Sunday, 14 December 2014

फळबागा वाचविण्यासाठी विशेष उपाययोजना -मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस


                     फळबागा वाचविण्यासाठी विशेष उपाययोजना
                                                   -मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस
       नाशिक, दि. 14 :-  जिल्ह्यातील  फळबागांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याने  भविष्यात  शेतकऱ्यांचे  होणारे नुकसान टाळण्यासाठी  फळबाग  वाचविण्यावर विशेष  लक्ष देण्यात येईल,  असे  प्रतिपादन  राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी केले.
शिंदवड आणि वडनेर भैरव येथे नुकसानग्रस्त फळबागांची  पाहणी  केल्यानंतर  शेतकऱ्यांशी  संवाद साधतांना  ते बोल होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)  मंत्री एकनाथ शिंदे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , सहकार राज्यमंत्री दादाजी  भुसे,   आमदार अपूर्व हिरे, नरहरी झिरवळ, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप , मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव  प्रवीण परदेशी  विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी  विलास पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर , पोलीस अधिक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले,  आच्छादलेल्या बागांचे  कमी नुकसान  होत असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यासाठी  आवश्यक आच्छादन नेट  परदेशातून  आयात करावी लागते. ती शेतकऱ्यांना सुलभतेने मिळावी यासाठी योग्य उपाय करण्यात येतील. तसेच फळबागा वाचविण्यासाठी संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी निराश होवू नये. शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेवून मदतीबाबतचा निर्णय अधिवेशन असल्याने विधीमंडळात जाहीर करण्यात येईल.पीक विमा पद्धतीत फळबागांच्या नुकसानाच्या तुलनेत आर्थिक सहाय्य कसे देता येईल याबाबतही विचार करण्यात येईल. राज्यात  2 हजार हवामानदर्शक यंत्रे लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून ग्रामस्तरापर्यंत असे केंद्र स्थापन करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी वडनेर भैरव येथे नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी दिंडोरी तालुक्यातील वणी तळेगाव आणि सोनजांब येथील नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली. शेतकऱ्याची विज बिल माफी,कर्ज माफी, शेतकऱ्यांना पुढल्या वर्षासाठी कर्ज सहजपणे उपलब्ध करून देणे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
                                                **************  

No comments:

Post a Comment