जनतेला योग्य दराने वीज देण्यासाठी सामुहीक प्रयत्न आवश्यक : मुख्यमंत्री
नाशिक,
दि. 26 :- सामान्य माणसाला योग्य दराने वीज मिळावी
यासाठी शासन, वीज क्षेत्रातील तीन कंपन्या
आणि कर्मचारी यांचे सामुहीक प्रयत्न आवश्यक असून एकत्रित काम
केल्यास वीज क्षेत्राची क्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवधर इंजिनिअरिंग
महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप,
सीमा हिरे, वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक
अजय मेहता, महासंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बिचवे आदी उपस्थित
होते.
श्री. फडणवीस म्हणाले, वीजेचा वाढता दर हे राज्यासमोर मोठे आव्हान आहे. वीज
निर्मितीचा दर कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन यासाठी कटिबद्ध असून
त्यादिशेने प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या कोळशाबाबतच्या नव्या
धोरणामुळे वीज निर्मितीत फायदा होणार आहे. एका बाजुला कृषी क्षेत्राला सवलतीच्या
दरात वीज देत असताना उद्योग क्षेत्रासाठी
हे दर जास्त आहेत. त्यामुळे औद्योगिकरणाला अपेक्षित गती देता येत नाही.
उद्योगक्षेत्राला योग्य दरात वीज देण्यासाठी वीजेची तूट कमी करण्याचे चांगले
प्रयत्न होत असताना निर्मिती आणि वितरणातील क्षमता वाढविण्याची गरज आहे, असे
त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या उन्नतीत श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. ही
श्रमशक्ती जेव्हा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन कार्य करते तेव्हा राष्ट्र
वेगाने पुढे जाते. समाज व राष्ट्राचे हीत लक्षात घेत असताना कर्मचाऱ्याच्या
हितालाही तेवढेच महत्व आहे. हे लक्षात घेऊनच वीज कामगारांच्या पेन्शनबाबत सकारात्मक
भावनेने चर्चा केली जाईल. तसेच कंत्राटी कामगारांना योग्य जीवन जगण्याची संधी
देण्याच्यादृष्टीने धोरण आखण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वीज क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल झाले असून कामगारांनी आपल्या
श्रमाच्या बळावर वीज कंपन्यांना पुढे नेण्याचे कार्य केले आहे, असे सांगतांना
महाराष्ट्र वीज कामगार संघाच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.
------
No comments:
Post a Comment