Sunday, 5 August 2012

भविष्यात भारत जागतिक नेतृत्वाची धुरा सांभाळेल : राज्यपाल


          मुंबई दि. 5 : भारताने जागतिक नेतृत्वाची धुरा सांभाळावी अशी जगाची अपेक्षा असल्याने भविष्यात भारताला जागतिक घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल.असे प्रतिपादन राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी काल येथे केले.
          खासदार डॉ.शशी थरुर यांनी लिहिलेल्या 'पॅक्स इंडिका' पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल ताज लॅण्ड, वांद्रे येथे राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चित्रपट अभिनेते शाहरुख खान, अनुपम खेर, राहुल बोस, जेष्ठ पत्रकार अनिल धारकर, लेखक चेतन भगत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
          भारताचा आर्थिक विकासदर, मजबूत आणि गतीशील लोकशाही त्याचबरोबर मोठी उपलब्ध बाजारपेठ यामुळे सर्व राष्ट्र प्रभावित झाली असून भारताकडे भविष्यातील महासत्ता म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, भविष्याकडे पाहत असताना आज देशापुढे दहशतवाद, घुसखोरी, जातीय दंगली आणि नक्षलवाद यांचे आव्हान उभे आहे. अंतर्गत समस्या आणि या आव्हानांकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही.
          'पॅक्स इंडिका' पुस्तकात 21 व्या शतकातील भारताचे परदेशी धोरण, आव्हाने आणि संधी याचे अतिशय सुंदर विश्लेषण डॉ. थरुर यांनी केले असून विद्यार्थी, संशोधक तसेच या क्षेत्रातील अभ्यासकांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

* * * * * * *


No comments:

Post a Comment