Friday, 27 April 2012

महाराष्ट्र दिनास सर्व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन: तहसिलदार- शशिकांत हदगल

चाळीसगांव दि.27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दिनांक 01 मे 2012 रेाजी पोलीस कवायत मैदान, चाळीसगांव येथे सकाळी ठिक 08:00 वाजता होणार आहे. तसेच संचलन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार शशिकांत हदगल यांनी कळविले आहे.

श्री क्षेत्र कनाशीला तिर्थक्षेत्राचा ब वर्गाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री :ना.गुलाबराव देवकर


चाळीसगांव दि.27 : भडगाव तालुक्यातील कनाशी येथील श्री चक्रधरस्वामी मंदीराचे उद्घाटन कृषि परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांच्याहस्ते आज पार पडले. याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, खासदार हरिभाऊ जावळे, आमदार दिलीप वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात ना.देवकर म्हणाले की, महाराष्ट्राची भुमी ही संतांची भुमी असून 18 व्या शतकातील श्री चक्रधर स्वामीनीं दिलेली शिकवण समतेच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाला उजळणी देतांना श्री चक्रधर स्वामींचे विचार आचारणात आणावे. महानुभाव पंथ हा श्रेष्ठ आदर्श घेणारा पंथ आहे, मराठी भाषा अधिक समृध्द् करण्याचे काम या पंथाने केले आहे. महिला शिक्षणाचा पुरस्कार देखील या पंथाने केला असून निष्ठावंताना देणारा हा देव आहे. असे एक ना अनेक धार्मीक गोष्टींना उजाळा देत या श्री क्षेत्र कनाशीला तिर्थक्षेत्राचा वर्गाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.देवकर यांनी यावेळी व्यक्त केले. त्याच प्रमाणे या गावातील मुलभूत गरजा (रस्ते, वीज पाणी) यांची देखील पुर्तता करुन या गावातील अखंडीत झालेली एस.टी.बस सेवा तात्काळ पुर्ववत करण्यात येणार असून या गावाला जोडण्यात येणारा कजगाव-कनाशी-भडगांव या रस्त्याचे कामही एक महिन्यात सुरु करण्यात येईल असे ना.देवकर यांनी आश्वासन दिले.
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एकनाथराव खडसे आपल्या भाषणात म्हणाले की, श्री क्षेत्र कनाशीचा इतिहास पहाता श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी 7 दिवस मुक्कामाला असल्यामुळे हे एक पवित्र असे तिर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचे रिध्दपूर हे एक प्रतिकाशी प्रमाणे एक स्थान असून महानुभाव पंथांच्या या सर्व तिर्थस्थानावर जाऊन जे मानसिक समाधान मिळते ते आजवर मला कुठेही मिळाले नाही. आजच्या या धार्मीक समारंभाप्रसंगी मी विरोधीपक्ष नेता म्हणून ना.देवकरांनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा करुन राजकारण बाजुला ठेवून या श्री क्षेत्र कनाशीचे जे काही मुलभूत प्रश्न आहेत ते सामजस्याने सोडवूण येथील जनतेला न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले.
     या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजक श्री बीडकर बाबा शास्त्री यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कर्म पिडीतांसाठी तसेच दु:खी कष्टी लोकांसाठी कन्हैयालाल बाबांचे हे मंदीर खुले असून या ठिकाणी येणार प्रत्येक भावीक हा सुख समाधानाने परत जात असतो. त्यामुळे महानुभाव पंथाचे जे ध्येय धोरण अवलंबीले जाते ते यामुळे पुर्ण होत असते. यावेळी अखील भारतीय महानुभाव परिषदेचे वतीने वर्धनस्त बिडकर बाबा यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या संतांच्या मेळाव्यात कै.आचार्य श्री ओंकार बिडकर बाबा स्मृती पुरस्कार हा सरभक्त श्री.सितारामजी कुडव यांना प्रदान करण्यात आला. तर कुलवर्धन या स्मरणिकेचे प्रकाशन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे महानुभाव पंथाच्या वेबसाईटचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
     या कार्यक्रमादरम्यान महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुभेच्छा संदेश या ठिकाणी वाचून दाखविण्यात आला.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविश्वर कुलाचार्य श्री.कारंजेकर बाबा यांना देण्यात आले होते यावेळी पाचोरा उप विभागीय अधिकारी मनोहर चौधरी, भडगांव तहसिलदार श्रीमती इंदीरा चौधरी, उप विभागीय पोलीस अधिकारी  प्रकाश गायकवाड, भडगांवचे पोलीस निरीक्षक भामरे सह संत महंत भावीक मोठया संख्येने उपस्थित होते.