Wednesday, 2 May 2012

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज -आमदार : राजीव देशमुख

चाळीसगांव दि.02 : तालुक्यातील पाणी चारा टंचाई आढावा बैठक आमदार राजीव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परदेशी बोर्डींग हॉल, चाळीसगांव येथे आज पार पडली, यावेळी पाणी चारा टंचाईचा गावनिहाय सुक्ष्म आढावा घेऊन टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन आमदार राजीव देशमुख यांनी यावेळी केले. तालुक्यातील तुरळक गांवे वगळता एकूण परिस्थीती चांगली असून शासनाची राष्ट्रीय पेयजल योजना, सामुहिक पाणीपुरवठा योजना, भारत निर्माण योजना, चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्याने टंचाईवर मात करणे सहज शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गावागावात बसविण्यात आलेले हात पंपांची सद्यस्थिती ते दुरुस्त करण्यासाठी करण्यात आलेल्या करारनाम्यांचा आढावा घेऊन उद्भवलेल्या अडचणी त्यावर आवश्यक त्या उपाययोजना याविषयी चर्चा करुन प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनास सुचना दिल्या. दरम्यानच्या काळात महावितरणास टंचाईकाळात पाणीपुरवठयासाठी लागणारी विज, बंद पडलेले जनित्र तात्काळ सुरु करण्यासाठीच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या.
     या आढावा बैठकीस पंचायत समिती सभापती श्री.विजयसिंग जाधव, उपसभापती सौ.लताताई दौंड, तहसिलदार शशिकांत हदगल, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीत गावनिहाय सर्व ग्रामसेवक, तलाठी, सरपंचाच्या अडचणी विचारुन त्यावर उपाययोजना करण्याविषयी खुली चर्चा झाली. सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री.जोर्वेकर यांनी 13 गाव पाणीपुरवठा योजना, पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईनचे लिकेज, विज बिलाविषयीच्या अडचणी मांडल्या त्यावर आवश्यक ते उपाय करण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांनी यावेळी दिले. पाणी चारा टंचाई यासारख्या संवेदनशिल विषयाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित असलेले ग्रामसेवक तलाठयांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन या संवेदनशिल विषयावरील कामकाजात दिरंगाई केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आमदार देशमुख यांनी दिला.
या आढावा बैठकीस नायब तहसिलदार माळी, नगरसेवक शाम देशमुख, किशोर देशमुख, वसंतराव चव्हाण, प्रदिप राजपूत, रामचंद्र जाधव, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, सरपंच संघटनेचे अध्यक्ष जोर्वेकर, नगर पालीका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, महावितरण कंपनीचे चौधरी,  तालुक्यातील सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * *

No comments:

Post a Comment