Thursday, 31 May 2012

धार्मिक उत्सव साजरे करतांना जनतेने प्रशासनास सहकार्य करावे - खा.ए.टी.पाटील

चाळीसगांव दि.30 : धार्मिक उत्सव सण साजरे होत असतांना सामाजिक शांतता जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केवळ पोलीसांचेच नाही तर हे काम प्रत्येक नागरिकाचे आहे आणी म्हणून प्रत्येक नागरिकाने आपणच पोलीस आहोत अशा भुमिकेतून धार्मिक सण उत्सव साजरे करतांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन खा.ए.टी.पाटील यांनी चाळीसगांव पोलीस स्टेशनमध्ये पिर मुसा कादरी बाबा उरुसाच्या पार्श्वभुमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड होते.
     धार्मिक सण उत्सवाच्या काळात या शहरात जातीय सलोखा अबाधित ठेवला जातो. त्याचबरोबर सामाजिक सलोखा देखील जपला जातो. याकामी सर्व जाती धर्माच्या लोकांचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते, संघटनांचे पदाधिकारी यांचा समन्वय असतो. म्हणून चाळीसगांवमध्ये धार्मिक सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही या परंपरेमुळेच चाळीसगांवचा लौकीक वाढलेला आहे असे खा.पाटील यांनी सांगून पिर मुसा कादरी बाबा उरुसाच्या काळात सर्वांनी एकत्रितरित्या काम करण्याची आणि या शहराची आदर्श परंपरा जपण्याचे आवाहनही केले.
     भाविकांच्या कोणत्याही गैरसोयी होवू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील असे आमदार राजीव देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगून उरुसाच्या काळात पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीस प्रदिप देशमुख, तहसिलदार शशिकांत हदगल, मुख्याधिकारी सुनिल पवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मण गायकवाड, शेतकरी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे किसनराव जोर्वेकर, नगरसेवक के.बी.साळुखे, राजेंद्र चौधरी, नारायण अग्रवाल, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    
                                      * * * * * *

No comments:

Post a Comment