Thursday, 30 October 2014

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त पोलीस उपअधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव श्री.ज्ञानदेव गवारे यांची घेतलेली मुलाखत

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त पोलीस उपअधिक्षक ,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव श्री.ज्ञानदेव गवारे यांची घेतलेली मुलाखत

1. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकसेवकांविरुध्द कारवाई करण्याकरीता कायद्यांची रचना कशी आहे ?
श्री. गवारेः- शासकीय कामकाजात लाचलुचपत स्विकारून भ्रष्टाचार करणा-यांना आळा घालण्यासाठी  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 1988 अस्तित्वात आला. या कायद्यातील कलम 13(1)अ नुसार लाच स्विकारणे, 13(1) ब नुसार मोफत भेट वस्तू स्विकारणे,  13(1) क नुसार कार्यालयीन सुविधा व मालमत्तेचा गेरवापर करणे, 13(1) ड नुसार कार्यालयीन पदाचा शासनास नुकसान व इतरांना फायदा होईल यासाठी वापर करणे, 13(1) इ नुसार अपसंपदा बाळगणे,  कलम 14 नुसार लाच देणे, दलाली करणे, अशाप्रकारे गुन्हे ठरविण्यात आले आहेत. त्यात गुन्हा सिद्ध झाल्यास एक ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा व दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
2. दक्षता सप्ताहाचा उद्येश काय आहे  ? या सप्ताहात कोणते उपक्रम राबविले  जातात  ?
श्री. गवारेः- महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे निर्देशाप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून प्रत्येक वर्षी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधात जागृती करणे हा या मागील प्रमुख उद्देश असतो. त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करुन लोकांना भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती करुन दिली जाते.
3. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोणाविरुध्द तक्रार करता येते . ?
श्री.गवारेः- कोणताही लोकसेवक ज्याला शासनाकडून वेतन अथवा मानधन मिळते अशा कोणत्याही लोकसेवकाविरुध्द तक्रार करता येते. उदा. मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्र अथवा राज्य शासनाकडून मिळणा-या अनुदानावर चालणा-या संस्थांमधील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, हे सर्व या कायद्याच्या कक्षेत येतात.
4. कर्मचा-यां व्यतिरिक्त कोणा - कोणा विरुध्द तक्रार करता येते ?
श्री. गवारेः- शासकीय अधिकारी / कर्मचारी  लोकसेवक यांच्या विरुध्द भ्रष्टाचाराचे तक्रारींमध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाते. कायद्याच्या व्याख्येनुसार शासकीय कमचा-यांचे व्यतिरिक्त नगरपरिषद ग्रामपंचायत, महानगरपालिका यामध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्य आणि शासकीय मदत घेणा-या शैक्षणिक, शासकीय व सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा देखील लोकसेवक म्हणून समावेश होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारींची आणि शासकीय नोकरांचे विरुध्द भ्रष्टाचाराचे बाबतीत मिळालेल्या माहितीची चौकशी करण्यात येते. मात्र जो सरकारी नोकर नाही अथवा लोकप्रतिनिधी नाही, मात्र एखाद्या नागरीकाने बेकायदा संपत्ती  जमविली असेल तर तक्रारीसाठी इन्कमटॅक्स अधिका-यांशी संपर्क साधावा.
5. तक्रार करतांना काय खबरदारी घ्यावी ?
श्री. गवारेः-  लाच मागणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा आपणास राग आला असेल तर त्यास धमकी किंवा इशारा वर्तन करु नये, तक्रार अर्जाचे टायपिंग किंवा लिखाण सार्वजनिक ठिकाणी करुन घेवू नका, आपण तक्रार करण्यास जात आहोत याची कल्पना कोणास देवू नका,ॲन्टी करप्शन ब्युरोसाठी कर्तव्यदक्ष व कर्तबगार अधिक-यांचीच निवड केली जाते.म्हणून त्यांच्यावर निसंकोचपणे विश्वास ठेवावा. निर्भिड होवून निर्भयपणे त्यांना भेटा व आपली अडचण सांगा.
6. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने कोणते फायदे होतात ?
श्री. गवारेः- आपल्या कामातील हेतुपुरस्पर केली जाणारी प्रशासकीय दिरंगाई दूर होते. वारंवार कोर्टात हेलपाटे घालावे लागत नाही, काही दिवसानंतर लाचेची रक्कम परत मिळते. संपूर्ण गुप्तता पाळली जाते. योग्य सल्ला व मार्गदर्शन दिले जाते, भविष्यात आरोपी जरी निर्दोष सुटला तरी तक्रार करणा-याला नुकसान भरपाई द्यावी लागत नाही.
7. तक्रार केल्यानंतर कारवाई कशी केली जाते ?
श्री. गवारेः- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चार प्रकारच्या केसेस मध्ये कारवाई करते.
          सापळे (Trap) : यामध्ये फिर्यादीने स्वत: हजर राहून लाच मागणा-या किंवा घेणा-या अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुध्द प्राथमिक खबर दाखल करावी लागते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याची शहनिशा करुन अशा लाच घेणा-या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द सापळा लावला जातो.
          अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती :- यामध्ये नागरिकांनी शासकीय कर्मचा-यांबाबत दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी करण्यात येते. अशा कर्मचा-यांचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, गुंतवणूक इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात येते. परंतू यासाठी खात्रीलायक आणि शहनिशा करण्याजोगी माहिती असणे जरुरीचे असते.
           अधिकाराचा दुरुपयोग :- यामध्ये शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन शासनाचे आर्थिक नुकसान करतो, किंवा त्यातून स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतो, अशा बाबतीत चौकशी करुन कायद्यानुसार अशा अधिकारी / कर्मचा-यांविरुधद कारवाई करण्यात येते.
          गुन्हेगारी स्वरुपाचे गैरवर्तन :- लोकसेवक म्हणून त्याच्याकडे सोपविण्यात आलेली कोणतीही मालमत्तेची अप्रमाणिक किंवा कपटाने अफरातफर करणा-या अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कारवाई करण्यात येते.
8. आपल्या कार्यालयांशी संपर्क कसा करावा ?
श्री. गवारेः- मध्यवर्ती शासनाच्या अखत्यारीतील कर्मचा-यांविरुध्द भ्रष्टाचाराच्या तक्रारीची दखल सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतली जाते. या कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन, टन्ना हाऊस, नाथालाल पारेख मार्ग, मुंबई. फोन नंबर - 022 -22021490, 22021773. फॅक्स नंबर - 022- 22021524.
राज्य शासनाच्या कर्मचा-यांविरुद्ध तक्रारीसाठी खालीलप्रमाणे संपर्क करता येईल.
पोलीस उप अधिक्षक, ,ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव (0257)- 2235477.
पोलीस उप आयुक्त /पोलीस अधिक्षक  ॲन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्रा, मनपा भाजी मार्केट इमारत, एचडीएफसी जवळ, शरणपूर रोड,नाशिक फोन : 0253- 2575628, 2578230.
 महासंचालक ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य मुंबई सरपोचखानवाला मार्ग,  वरळी  मुंबई - 400 025  (022) 24954826. अपर महासंचालक,ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य मुंबई (022)-24953500. पोलीस उपआयुक्त / पोलिस अधिक्षक ,ॲन्टी करप्शन ब्युरो   (0253)- 2575628, 2578230
याशिवाय भ्रष्टाचाराबाबत महाराष्ट्राचे लोक आयुक्त यांच्याकडे सुध्दा खालील पत्यावर तक्रार करता येते.
लोक आयुक्त कार्यालय
नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
मादामा कामा रोड,
मंत्रालयासमोर, मुंबई -32
9- यामुळे लाचखोरांवर काय परिणाम होतो?
श्री. गवारेः- जो पकडला जाईल किंवा ज्याच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या बद्यल गुन्हा दाखल होईल त्यावर होणारे परिणाम म्हणजे  त्याची समाजात किंमत राहत नाही, केसचा निकाल लागेपर्यंत त्याला मनस्ताप सहन करावा लागातो, दोषी ठरल्यास ग्रॅज्युएटी व पेन्शन अशा सुविधा मिळत नाही. कितीही मोठा वशिला असला तरी या काद्यान्वये कारवाई करतांना काही उपयोग होत नाही.
10- या सप्ताहानिमित्त आपण जनतेला काय आवाहन कराल?
 श्री. गवारेः- यानिमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर कोणी शासकीय अगर निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवक ज्यांना शासनाचा पगार, मानधन मिळते असे लोकसेवक आपले कायदेशीर काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाच म्हणून पैसे किंवा अन्य स्वरुपात लाचेची मागणी करीत असल्यास अथवा गैर मार्गाने मोठया प्रमाणावर संपत्ती जमा केली असल्यास तो लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. याबाबत आपण ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात तक्रार करु शकता.
-मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय , जळगाव.

* * * * * * * *

राष्ट्रीय एकता रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद


राष्ट्रीय एकता रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद

            चाळीसगांव,दिनांक 31:- देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान आणि एकात्मतेसाठी केलेले प्रयत्न याची जाणीव देशवासियांच्या मनात कायम रहावी यासाठी या दिनाचे औचित्य साधत चाळीसगांव प्रशासनातर्फे एकात्मतेची शपथ व एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पोलीस परेड मैदानापासून या रॅलीस सुरुवात करण्यात आली तर घाट रोड चाळीसगांव मार्गावर २ किलो मीटर अंतरावर या रॅलीचा समारोप करण्यात आला तत्पुर्वी पोलीस परेड मैदानावर जमलेल्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी एकात्मतेची शपथ दिली. या एकता रॅलीस  तालुक्यातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

            या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गटविकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांच्यासह तालुकयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, गृह रक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

            या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उद्या दिनांक 01 नोव्हेंबर, 2014 रोजी  हंस चित्रपट गृहासमोरील अनिल नगर, चाळीसगांव येथे आयोजीत केलेल्या स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी उपस्थित राहून श्रमदान करावे असे आवाहन उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी केले.

तहसिल कार्यालयात स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती
तर स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

            तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार अनंत परमार्थी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नायब तहसिलदार सुर्यवंशी, संदेश निकुंभ यांच्यासह सर्व कर्मचारी  उपस्थित होते.  
                                                                    
* * * * * * * * 

Wednesday, 29 October 2014

जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही : आमदार उन्मेश पाटील


जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही !

: आमदार उन्मेश पाटील


            चाळीसगांव,दिनांक 29:- जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी डेंग्यु आजाराच्या उच्चाटनासाठी आयोजीत तालुकास्तरीय कार्यशाळेत केले. शहरातील परदेशी बोर्डींग हॉल मध्ये या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, गट विकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डी.के.लांडे, संजय पाटील, राजेंद्र चौधरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.

            तालुक्यात डेंग्यु आजाराची मोठया प्रमाणात लागण झाली असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आणि सदर कार्यशाळेस अनुपस्थीत राहणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. डेंग्यु आजाराचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती होणेही तितकेच गरजेचे असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, कृषी सेवक यांनी तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन प्रबोधन करावे. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून प्राथमीक आरोग्य केंद्रातील प्रत्येक अधिकारी कर्मचा-यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही तर मनापासून काम करावे लागेल. तसेच चांगले काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा सन्मान देखील करण्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनाची गरज

            डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनाची गरज असून प्रशासनामधील अधिकारी कर्मचा-यांनी आपला अनुभव व कौशल्याची योग्य सांगड घालावी असेही आमदार पाटील यांनी सांगीतले. शहराला व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणा-या पाणवठयांच्या स्वच्छतेबाबतही संबंधीतांना सुचना केल्या. जनतेचा व शासनाचा दुवा म्हणून लोकांच्या सुचना आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतो परंतु त्याची दखल न घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सुचनाही त्यांनी आपल्या आवाहनात्मक भाषणातून दिल्या.

कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करणार

            यावेळी कार्यशाळेस अनुपस्थीत कर्मचा-यांची स्वत: आमदारांनी हजेरी घेतली तर अनुपस्थीत कर्मचा-यांवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्याच्या सुचनाही सर्व विभाग प्रमुखांना केल्या. कार्यशाळेचे आयोजन केवळ कागदावर नको असून प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे अशी आपेक्षाही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. तर पाणी टंचाई ही डेंग्यु आजाराची मुख्य समस्या असून यावर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सुचना केल्या.

            डेंग्यु तापाचा प्रसार कसा होतो, डेंग्यु ताप म्हणजे काय, डेंग्यु तापाची लक्षणे, लक्षणे आढळल्यास काय कराल, डेंग्यु रक्तस्त्रावात्मक तापाची लक्षणे या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.सुरेश पाटील, डॉ.कपील पाटील यांनी मार्गदर्शन केले तर डेंग्यु आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रामुख्यांने आठवडयातील एक ‍दिवस कोरडा दिवस पाळावा हे प्रामुख्याने सांगीतले.

            यावेळी प्राथमि क आरोग्य केंद्रातील अधि कारी, कर्मचारी,ग्रामसेवक, तलाठी, ग्राम विस्तार अधि कारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर आदी मोठया संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मानले.

* * * * * * * *

स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा !

: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगांव,दिनांक 29:- स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज स्वच्छ भारत अभियानातंर्गत तालूका प्रशासनाच्या आयोजित बैठकीत सांगितले. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, गटविकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी  रविद्र जाधव यांच्यासह तालुकयातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

            केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोंबर, 2014 पासून राबविण्यात येत असून, निवडणूक आचार संहितेमुळे राज्यात याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2014 पासून सुरु करण्यात येत आहे. स्वच्छता अभियान हे दिर्घ कालीन असून सन 2019 पर्यंत संपुर्ण स्वच्छ भारताचे लक्ष ठेवून अधिकाधिक लोकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपस्थित सर्व अधिका-यांनी आपल्या कार्यालयापासून स्वच्छता अभियानास सुरुवात करावयाची असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कार्यालयातील संपुर्ण अधिकारी कर्मचा-यांना अभियानाची सक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            दिनांक 01 नोव्हेंबर, 214 रोजी सकाळी 08:00 वाजता  शहरातील हंस चित्रपट गृहासमोरील अनिल नगर येथून या अभियानास सुरुवात होणार असून सर्व शासकीय अधि कारी, कर्मचा-यांनी या ठिकाणी उप स्थित राहून सहभाग नोंदवावा तसेच शहरातील तमाम नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी श्रमदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

            प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी  आपल्या स्तरावरून परिपत्रक काढून सर्व कर्मचा-यांना सुचित करावे व दिनांक 31 ऑक्टोंबर व 1 नोव्हेंबर रोजी आपल्या कर्मचा-यांसह या मोहिमेस उपस्थित रहावे तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील अभियानाचे आयोजन करण्याची जबाबदारी  गटविकास अधिकारी मालती जाधव यांच्यावर तर शहरी भागातील मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचात स्तरावरील ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद व पंचायत  समिती सदस्यांसह विविध पदाधि का-यांनाही यामध्ये सहभागी करुन घ्यावे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, वायरमन, अंगणवाडी सेवीका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ग्रामीण भागात सदर अ भि यान यशस्वी करुन प्रत्येक गावापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे पवित्र काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस दलही होणार सहभागी : उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड

            स्वच्छ भारत अभियानात तालुक्यातील संपुर्ण पोलीस दल, होमगार्डसह एन.सी.सी.चे पथकही या मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांनी यावेळी सांगितले.

स्वयंसेवी संघटनाना सहभागाचे आवाहन

            स्वच्छ भारत अभियानात तालुका प्रशासनातर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमात तालुक्यातील रोटरी क्लब, व्यापारी असोसिएशन, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनीधी यांनीही सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी केले आहे.

                                           * * * * * * * *

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमीत्त

राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन

            चाळीसगांव,दिनांक 29:- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त दिनांक 31 ऑक्टोंबर, 2014 रोजी तालुका प्रशासनातर्फे राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पोलीस परेड मैदानापासून याची सुरवात सकाळी 08:00 वाजता होणार असून त्यापुर्वी  प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील हे उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमीत्त राष्ट्रीय एकतेची शपथ देतील त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, सुरक्षा आणि संरक्षण याबाबत संदेश देत हया रॅलीची सुरुवात होऊन शहरातून घाट रोड कडे मार्गक्रमण होईल संपुर्ण २ किलोमिटर पर्यंत या एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हा मार्ग रहदारीसाठी काही काळ बंद करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या दौडमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, विद्यार्थी, युवक, शासकीय निमशासकीय कर्मचा-यांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

                                                              * * * * * * * *

Tuesday, 28 October 2014

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल



स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
 

जळगाव, दि.28-  स्वच्छता ही सा-यांची आणि सामूहिक जबाबदारी आहे. एकाने स्वच्छता करायची आणि इतरांनी अस्वच्छता करायची  यामुळे स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज केले. जिल्हा नियोजन भवनात आयोजित बैठकीस आज त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिका-यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस शहरातील व्यापारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी आदिंनी  उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभियानात योगदान देऊ केले.

स्वच्छ भारत अभियानातर्गत जळगाव जिल्ह्यात राबवावयाच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सर्व विभागप्रमुख, सामाजिक , स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजक, त्याच्या संघटनांची एकत्र बैठक बोलावली.  या बैठकीस जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी , विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.मुगळीकर, मनपा अपर आयुक्त साजिदखान पठाण, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानाची जळगाव जिल्ह्यातील सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. जळगाव शहरातील बळीराम पेठेतील घाणेकर चौकातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात हे अभियान राबविले जात असतांनाच ग्रामीण भागातही सर्व ग्रामपंचायतींमध्ये, तालुका मुख्यालय, नगरपालिका, नगर परिषदांच्या ठिकाणीही हे अभियान राबविले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या की,  स्वच्छता ही सामुहिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचे भान सा-यांना यावे ,सर्व जनतेपर्यंत संदेश पोहोचावा या हेतूने हा कार्यक्रम होणार आहे.या अभियानाची सुरुवात आधी आपापल्या कार्यालयांपासून करावी. आधी स्वतः पासून सुरुवात करा. प्लास्टीक पिशवीचा वापर टाळा. सर्व नागरिकांनी आणि समाजातील सर्व घटकांनी या अभियानात सहभागी होऊन 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे.

पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी सांगितले की, पोलीस दलही या अभियानात सहभागी होणार असून पोलीस स्टेशनचा परिसर, पोलीस दलाचे या अभियानासाठी संपूर्ण सहकार्य राहिल.

जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी  मुगळीकर यांनी सांगितले की जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतीत ही मोहिम राबविली जाईल. त्यासाठी दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी  गावागावांत स्वच्छता फे-या काढण्यात येतील.

या बैठकीच्या प्रारंभी सहभागी झालेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधींनी  या अभियानासंदर्भात आपापली मते मांडली. तसेच अनेक संघटनांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली. तसेच या अभियानासाठी लागणारे झाडू, टोपल्या, फावडे, मास्क आदी साहित्य देण्यासाठीही अनेकांनी पुढाकार घेतला. या बैठकीप्रमाणे तालुकास्तरावर बैठका घेऊन तेथील स्वच्छता अभियानाचे नियोजन करावे अशा सुचनाही जिल्हाधिका-यानी यावेळी उपस्थित अधिका-यांना केल्या.

या बैठकीस  इंडस्ट्री असो. चे अंजनीकुमार मुंदडा, लायन्स सिटी चे सिसोदिया, विनोद बियाणी, जैन इरिगेशनचे फारुख शेख,  रोटरी क्लबच्या डॉ. मंगला झोपे, कमलेश वासवानी, जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, युवा शक्ती फाऊंडॆशन आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले.

                                                                   0000

Sunday, 19 October 2014

17 Chalisgaon Assemble Constituency Final Report


17 Chalisgaon Assemble Constituency Final Report

Sr.No.
Candidate's Name
Party
Total Votes polled in this Assembly Segment
Postal Votes
Total
1
Ashok Hari Khalane
Indian National Congress
3303
25
3328
2
Unmesh Bhaiyyasaheb Patil
Bharatiya Janata Party
94159
595
94754
3
Jadhav Rakesh Lalchand
Maharashtra Navnirman Sena
4354
2
4356
4
Deshmukh Rajiv Anil
Nationalist Congress Party
71364
1010
72374
5
More Rajaram Barku
Bahujan Samaj Party
1359
1
1360
6
Ramdas Motiram Patil
Shivsena
4715
74
4789
7
Gunjal Ramesh Sahebrao
Independent
25610
79
25689
8
Pitambar Zulal Zalte
Independent
1471
0
1471
9
NOTA

1729
5
1734
10
Rejected Votes

0
248
248


Total -
208064
2039
210103


Friday, 17 October 2014

मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज !


मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज !

:निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील


            चाळीसगांव,दिनांक 17:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघातील मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केला आहे. हिरापूर रोडवरील य.ना.चव्हाण राष्ट्रीय विदयालयाच्या सभागृहात मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार असून या ठिकाणी मतमोजणी करिता 14 टेबल लावण्यात आले आहे . प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सुक्ष्म निरीक्षक, शिपाई अशा चार लोकांची टीम एका टेबलावर लावण्यात आली  आहे. मतमोजणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सि.सि.टी.व्ही. कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. सर्व मतमोजणी प्रक्रीयेचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. संपुर्ण मतमोजणी  प्रक्रीयेसाठी  150 कर्मचा-यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत तर मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या करिता त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  मनोज घोडे यांनी कळविले आहे.

            15 ऑक्टोंबर, 2014 रोजी  17-चाळीसगांव मतदार संघामध्ये एकूण 327 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतदार संघातील एकूण 3,22,266 इतक्या मतदारांपैकी  2,08,065 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारी  नुसार 64.56 टक्के इतके मतदान चाळीसगांव मतदार संघात झाले असून येत्या रविवारी  19 ऑक्टोंबर, 2014 रोजी  मतमोजणीची  प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मिडीया कक्षात लावण्यात आलेल्या बोर्डवर प्रसीध्द करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व प्रसीध्दी माध्यमांकरिता स्वतंत्र मिडीया कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी  मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आपला मोबाईल सोबत आणू नये अशा सुचनाही  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिल्या आहेत.

 
                                         * * * * * * * *

Saturday, 11 October 2014

चाळीसगावात निवडणूक प्रशिक्षण शिबीर संपन्न


चाळीसगावात निवडणूक प्रशिक्षण शिबीर संपन्न

                चाळीसगांव,दिनांक 11:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने जवळपास 1450 अधिकारी  कर्मचा-यांना आज निवडणूक निरीक्षक के.गोपाल कृष्णा भट यांच्या प्रमुख उपस्थितीत  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव मंगल कार्यालयात मतदान प्रक्रीयेसबंधी प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, विजय सुर्यवंशी, ए.एन.परमार्थी आदि उपस्थित होते.
            भडगांव रोड चाळीसगांव येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबीरात निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, 017 चाळीसगांव मतदार संघात चाळीसगांव शहरातील 182 व 206 हे दोन मतदान केंद्र संवेदनशिल असून या मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नजर राहणार आहे. मतदान प्रक्रीया निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
प्रशिक्षण शिबीरात पावर पॉईंट प्रेझेंटेशन व्दारे स्क्रीन वर संपुर्ण प्रात्याक्षीके दाखवून मुद्देनिहाय सर्व प्रक्रीया उपस्थितांना समजावून सांगतांना मतदान सुरु होण्यापुर्वीची तयारी, मतदान केंद्राची उभारणी, मतदान केंद्राची रचना या विषयी माहिती देऊन मतदान केद्रात एकावेळी केवळ 4 ते 5 मतदारांनाच कक्षात प्रवेश द्यावा, प्रत्येक कक्षासाठी एक पोलीस कर्मचारी असून त्यांनी पुरूष व महिला अशा दोन स्वतंत्र रांगा करुन अपंग किंवा जेष्ठ मतदारांना रांगेत उभे न करता थेट प्रवेश द्यावा. मतदारांशी सौजन्याने वागून मतदान प्रक्रीया शांततेत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी व कर्मचा-यांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी मतदान कक्षातील गुप्तता पाळणे हे कायद्याने बंधनकारक असून कसूर करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मतदारांची ओळख पटविण्यासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या ११ पुराव्यापैकी एक पुरावा काळजीपुर्वक तपासावा व बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी निवडणूक प्रक्रीया ही सकाळी 07:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत सुरु राहणार असून सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना चिठ्ठीचे वाटप करुन उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मतदान करु द्यावे. मतदान प्रक्रीया संपल्यानंतर आवश्यक ते सिलींग व दिलेल्या सर्व नमुन्यातील अहवाल अचुकपणे भरण्याची जबाबदारी केंद्राध्यक्षांची असून ती व्यवस्थीतपणे पार पाडावी. तसेच मतदान सुरु झाल्यापासून दर दोन तासाची आकडेवारी ही आपआपल्या क्षेत्रीय अधि का-यांना कळविण्यात यावी. मतदानाच्या ‍दिवशी काही तांत्रीक अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधावा असेही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले
प्रशिक्षण शिबीरात प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी
            प्रशिक्षण वर्गाच्या दुपारच्या सत्रात सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळून येणा-या अडचणींचे ‍निराकरण करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधि कारी सुरेश नरवाडे, डी.एस.बावीस्कर, आर.डी.पाटील, आशा साब्बनवार, मास्टर ट्रेनर वसईकर आदी उपस्थित होते.


                                              * * * * * * * *

निवडणूकीच्या अनुषंगाने चाळीसगावात पोलीस प्रशासनाचे शक्ती प्रदर्शन


निवडणूकीच्या अनुषंगाने चाळीसगावात
पोलीस प्रशासनाचे शक्ती प्रदर्शन

                चाळीसगांव,दिनांक 11:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी व भयमुक्त वातावरण निर्मीतीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील घाटरोड, नागद रोड, हुडको, चौधरी वाडा, सराफ बाजार या परिसरात रुट मार्च करण्यात आला. निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी व मतदारांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी अशा प्रकारचा रुट मार्च घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले आहे.निवडणूक कालावधीत बंदोबस्तासाठी 1 अप्पर पोलीस अधिक्षक, २ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, ३०९ पोलीस कर्मचारी, १२८ होमगार्ड तर गुजरात राज्यातील बॉर्डर विंग ची एक तुकडी असा फौजफाटा देखील निवडणूक कर्तव्यासाठी सज्ज झाला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

महिला मतदारांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा ! गट विकास अधिकारी मालती जाधव यांचे आवाहन


महिला मतदारांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा !
गट विकास अधिकारी मालती जाधव यांचे आवाहन

                चाळीसगांव,दिनांक 11:-  मतदान हा आपला हक्क असून सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, विशेषत: महिला मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा व निवडणूक प्रक्रीयेमध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी मालती जाधव यांनी केले. तालुक्यातील बहाळ येथे महिलांची विशेष सभा घेण्यात आली  त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या सुचनेनुसार महिलांनी निर्भयपणे मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे माहिती  पत्रकांचे वितरणही यावेळी करण्यात आले. तालुक्यात बहाळसह, जामदा, शिदवाडी, भवाळी, पिलखोड याठिकाणी  महिला सभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक पौर्णीमा राखुंडे, मास्टर ट्रेनर राऊतराय, विस्तार अधिकारी बागुल, माळी व स्थानिक गावातील ग्रामसेवक तलाठी आदी उपस्थित होते.


* * * * * * * *

Thursday, 9 October 2014

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांनी धरली कास


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
क्षेत्रीय अधिका-यांनी धरली कास

            चाळीसगांव,दिनांक 10 :- लोकशाही  बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे या उद्देशाने 017-चाळीसगांव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी नियुक्त केलेल्या 25 क्षेत्रीय अधिका-यांची (झोनल ऑफीसरांची) बैठक घेऊन किमान 75 टक्के व त्यापेक्षा अधिक मतदानाचे लक्ष ठरवून दिले होते. त्या अनुषंगाने मतदार संघात नियुक्त केलेल्या प्रत्येक क्षेत्रीय अधिका-यांनी  आप आपल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक, मतदाना ‍विषयीचे आपले कर्तव्य जबाबदारी, नव मतदारांना मतदान प्रक्रीयेचे महत्व व प्रात्यक्षीक, मतदार जनजागृती रॅली, चित्ररथाव्दारे मतदारांचे प्रबोधन असे विविध कार्यक्रम राबविले असून मतदार संघातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
            प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने ते पार पाडावे असे आवाहनही मतदान केंद्रावरील क्षेत्रीय अधिका-यांनी उपस्थित मतदार नागरिकांना केले. या मोहिमेमध्ये क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफीसर), आय.टी.आय.प्रशिक्षक व तलाठी अशी एक टीम तयार करुन 017-चाळीसगांव मतदार संघात अशा 25 टीम तयार करण्यात आल्या आहेत. संपुर्ण मतदार संघात मतदान यंत्र हाताळणी व स्वीप-2 अंतर्गत मतदार जनजागृतीचे काम मोठया प्रमाणावर सुरु आहे. विशेष करुन लोकसभेच्या वेळी कमी  मतदान झालेले मतदान केंद्र तसेच वंचित समाज/समुह यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून अशिक्षीत/निरक्षर मतदारांना मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षणही यावेळी देण्यात येत आहे.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघातील मतदानाच्या टक्केवारीचा विक्रमी टप्पा गाठण्यासाठी युवा मतदारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन चाळीसगांव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले असून कॅम्पस ॲम्बेसेडरांनी देखील युवा मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
                                                      * * * * * * * *

मतदार चिठ्ठीचे (voter slip) वाटप सुरु
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

चाळीसगांव,दिनांक 10 :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या 017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघात दिनांक 15 ऑक्टोंबर, 2014 रोजी  होणा-या मतदानासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून मतदारांना मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यास होणारा त्रास व वेळेचा अपव्यय होऊ नये  यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ) मतदार चिठ्ठयांचे घरपोच वाटपाचे काम सुरु झाले आहे. मतदार संघातील सर्व नागरिकांना मतदार चिठ्ठी ही घरपोच ‍मिळणार आहे. तरी ज्या मतदारांच्या निवासी पत्त्यात बदल झाला असेल अशा मतदार नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील संबंधित बी.एल.ओ. यांच्याशी संपर्क साधून मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.


                                                       * * * * * * * *