जलयुक्त शिवार योजनेतून महाराष्ट्र
टंचाईमुक्त करणार –मुख्यमंत्री
मुंबई,दि.5 : दुष्काळनिवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत एकत्रितपणे
राबवून 2019 पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यात येईल.अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आज येथे केली. ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या विषयावरसह्याद्री
अतिथीगृह येथे एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी
ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान योजनेत जलसंधारणाशी
संबंधित विविध उपक्रम एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येतील. यासाठी
प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करुन त्या विभागास उपयुक्त असे प्रकल्प हाती
घेण्यात येतील. यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. यात केंद्र शासनाचाही सहभाग वाढविण्यात येणार
आहे. या
अभियानाचे नियंत्रण मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस (सीएमटीओ) मार्फत केले जाईल.
नियंत्रणासाठी संस्थेची नियुक्ती
प्रकल्प अंमलबजावणीच्या नियमित अहवालाचे परिक्षण, समीक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. एखादे काम सुरु
करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचा अक्षांश- रेखांशासह डिजीटल फोटो वेबसाइटवर टाकण्यात
येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष काम झाल्याचे लक्षात येईल. या सर्व कामांवर नियंत्रणासाठी डिलीव्हरी
चेंज फाऊण्डेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्यास येत्या वर्षभरात पाच हजार गांवे
दुष्काळमुक्त करण्याची इच्छाशक्ती अधिकाऱ्यांनी दाखविलेली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
या परिषदेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, संबंधित
विभागांचे प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजसेवी संस्था व इतर मान्यवर उपस्थित होते.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment