मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
क्षेत्रीय अधिका-यांनी धरली कास
चाळीसगांव,दिनांक 10 :- लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठया संख्येने मतदान
करावे या उद्देशाने 017-चाळीसगांव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी नियुक्त केलेल्या 25 क्षेत्रीय अधिका-यांची (झोनल ऑफीसरांची) बैठक
घेऊन किमान 75 टक्के व त्यापेक्षा अधिक मतदानाचे लक्ष ठरवून दिले होते. त्या
अनुषंगाने मतदार संघात नियुक्त केलेल्या प्रत्येक क्षेत्रीय अधिका-यांनी आप आपल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्राचे
प्रात्याक्षिक, मतदाना विषयीचे आपले कर्तव्य जबाबदारी, नव मतदारांना मतदान
प्रक्रीयेचे महत्व व प्रात्यक्षीक, मतदार जनजागृती रॅली, चित्ररथाव्दारे मतदारांचे
प्रबोधन असे विविध कार्यक्रम राबविले असून मतदार संघातही या मोहिमेला उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येक
मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे मतदान
हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने ते पार पाडावे असे आवाहनही मतदान
केंद्रावरील क्षेत्रीय अधिका-यांनी उपस्थित मतदार नागरिकांना केले. या मोहिमेमध्ये
क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफीसर), आय.टी.आय.प्रशिक्षक व तलाठी अशी एक टीम तयार करुन
017-चाळीसगांव मतदार संघात अशा 25 टीम तयार करण्यात आल्या आहेत. संपुर्ण मतदार
संघात मतदान यंत्र हाताळणी व स्वीप-2 अंतर्गत मतदार जनजागृतीचे काम मोठया
प्रमाणावर सुरु आहे. विशेष करुन लोकसभेच्या वेळी कमी मतदान झालेले मतदान केंद्र तसेच वंचित समाज/समुह
यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून अशिक्षीत/निरक्षर मतदारांना मतदान
यंत्र प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षणही यावेळी देण्यात येत आहे.
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघातील मतदानाच्या
टक्केवारीचा विक्रमी टप्पा गाठण्यासाठी युवा मतदारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन
चाळीसगांव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले असून कॅम्पस
ॲम्बेसेडरांनी देखील युवा मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी उपाययोजना
करण्याचे आवाहन केले आहे.
*
* * * * * * *
मतदार चिठ्ठीचे (voter slip)
वाटप सुरु
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
चाळीसगांव,दिनांक 10 :-विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या 017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघात दिनांक 15
ऑक्टोंबर, 2014 रोजी होणा-या मतदानासाठी
तालुका प्रशासन सज्ज झाले असून मतदारांना मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव
शोधण्यास होणारा त्रास व वेळेचा अपव्यय होऊ नये
यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ)
मतदार चिठ्ठयांचे घरपोच वाटपाचे काम सुरु झाले आहे. मतदार संघातील सर्व नागरिकांना
मतदार चिठ्ठी ही घरपोच मिळणार आहे. तरी ज्या मतदारांच्या निवासी पत्त्यात बदल
झाला असेल अशा मतदार नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील संबंधित बी.एल.ओ. यांच्याशी
संपर्क साधून मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व मतदान करुन आपले राष्ट्रीय
कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment