Wednesday, 24 December 2014

ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य चिरकाळ टिकविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा : बाबासाहेब चंद्रात्रे


ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य चिरकाळ टिकविण्यासाठी
ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा !
ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांचे प्रतिपादन

                चाळीसगांव,दिनांक 24:- ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून त्याला ग्राहकराजा या ब्रिदवाक्याने संबोधले जाते. ग्राहक राजा हा केवळ वस्तु/सेवा घेण्यापुरताच राहतो तो चिरकाळ टिकविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा असे प्रतिपादन चाळीसगाव ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांनी  जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. तालुका प्रशासन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धुळेरोड चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहकदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
                या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाखले, व्यापारी असो. चे अध्यक्ष प्रदीप देशमुख, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे चेअरमन अशोक हरी खलाणे, भैय्यासाहेब पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक रमेश सोनवणे, ग्राहकमंचचे जिल्हा सचिव विजय पाटील, अण्णा धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
                ग्राहकांच्या मुलभूत गरजा ‍मिळविण्याचा अधिकार हा ग्राहक संरक्षण कायद्यातून मिळतो करिता त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्राहकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे असे  प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विकास महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले ग्राहक प्रबोधनसाठी आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रीत प्रमुख वक्ते या नात्याने त्याचे व्याख्यान ठेवण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आकर्षक जाहिराती, मनमोहक पॅकिंग आणि विक्री कलेचा  ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होतो. म्हणून त्यांना काही प्रमाणात कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता असल्याने  24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहकांसाठीचा कायदा संमत झाला आहे. ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपूर्ण माहिती व शिक्षणाच्या अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
स्वस्त धान्य वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणार : जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे
            शासनामार्फत शिधापत्रीका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात येत असलेल्या धान्याच्या वजनात फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी यावेळी केले. स्वस्त धान्य दुकानात येणा-या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार असून त्याला अनुज्ञेय असलेल्या धान्याचा संपुर्ण पुरवठा झाल्याखेरीज या प्रणालीतुन पावती उपलब्ध होणार नसल्याने ग्राहकांना ख-या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातुन केला जाणार असल्याचे गजरे यांनी यावेळी सांगितले.
                या कार्यक्रमात ग्राहक कायद्याचा इतिहास, ग्राहकाची कर्तव्ये, ग्राहकांचे अधिकार, ग्राहक संघटना, ग्राहक चळवळीचे उद्दीष्टे आदि विषयावर तहसिलदार बाबासाहेब गाढवे, चाळीसगांव तालुका व्यापारी असो. चे अध्यक्ष प्रदीप देशमुख, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणीक संस्थेचे चेअरमन अशोक हरी खलाणे यांचे मार्गदर्शनपर समायोचित भाषणे झालीत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी ग्राहक प्रबोधपर पथनाटयाचेही सादरीकरण केले.
ग्राहक प्रबोधन विषयावरील निंबध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीकांचे वितरण
                ग्राहकांचे प्रबोधन होण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधील विविध शाळा, महाविद्यालयातील विजेत्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
                या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश सोनवणे यांनी तर आभार ॲड.पोतदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लता महाजन, अभिजीत खलाणे, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, विकास वाणी, तालुका प्रशासनातील पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान लाभले. तर या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment