Friday, 14 September 2012

भुसावळ नगरपालिकेतील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी



             जळगांव, दिनांक 14:- भुसावळ नगरपालिकेच्या आस्थापनेवरील सर्व स्थायी व अस्थायी पदे तात्काळ भरण्याची मागणी पालिकेच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी राज्य वित्त आयोगाकडे केली.
            आज सायंकाळी चौथ्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट देऊन तेथील सर्व पदाधिकारी , नगरसेवक, अधिकारी तसेच भुसावळचे आमदार यांच्याशी पालिकेच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली.  या चर्चेदरम्यान सदरच्या रिक्त पदाची भरती त्वरित करण्याची मागणी करण्यात आली.
            प्रारंभी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी श्री. डांगे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी भुसावळ नगरपालिकेच्या विविध समस्या व नगरपालिकेच्या उत्पनाची माहिती दिली.    भुसावळ नगरपालिकेचे सन 2012-13 चे अंदाजपत्रक 416 कोटीचे असून त्यात स्व्‍-उत्पन्न सुमारे 40 कोटी असल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली. पालिकेच्या आस्थापनेवर 725 मंजूर पदे असून 560 कर्मचारी कार्यरत असल्याने शहरवासियांना नागरी सुविधा पुरवितांना कर्मचाऱ्यांअभावी असुविधा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
            भुसावळचे आमदार, नगराध्यक्ष, पदाधिकारी , नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पुढील मागण्या श्री. डांगे यांच्याकडे केल्या आहेत (1) रिक्त पदांची तात्काळ भरती  (2) सफाई कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी निधी मिळावा (3) पाणी पुरवठा , वीज थकबाकीसाठी निधी मिळावा (4) अल्पसंख्यांक निधी 1 कोटी असावा (5) 10 टक्के लोकवर्गणी अट रदद करावी (6) भू-संपादनासाठी 100 टक्के अनुदान (7) नगरपालिकेच्या रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी देणे (8) नगरसेवकांना वॉर्ड विकासासाठी स्वंतत्र निधी असावा व त्यांना पेन्शन व मानधन मिळावे. (9) वाढीव पाणी पुरवठेला मंजुरी द्यावी ( 10 ) शहराच्या हददवाढीच्या प्रस्तावांना मंजुरी देणे .(11) उर्दु शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी. (12) विविध प्रस्तावांची तांत्रिक मंजुरीचे अधिकार नगरपालिकास्तरावरच असावेत. (13) वैद्यकीय अधिकारी, स्थापत्य अभियंता आदि पदे त्वरित भरावित.
            सदरच्या सभेला जिल्हाधिकारी राजूरकर यांनी मार्गदर्शन करतांना पालिकेने मालमत्ता व पाणी पटटी कराची 100 टक्के वसुली करण्याची सूचना केली.  तसेच वैद्यकीय अधिकारी व स्थापत्य अभियंता ही पदे त्वरित भरले जातील असे सांगितले.
            वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरावेत. तसेच पुढील पाच वर्षात नगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात नगरसेवकांना कोणत्या विकास योजना राबवायच्या आहेत. त्याकरिता किती निधी आवश्यक असेल याची माहिती जिल्हाधिकारी यांचेमार्फत एका महिन्यात वित्त आयोगाकडे पाठविण्याची सूचना केली.
            यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, प्रांताधिकारी राहुल मुंडके, मुख्याधिकारी अनिल जगताप, उपनगराध्यक्षा खान नूरजहॉ आदिसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment