Wednesday, 17 December 2014

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी पथनाट्याद्वारे जनजागरण यात्रा

जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी
पथनाट्याद्वारे जनजागरण यात्रा
       जळगाव, दि. 17-  महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी आणि स्वच्छतेशी निगडीत असलेल्या डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने पथनाट्याद्वारे जिल्हाभर जनजागरण यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरु होणारा हा जनजागृतीचा कार्यक्रम जिल्ह्यातील दीडशे ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
            जळगाव जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानउत्स्फूर्तपणे राबविले जात असून या अभियानाची व्याप्ती अधिक वाढावी त्याबरोबरच स्वच्छतेशी निगडीत असलेल्या डेंग्यू आजाराच्या निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीने सहा लक्ष रुपयांची तरतूद केली असून  दिशा समाज प्रबोधन बहुउदेशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 15 तालुक्यांची मुख्यालये, शाळा-महाविद्यालये, बसस्थानक, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय अशा वर्दळीच्या दीडशे ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
            या पथनाट्यातून संबंधित कलापथके स्वच्छ भारत अभियानाची माहिती देऊन या कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निश्चित केलेला कृती कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवतील. लोकसहभागाद्वारे स्वच्छतेच्या सवयी लोकांच्या मनावर बिंबवणे आणि एकूणच जनतेच्या सवयीमध्ये स्वच्छतेस पूरक असे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराची लक्षणे, उपचार, शासनाच्या उपाययोजना आणि करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची जागृती पथनाट्याद्वारे केली जाणार आहे.
            पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ व सुंदर भारताच्या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील जनतेने या जनजागृती कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment