जळगांव, दिनांक 1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा वर्धापन दिन
साजरा करत असतांना राज्यात दुष्काळ , नक्षलवाद, दहशतवाद आदि समस्या ही निर्माण
झालेल्या आहेत. या समस्यांवर राज्य शासनाकडून उपाय योजना केल्या जात असतांना
राज्यातील सर्व नागरिकांनी एकजुटीने साथ देण्याचे आवाहन कृषि राज्यमंत्री तथा
जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस कवायत
मैदानावर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी आपल्या शुभेच्छा संदेशात वरील
आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर, पोलिस अधिक्षक प्रकाश मुत्याळ, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. निरुपमा डांगे, माजी आमदार श्री. बावीस्कर, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुजाळ, मनपा
आयुक्त प्रकाश बोखड, महापौर विष्णु भंगाळे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, पुरवठा अधिकारी
के.सी. निकम आदि अधिकारी , पदाधिकारी
यांचेसह स्वातंत्र्य सैनिक व शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
ना. देवकर पुढे म्हणाले
की, यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने प. महाराष्ट्र, विदर्भ,
मराठवाडा, खान्देश या भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाकडून पाणी पुरवठा योजना व चारा डेपोच्या
उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. जळगांव
जिल्हयात ही पाणी टंचाईची समस्या असून जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्यासाठी
कामात गती घेतली असल्याचे त्यांनी म्हटले..
राज्य विकासाच्या
मार्गावरुन जात असतांना गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयात नक्षलवादाची समस्या तीव्र
झालेली असून नक्षलवाद, दहशवाद, दुष्काळ आदि समस्याला सामोरे जातांना सर्व
नागरिकांनी एकत्रित येऊन साथ द्यावी असे ना. देवकर यांनी आवाहन केले. तसेच हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे पहिले
मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात
असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे राज्यस्तरावर आयोजन केलेले आहे असे त्यांनी
सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री
ना. देवकर यांचे हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजारोहण झाले. त्यानंतर
पालकमंत्र्यांनी परेड कमांडर परिक्षावधीन पोलिस उप अधिक्षक अनिकेत भारती यांच्या
समवेत परेड निरीक्षण केले.
यावेळी पालकमंत्री ना.
देवकर यांचे हस्ते शौर्य, क्रीडा, आदर्श तलाठी पुरस्कारांचे वितरण झाले. यात जीवन रक्षा पुरस्कार कुमार निखील सुधीर काबरा
यांना देण्यात आला तर सन 2011-12 चा आदर्श तलाठी पुरस्कार रविंद्र आर महाजन (
अडावद, चोपडा ) यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हा क्रीडा पुरस्कारांमध्ये विशाल शांताराम भोई ( खो खो ), दिपक चांगदेव
आरडे ( बॅडमिंटन ), प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे ( राष्ट्रीय खेळाडू ) आदिंना
देण्यात आला. जिल्हा पोलिस विशेष शाखेचे
श्री. गजानन विश्वनाथ पाटील यांना पोलिस महासंचालकाचे पदक मिळाल्याबददल पालकमंत्री
ना. देवकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर परेड
संचलन करण्यात आले. त्यात परेड कमांडर
अनिकेत भारती, पोलिस मुख्यालय पथक, होमगार्ड, महिला पोलिस पथक, महिला होमगार्ड,
शहर वाहतुक पथक व अग्निशामक दल आदि प्लाटून ने संचलन केले. परेड संचालनावर पालकमंत्री ना. देवकर यांनी
ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित जिल्हयातील मान्यवर, नागरिक , स्वातंत्र्य सैनिक,
जेष्ठ नागरिक, अधिकारी, पदाधिकारी यांची
भेट घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे विमोचन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment