Thursday, 21 June 2012

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यशाळा संपन्न


चाळीसगांव दि. 21 : तालुक्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्व्हेक्षणासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा आज परदेशी बोर्डींग हॉल, लक्ष्मी नगर येथे संपन्न झाली.
 या कार्यशाळेस गटविकास अधिकारी श्री. अशोक पटाईत, जळगांव जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी श्री. वाभळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, श्री. वानखेडे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या गोष्टींचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. व्यक्तिगत सवयी सार्वजनिक अस्वच्छता,नळपाणी पुरवठा यंत्रणेतील दोष यांमुळे पाणी दुषित होऊन ते पाणी पिण्यास वापरल्याने अतिसार, कॉलरा, विषमज्वर, कावीळ इ. जलजन्य रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे अशा रोगांचे रुपांतर साथीच्या स्वरुपात होते. या रोगांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पिण्याचा पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
श्री. वानखेडे म्हणाले की, गावातील सर्वांना शुध्द,सुरक्षित पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य आहे. दैनंदिन पाणी शुध्दीकरण करणे, टी. सी.एल. पावडरचा साठा व्यवस्थित ठेवणे दैनंदिन वापर करणे, दररोज निरनिराळया ठिकाणी ओ.टी टेस्ट घेऊन त्याची दैनंदिन नोंद ठेवणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नियमित सर्वेक्षण करुन स्त्रोतांची माहिती अद्यावत ठेवणे स्त्रोतांची स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. तसेच दुषित पाण्याच्या दुष्परिणांमाचे विविध उदाहरणे देऊन त्यावरील उपयोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. नागरिकांना शुध्द पाण्याचे पाणी मिळावे साथीच्या रोगास आळा बसावा यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण, सर्वेक्षण माहिती व्यवस्थापन पध्दती यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
सर्व विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी समन्वयाने कामे करावीत असे सांगून श्री. पटाईत यांनी तालुक्यातील गावांचा दुषित पाण्यासंबंधी केलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.
 या कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्री. पी. एस. सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी श्री. एस. एस. कठाळे यांनी केले.
या कार्यशाळेस तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.), विस्तार अधिकारी पंचायत समिती, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक, जलसंरक्षक (वॉटरमन), गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वयक आदी उपस्थित होते.
           
* * * * * *

Monday, 18 June 2012

मागासवर्गिय विद्यार्थीनींसाठी वसतीगृहात मोफत प्रवेश


चाळीसगांव दि.18 : महात्मा फुले सामाजिक शैक्षणिक विकास मंडळाच्या अनुदानीत मंदोदरी कन्या वसतीगृहात इ. 5 ते 10 वी या वर्गांसाठी अनु.जाती, अनु.जमाती, भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी मोफत प्रवेश तसेच वसतीगृहात राहण्याची जेवणाची मोफत सोय असून सदर वसतीगृहात विद्यार्थीनींना प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वसतीगृहाच्या अधिक्षिका श्रीमती वैशाली महाजन यांच्याकडे मिळतील. त्यासाठी वसतीगृहाच्या खालील पत्यावर संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक मंदोदरी कन्या छात्रालय यांनी केले आहे.
 वसतीगृहाचा संपुर्ण पत्ता :- मंदोदरी कन्या छात्रालय, विद्युत सरिता कॉलनी, धुळे रोड, चाळीसगांव जिल्हा जळगांव
* * * * * *
 

पाणी गुणवत्ता व सर्व्हेक्षणाच्या कार्यशाळेचे आयोजन


चाळीसगांव दि.18 : शुध्द् सुरक्षित पाणी पुरवठा तसेच पाणी गुणवत्ता सर्व्हेक्षणासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा दिनांक 21 जुन, 2012 रोजी परदेशी बोर्डींग हॉल, लक्ष्मी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा बाबत करावयाच्या उपाय योजना, टी.सी.एल.पावडरचे महत्व, ओ.टी.टेस्ट किट, दुषित पाणी नमुने, शासनाचे धोरण या बाबत मार्गदर्शन चर्चा होणार आहे. या कार्यशाळेस जिल्हा साथरोग अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता(ग्रा.पा.पु.) विस्तार अधिकारी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेकरिता तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.), विस्तार अधिकारी पंचायत समिती, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक, जलसंरक्षक (वॉटरमन), गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वयक आदि उपस्थित राहणार आहे. तरी या आयोजित केलेल्या कार्यशाळेत सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन गट विकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव यांनी एका प्रसिध्द्ी पत्रकान्वये केले आहे.  
            * * * * * *

Saturday, 16 June 2012

स्त्रीभृणहत्या प्रतिबंधाविषयी जनजागृतीकरिता आशा वर्कर्सचे सहकार्य घ्यावे - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


जळगांव, दि.16 :- जिल्हयातील प्रत्येक तालुका सामुचित प्राधिका-यांवर स्त्रीभृणहत्या रोखण्याची जबाबदारी असून ग्रामीण भागातील स्त्रीभृणहत्या प्रतिबंधा विषयी जनजागृती करण्याकरिता आशा वर्कर्सचे सहकार्य घेण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली. ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  पीसीपीएनडीटी अंतर्गत टास्क फोर्सच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
     या बैठकीत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा शल्यचिकित्सक एस गायकवाड , डीएचओ एस.बी सोनवणे, मनपा वैदयकीय अधिकारी श्रीमती शर्मा, निवासी वैदयकीय अधिकारी नितीन भारंबे, महिला असोसिएनच्या वासंती दिघे, अन्न औषधप्रशासनाचे गुलाबराव निनावे ,  डॉ. अनिल पाटील, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी व्ही.ए.पाटील, सर्व तहसिलदार मुख्याधिकारी (न.पा) आदि उपस्थित होते.  
     प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक श्री.गायकवाड यांनी स्त्रीभृणहत्या प्रतिबंधाकरिता विविध उपाय योजना विषयी समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक तालुक्यातील वैदयकीय अधिक्षकांने मशीन शील केलेल्या हॉस्पीटलच्या समोरील गर्भलिंग निदान चाचणी विषयीचा बोर्ड काढून ते सेंटर शील केले असल्याचा बोर्ड लावण्याची सूचना त्यांनी केली.
     मशीन हॅडलर दोन ठिकाणी सोनोग्राफी करु शकतात. परंतु त्यांच्या निर्धारित वेळेनंतर जर ती मशीन दुसरे कोणी  वापरत असेल तर असे मशीन शील करुन त्या सेंटरवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली.
     महानगर पालिकेच्या वैदयकीय अधिकारी श्रीमती शर्मा यांनी 6 जून पासून शहरात सोनोग्राफी सेंटरवर राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेची माहिती बैठकीत दिली. त्यात शहरातील 84 सोनोग्राफी सेंटर पैकी 81 सेंटरची तपासणी करुन 5 सेंटर शील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या 5 केंद्रावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच 12 केंद्रावर न्यायालयीन केसेस सुरु असल्याची माहिती श्रीमती शर्मा यांनी दिली, तर ग्रामीण भागातील एकूण सोनोग्राफी केंद्रापैकी  12 सेंटर बंद असल्याची माहिती डॉ. बडगुजर यांनी दिली.
                                      * * * * * *