Saturday, 5 December 2015

शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील


शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 05:-  मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मृदा दिवस या दिवसाचे औचित्य साधून शाश्वत शेतीसाठी साठी माती परिक्षण करण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा व शाश्वत शेती करावी असे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी कृषी विभागामार्फत आयोजित मृदा दिनाच्या कार्यक्रमात केले. शहरातील हिरापुर रोडवर असलेल्या गणेश मंगल कार्यालयात तालुका कृषी कार्यालयामार्फत मृदा दिनानिमीत्त शेतकऱ्यांना जमिनीचा मृद नमुना कसा घ्यावा, खताचा संतुलित वापर, शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर अशा अनेक विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार बोलत होते.
                     मनुष्य ज्या प्रकारे आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत असतो त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी माती परिक्षणासह पाणी परिक्षण हे गरजेचे असते, तर यामुळे आपण मातीचा सन्मान असून मातीविषयी मनुष्य प्राणी मात्राने व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राहील्यास आपोआप निसर्गासह सर्व मनुष्य प्राणी मात्रांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. शाश्वत शेती करण्यासाठी मोठया प्रमाणात आभ्यास साहित्य उपलब्ध असून त्याचाही वापर शेतकऱ्यांनी करावा. शाश्वत शेतीवर मार्च महिन्यामध्ये सुभाष पाळेकरांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असून त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी केले. प्रत्येक तालुक्यात मोबाईल सॉईल टेस्टींग लॅब कार्यान्वित करण्यात येणार असून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठीच उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या मोठया प्रमाणात योजना राबविल्या जातात त्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांशी सुसंवाद साधुन गावपातळीपर्यंत त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना करत त्यासंबंधीचे माहितीपत्रके सर्व शेतकऱ्यांना वितरीत करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या. आजच्या मृदा दिनाचे औचित्य साधत प्रातिनीधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करतांना यावेळी तालुक्यातील 1541 शेतकऱ्यांच्या शेतीच्या आरोग्य पत्रीकांचे वाटप होणार असून पुढील तीन वर्षामध्ये तालुक्यातील एकुण 64,866 इतक्या संपुर्ण खातेदारांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
                     कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची थोडक्यात माहिती करुन दिली त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, घन लागवड कापुस विकास योजना, संकरीत तुर उत्पादन कार्यक्रम, आंतरपिक प्रोत्साहनपर कार्यक्रम आदी योजनांची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांना हरभरा पेरणी करावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी महाबिज कडील बियाणे रु. 25 प्रति किलो अनुदानावर उपलब्ध असून मे.पंकज व सुयोग कृषी केंद्र चाळीसगांव यांचेकडे 30 किलोची बॅगला रु.750 अनुदान वगळता रु. 1560 ला शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
                     एकात्मिक अन्नद्रव्य संकल्पना, माती नमुना घेण्याची कार्यपध्दती व फायदे तोटे, नमुना तपासणी नंतर अहवाल वाचन, रासायनिक, जैवीक, सेंद्रीय खताचा वापर, जमिनीची रचना, भौतीक व रासायनिक गुणधर्म, सामु-क्षारता, भुसूधारकाचा वापर, जलसंधारण, मृदसंधारण, हिरवळीच्या खताचा वापर अशा अनेक बाबींवर तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी पी.डी.पाटील, पी.डी.वाघ, सुशील पाटील, तोरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर शिंदी येथील प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी शेतीचा आभ्यास करुन केलेल्या शेतीबद्दल स्वत:चे अनुभव कथन केले. यावेळी जेष्ठ तज्ञ रामभाऊ शिरोडे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रेरीत केले.
                     या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, भाजपा जिल्हा सरचिटणीस देवयानी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव, माजी सभापती संजय पाटील, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, पं.स.सदस्य दिनेश बोरसे, जि.प.सदस्य राजेश राठोड, अनिल निकम, ॲङ राजेंद्र सोनवणे, शिंदी गावचे प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत, विश्वजीत पाटील, रामभाऊ शिरोडे, सतिष पाटे आदि मान्यवर तसेच  विविध ग्रामपंचायतीचे सरपंचांसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

नागरी भागातील दुरचित्रवाणी केबलधारकांना सेट-टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

नागरी भागातील दुरचित्रवाणी केबलधारकांना
सेट-टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य
                                                : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

              चाळीसगांव, दिनांक 05:-  केंद्र शासनाच्या 11 सप्टेंबर, 2015 च्या राजपत्रानुसार राज्यातील दुरचित्रवाणी केबल प्रसारणाच्या फेज-1 व फेज-2 मध्ये डिजीटायजेशन करण्यात आलेल्या क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील उर्वरित नागरी भागात फेज-3 मध्ये 31 डिसेंबर, 2015 पर्यंत डिजीटायजेशनची प्रक्रिया पुर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानुसार नागरी  भागातील सर्व दुरचित्रवाणी केबल धारकांनी त्यांच्या दुरचित्रवाणी संचास सेट-टॉप बॉक्स यंत्र 31 डिसेंबर, 2015 पर्यंत अधिकृत केबल सेवा पुरवठादाराकडून बसवून घेणे अनिवार्य आहे.  जे अधिकृत केबल सेवा पुरवठादार दिलेल्या मुदतीत सेट-टॉप बॉक्स बसविणार नाही अशा केबल सेवा पुरवठा दारांची सेवा खंडीत होऊन यामुळे केबल धारकांना या सेवेपासून वंचित रहावे लागेल तरी याची विहीत मुदतीत संबंधितांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
                      दुरचित्रवाणी केबल सेवेच्या डिजीटायजेशन अंतर्गत विविध वाहिन्यांवरील प्रक्षेपण केबल दुरचित्रवाणी संचास पुर्ण क्षमतेने प्राप्त होईल. मोठया संख्येने उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार व आर्थिक क्षमतेनुसार तथा गरजेनुसार वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होईल. प्रक्षेपणातील बहुतांशी दोष दुर होवून दुरदर्शन संचावरील चित्र व चलत चित्रे यांच्या गुणवत्तेत वाढ होवून ते अधिक सुस्पष्ट स्वरुपात दिसतील त्याचप्रमाणे आवाजाच्या गुणवत्तेत सुध्दा सुधारण होईल. उपलब्ध वाहिन्यांची संख्या पायाभूत सेवा पातळीवर कमीत कमी 100 चॅनल्स समाविष्ट आहेत, असे असले तरी ही पध्दत वर्गणीदारावर बंधनकारक नाही. वर्गणीदार जास्तीत जास्त आवडीचे फ्री टू एअर चॅनल्स घेऊ शकतो. वर्गणीदार पे चॅनल्स बरोबर एफ.टी.ए. किंवा त्याशिवाय चॅनल्सची निवडही करु शकतो, त्यासाठी दरमहा रु. 150/- पेक्षा जास्त भाडे त्यास आकारले जाणार नाही. या शिवाय इलेक्ट्रॉनिक प्रोग्रॅम गाईड, मुव्ही ॲण्ड व्हिडीओ ऑन डिमांड, पर्सनल व्हिडिओ रेकॉर्डरची मागणी करता येईल.  केबल संबंधीच्या तक्रारीचे निवारण टोल फ्री नंबर व वेबसाईटमुळे कालमर्यादेत शक्य व बंधनकारक झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे केबल धारकांना स्वतंत्र ओळखपत्र मिळणार असल्याने त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होईल. तरी वरील सर्व बाबी लक्षात घेता तालुक्यातील नागरी भागातील सर्व दुरचित्रवाणी केबल धारकांनी आप-आपल्या भागातील अधिकृत एम.एस.ओ/एल.सी.ओ. यांचे कडून अधिकृत किंमत देऊन व रितसर पावती घेऊनच सेट-टॉप बॉक्सची खरेदी करुन बसवून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


                                                                * * * * * * * *

Friday, 4 December 2015

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी
संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा
                                                                        : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 04 :-  विविधी आपत्तीकरीता शासनामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अनुदानातुन खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याचे कामकाज अंतीम टप्प्यात असून या अनुदानासाठी पात्र असलेले लाभार्थी आपले खाते क्रमांक दुरुस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी आपल्या अचुक खाते क्रमांक व बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो आपल्या गाव तलाठयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
मा. विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील दिनांक 23 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या पत्रानुसार विविध आपत्तींकरीता शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी वाटपा अभावी बँकेत पडून असलेल्या शिल्लक रकमा शासन खाती चलनाद्वारे भरणा करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने तहसिलदार चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 02 डिसेंबर, 2015 रोजी जिल्हा बँकेच्या 21 शाखांचे विभागीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत खरीप अनुदान 2014 करीता बाधित शेतक-यांना अनुदान वाटप करणेकामी चर्चा झाली. त्यात ज्या लाभार्थ्यांचे चुकीचे खाते क्रमांक, गावात बदल, नावात बदल , मयत , इत्यादी अनेक कारणांमुळे अनुदान लाभार्थ्यांच्या खातेवर वर्ग न होता बँकेत पडून आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची गावनिहाय यादी बँकेतील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तदनंतर सर्व लाभार्थी यांच्या वर्षेनिहाय , गावनिहाय व शाखानिहाय यादया बँकेमार्फत तहसिल कार्यालयात पाठविण्यात येणार असून सदरच्या यादयातील लाभार्थी यांचे खाते क्रमांक व नावातील किरकोळ दुरूस्त्या करून अनुदान लाभार्थी यांचे खातेवर वर्ग करण्यात येणार असल्याने जे शेतकरी लाभार्थी खाते क्रमांक दूरूस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी त्यांचे खाते क्रमांक आपले बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो तहसिल कार्यालय, चाळीसगांव अथवा गावचे संबंधित तलाठी यांचेकडे सादर करावेत. तदनंतर उर्वरीत रक्कम शासनाकडे समर्पित करण्यात येणार असल्यामुळे यानंतर अनुदान न मिळालेबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

मृदा दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : तालुका कृषी अधिकारी राजपुत

मृदा दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
                                                       : तालुका कृषी अधिकारी राजपुत

              चाळीसगांव, दिनांक 04:- जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शनिवार दिनांक 5 डिसेंबर, 2015 रोजी सकाळी 10:00 वाजता शहरातील गणेश मंगल कार्यालय, हिरापूर रोड, चाळीसगांव येथे उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी केले आहे.             
                     मनुष्यवस्तीच्या विकासासाठी पाणी, जंगल आणि जमिन या तीन गोष्टींची नितांत गरज असते. पिकांच्या वाढीसाठी जमिनीकडुन अन्नांश घेतले जातात, त्या बदल्यात नविन अन्नांशाचा जमिनीस पुरवठा करणे गरजेचे असते. जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी तसेच मनुष्य व प्राणी मात्रांसाठी जमिनीचे मुल्य अनन्यसाधारण आहे, या बाबत संपुर्ण तालुक्यामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक 5 डिसेंबर, 2015 जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील राहणार असून या कार्यक्रमामध्ये जमिनीचे आरोग्य पत्रीका वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जमिनीचा मृद नमुना कसा घ्यावा, खताचा संतुलित वापर, शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर अशा अनेक विषयांवर तांत्रिक मार्गदर्शनदेखील होणार असून या कार्यक्रमास तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी केले आहे.

                                                                * * * * * * * *