांची माहिती मिळाल्यास संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती द्या किंवा सैनिक अधिकारी यांना माहिती द्यावी. संबंधीत दलालावर तातडीने कारवाई करण्यात.येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी कळविले आहे.

                                                                     * * * * * *

Monday, 28 October 2013

प्रत्येकाने आपलं गाव निर्मल करण्याचा संकल्प करु या - पालकमंत्री संजय सावकारे यांचे आवाहन


प्रत्येकाने आपलं गाव निर्मल करण्याचा संकल्प करु या
 पालकमंत्री संजय सावकारे यांचे आवाहन
           जळगाव, दि. 28 :- आरोग्याची सुरुवात पाणी आणि स्वच्छतेपासून होते. स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तीक गरज आहे. जळगाव जिल्हा निर्मल करण्याचे आव्हान आपणा सर्वांसाठीच आहे, प्रत्येक गाव हगणदरी मुक्त करुन आपलं गाव निर्मल करण्याचा संकल्प प्रत्येकाने करु या,असे आवाहन राज्याचे कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त जमाती व इतर मागासवर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. निर्मल अभियान कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
              जळगाव जिल्ह्यातील निर्मल भारत अभियानाअंतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी  जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचा-यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात करण्यात आले होते.
              या कार्यशाळेचे उदघाटन पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन  सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे हे होते. तर मार्गदर्शनासाठी आदर्शगाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पोपटराव पवार,  कोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव सुनिल चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, कृषी सभापती कांता मराठे, महिला व बालविकास विभागाच्या सभापती लीलाताई सोनवणे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी  गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटीलआदी उपस्थित होते.
            याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भारत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा हगणदरीमुक्त करतांना त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले. स्वच्छतेचा हा संदेश पोहोचविण्यासाठी जत्रा, सणवारांचे निमित्त साधा. हे अभियान केवळ स्वच्छतेशी संबंधित नसून आपल्या घरातील महिलांच्या प्रतिष्ठेसाठीही आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे उधबोधन त्यांनी याप्रसंगी केले.   तर पोपटराव पवार यांनी या कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी  समन्वयाने काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात श्रीमती उगले यांनी स्वच्छतेच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचे आकडेवारीनिहाय सादरीकरण केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                  * * * * * *

Friday, 25 October 2013

महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी शासन बांधील - पालकमंत्री संजय सावकारे




महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी शासन बांधील - पालकमंत्री संजय सावकारे

           जळगाव, दि. 25 :- देशात महिलांची संख्या निम्मी आहे. त्यामुळे त्यांना समान अधिकारही मिळाले पाहिजेत. महिलांना त्यांचे हक्क मिळ्वून देण्यासाठी शासन बांधील आहे. त्यांना उद्योग व्यवसायात समान संधी देणे यासाठीही शासन प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त जमाती व इतर मागास वर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. ते भुसावळ येथे महिला उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होते.
               भुसावळ येथे ब्राह्मण संघात महिला उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी बोलतांना श्री. सावकारे  म्हणाले की, महिलांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आज अनेक महिला नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. ज्या ज्या क्षेत्रात महिलांना संधी मिळाली आहे त्या - त्या क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातही  अनेक महिलांनी आपले व्यवसाय कौशल्य सिद्ध केले आहे. व्यापार व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर गुणवत्तेत तडजोड करु नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  रजनी सावकारे म्हणाल्या की, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे व्यासपीठ आहे. सा-यांनीच नौकरीच्या मागे धावण्यापेक्षा व्यवसाय करावा. एक स्वयंरोजगार करणारी व्यक्ती ही इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन देत असते. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
                या उदघाटनप्रसंगी भुसावळ पं.स. सभापती मंगला झोपे, आरोग्य सभापती शारदा झोपे, ब्राह्मण संघाच्या उपाध्यक्षा रुपा कुलकर्णी,  मेळाव्याच्या आयोजक रजनी सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार दि. 27 पर्यंत हा मेळावा सुरु राहणार असून महिला उद्योजकांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहे व त्याची विक्रीही सुरु आहे.
 * * * * * * * *

उपवर मुलींच्या लग्नासाठी ठेवीची रक्कम  थेट बॅंक खात्यात
 जमा करण्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांचे आदेश

           जळगाव, दि. 25 :- उपवर मुलींच्या लग्नासाठी  संतोषीमाता मर्चंट सह. पत संस्थेतील ठेवण्यात आलेल्या ठेवींचा ठेवीदारांना परतावा करतांना आरटीजीएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करावी,असे आदेश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त जमाती व इतर मागास वर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज दिले. त्यासाठी सर्व ठेवीदारांनी आपले बॅंक खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत सुरु करावे, असे आवाहनही श्री. सावकारे यांनी ठेवीदारांना दिले.
             उपवर मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  संजय राऊत, जिल्हा विशेष लेखा परिक्षक धीरज चौधरी, तालुका उपनिबंधक डॉ. गार्डी तसेच ठेवीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सहकार विभागाच्या वतीने माहिती सादर करण्यात आली  संतोषी माता मर्चंट सह. पत संस्थेत उपवर मुलींच्या विवाहासाठी 146 ठेवीदारांच्या ठेवी होत्या. त्यापैकी 34 ठेवी आढळून आल्या नाहीत. उर्वरित 112 पैकी 6 ठेवीदारांच्या ठेवी पूर्ण परत करण्यात आल्या होत्या. तर सहा जणांची नावे दोनदा आढळली होती. उर्वरित 100 ठेवीदारांपैकी ज्यांच्या ठेवींची रक्कम 1 लाखांपर्यंत होती त्या 69 जणांना 100 टक्के रक्कम म्हणजे एकूण 30 लाख 86 हजार इतकी रक्कम  देण्यास मंजूरी देण्यात आली होती. तर उर्वरित 30 जणांना ज्यांच्या ठेवींच्या रकमा 1 लाखापेक्षा अधिक होत्या त्यांना 75 टक्के रक्कम परत करावी, असे सुचविण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. सावकारे यांनी या ठेवीदारांनाही पूर्ण 100 टक्के रकमेचा परतावा करण्यात यावा, असे  आदेश दिले. तसेच या रकमांचा परतावा देतांना रक्कम ठेवीदाराच्या थेट खात्यात आरटीजीएस प्रणालीद्वारे जमा करावी अशी सुचनाही केली. या निर्णयामुळे आता 91 लाख 87 हजार 846 रुपये रकमेचा परतावा ठेवीदारांना करण्यात येणार आहे.
* * * * * * * *
 

Thursday, 24 October 2013

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



पालकमंत्री संजय सावकारे यांचा  जिल्हा दौरा कार्यक्रम

              जळगाव,दि. 24:- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
               शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2013 सकाळी 7.30 वा. महानगरी एक्सप्रेसने भुसावळ येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी  11.00 वा. महिला उद्योजक मेळाव्याचे उदघाटन समारंभ, . स्थळ ब्राम्हण संघ, भुसावळ, दुपारी 2.00 वा.  सहकार विभागातील विषयांबाबत आढावा सभा स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. संध्या 5.00 वा. साकरी येथे महर्षि वाल्मिक भागवत सप्ताह निमित्त महाप्रसाद स्थळ जि. प. शाळा, साकरी ता. भुसावळ.

* * * * * * *

शिकाऊ उमेदवारांची व्यवसाय परीक्षा

           जळगाव, दि. 24 :- राष्ट्रीय व्यावसायीक प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली ( एन . सी .टी. व्ही .टी ) मार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची 99 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दिनांक 23  ते 30 ऑक्टोबर 2013  या कालावधीत होणार आहे. परीक्षेस बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यानी  नोंद घ्यावी असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र जळगाव यांनी कळविले आहे.
            
* * * * * * *

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे
पुरुष महिला सदस्यांच्या भरतीचे अर्ज उपलब्ध

               जळगाव, दि. 24 :- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या पुरुष महिला सदस्यांच्या रिक्तपदांच्या भरतीची सुचना प्रसिध्दी झाली आहे. अर्जाचा विहित नमूना  जिल्हा तकार निवारण मंच, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शेजारी जळगाव येथे उपलब्ध आहेत. फॉर्मचे शुल्क 100 रुपये असून  शासकीय सुटीचे दिवस वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज  प्राप्त होतील. सदरचे अर्ज राज्य ग्राहक निवारण आयोग यांना 13 नोव्हेंबर 2013 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव यांनी केले आहे.
                                               
* * * * * * *

निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वी वेतन

                जळगाव, दि. 24 :-  निवृत्ती वेतन धारकांचे ऑक्टोबर 2013 या महिन्याचे निवृत्ती वेतन        दि. 24 ऑक्टोबर 2013 रोजी संबंधित बॅकेत धनादेशाव्दारे जमा करण्यात आलेले आहे. तरी सर्व निवृत्ती वेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे  आवाहन  जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांनी   केले आहे.                                                                

* * * * * * *