कर्तव्याचे भान हीच हक्कांची जोपासना !
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचे प्रतिपादन
मानवी हक्क
दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
जळगाव, दि.10- समाजातील
सर्व घटकांनी आपल्या कर्तव्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपण आपले कर्तव्य चोखपणे
पार पाडले तर ख-या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल, असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी
आज केले.
मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्या
अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. याप्रसंगी
अति. जिल्हा न्यायाधीश श्रीमती के.बी. अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त
संजय कापडणीस, अन्याय विरोधी जनजागृती
मंचचे प्रदेश उपाध्यक्ष आत्माराम जाधव, ॲड. पंढरीनाथ चौधरी,निवडणूक उपजिल्हाधिकारी
मनोहर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी
अग्रवाल यांनी सर्व शासकीय कर्मचारी व
अधिका-यांनी आपले कर्तव्य पालन जबाबदारीने आणि पारदर्शकतेने केल्यास आपोआपच
जनतेच्या मानवी हक्कांचे रक्षण होईल. तथापि, समाजातील महिला, मुले, वृद्ध या
घटकांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागरुकता आणणेही महत्त्वाचे आहे. माध्यमांनी या
कायद्याबाबत लोकशिक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विषयतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनार्थ
आलेल्या अति जिल्हा न्यायाधीश श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले की, भारतीय
संविधानाच्या मुलभूत अधिकारांत समावेश करण्यात आलेल्या अधिकारांतच मानवी हक्कांचे
अस्तित्व दिसते. कलम 13 ते 35 अ पर्यंत अनेक अधिकारांचा समावेश वेळोवेळी त्यामुळेच
करता आला. नुकताच 2010 मध्ये त्यात
शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा समावेश करण्यात आला. मानवाने मानवाला दिलेली
मानवतेची वागणूक अशी मानवी हक्कांची त्यांनी व्याख्याही यावेळी सांगितली. तसेच
मानवी हक्कांच्या हननामुळे अत्याचार सहन करणा-या पिडीतांना सुजाण नागरिकांनी मदत करावी.
या प्रसंगी आत्माराम जाधव यांनी
मानवी हक्क कायद्याचा इतिहास विषद केला. तर
ॲड. चौधरी यांनी कायद्याचे स्वरुप, आयोगाची रचना याबाबत सविस्तर माहिती
दिली. पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी मानवी हक्कांच्या जपणूकीसाठी पोलीस दलातर्फे होत
असलेल्या उपायांची माहिती उपस्थितांना दिली.तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन होत
असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत पोलीसांना माहिती द्यावी, पोलीस योग्य त्या
कारवाईस तत्पर आहेत, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी अभिजीत
भांडॆ- पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तहसिलदार गोविंद शिंदे
यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी ,
सर्व विभागांचे प्रमुख आणि नागरिक, पत्रकार उपस्थित होते.
* * * * * *
* *
No comments:
Post a Comment