Friday, 11 April 2014

निवडणुक काळात मद्यविक्रेत्यांवर महसुल व पोलीस प्रशासनाची करडी नजर : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


निवडणुक काळात मद्यविक्रेत्यांवर
महसुल व पोलीस प्रशासनाची करडी नजर
                                                              : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगाव, दिनांक 11 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने दिनांक 22 ते 24 एप्रिल, 2014 व दिनांक 16 मे, 2014 या कालावधीत मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 नुसार जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हयातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी जळगांव यांनी पारित केले असून मद्यविक्रेत्यांवर पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क व महसुल प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व मद्यविक्रेत्यांची आज तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते.  या बैठकीला सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते.
            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाने तिन प्रकारच्या कामकाजासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात प्रामुख्याने मतदार जागृती, उमेदवारांचे खर्च निरीक्षण व अवैध मद्य, शस्त्र  व रोख रक्कमेच्या वाहतुकीचे निरीक्षण केले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध मद्य साठा करुन त्याव्दारे मतदारांना प्रलोभन दाखविण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील सर्व मद्य विक्रेत्यांना एकत्रीत रित्या बोलावून बैठक घेण्याचा उद्देश प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांना बैठकीत विषद करतांना सांगितले की, आपली दुकाने व बियरबार धारकांनी  राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करावे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल. ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. अधिकृत परवानाधारकांनाच मद्यविक्री करण्यात यावी. विक्री मालाचे स्टॉक रजिष्टर अद्यावत ठेवण्यात यावे. निरीक्षकांच्या आदेशानुसार भरारी पथकाच्या कारवाईत मोठया प्रमाणात मद्यसाठा मिळून आल्यास पुरवठादाराचा तपास लावून पुरवठादारावर देखील कारवाई करण्याच्या सुचना असल्याने भविष्यात आपल्यावर या कटु कारवाईचा प्रसंग येणार नाही याची पुर्वकल्पना देण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमुद केले.

ड्राय-डे चे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करणार : पोलीस निरीक्षक संजय देशमुख

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 नुसार जिल्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी श्रीमती रुबल अग्रवाल (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी जळगांव यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व मद्यविक्री दुकाने दिनांक 22 ते 24 एप्रिल व 16 मे, 2014 रोजी बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. तरी त्या आदेशाच्या अनुषंगाने तालुक्यातील कुठेही मद्यविक्री सुरु असल्याचे दिसुन आल्यास कडक स्वरुपाची कारवाई करण्यात येईल अशा सुचना पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या व आपण भारताचे नागरिक या नात्याने निवडणुक प्रक्रीया मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आपले सहकार्य व योगदान महत्वाचे असुन ड्राय डे निमीत्त जरी आपला व्यवसाय बंद ठेवण्यात आला असला तरी आपण या सुटीच्या दिवशी आपल्यासोबत आपल्या ग्राहकांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment