Monday, 7 October 2013

सार्वजानिक धान्य वितरण व्यवस्था पारदर्शी करणार : पालकमंत्री संजय सावकारे


सार्वजानिक धान्य वितरण व्यवस्था  पारदर्शी  करणार : पालकमंत्री संजय सावकारे

            जळगाव दि.7 :- राज्यातील दारिद्रय रेषेखालील आणि दुर्गम भागातील पात्र कुटूंबांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजानिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. हे माध्यम पारदर्शीपणे राबविण्यासाठी शिधापत्रिका धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत केले.
            यावेळी जिल्हा दक्षता समिती सदस्य जोत्स्ना विसपुते, निता पाटील, लिलाधर तायडे, शांताराम पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांच्यासह शासकीय समिती सदस्य उपस्थित होते.
            दक्षता समिती सदस्यांनी आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करुन सार्वजानिक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याविषयी  ना.सावकारे यांनी मार्गदर्शन केले. अन्न सुरक्षा योजना डिसेंबर-2013 पासून कार्यान्वित होणार असुन त्याविषयीच्या शासनाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करिता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
            यावेळी दक्षता समिती सदस्यांनी विविध समस्या उपस्थित करुन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यावर योग्य त्या उपाययोजना सुचविल्या समिती सदस्य प्रशासन यांनी एकत्रित रित्या काम करुन स्वस्त धान्य दुकाने तपासणी, केरोसिन वाटपाचे प्रमाण दर, गॅस एजन्सी, शिधापत्रिकाधारकांचे निकष, बोगस शिधापत्रिका शोध मोहिम आदि प्रकारची कामे करुन सार्वजानिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणण्याची महत्वपुर्ण जबाबदारी समिती सदस्यांवर असल्याचे सांगितले.
            जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-2013 च्या अंमलबजावणीची पूर्व तयारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिका-यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सुचना केल्या. जिल्हयातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे  लाभार्थी शोध मोहिम राबविण्याविषयी सुचना केल्या. तसेच जिल्हयात एकुण 208 रास्त भाव दुकाने अकार्यान्वित असुन ती कार्यान्वित करण्याविषयी सुचित केले.
* * * * * *

No comments:

Post a Comment