Friday, 26 December 2014

जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक- ना. एकनाथराव खडसे


जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक- ना. एकनाथराव खडसे

जळगाव, दि. 26- आयुष्यात विविध आनंद, दुःख अशा सर्व प्रसंगांना सामोरे जातांना, जीवनाला पुन्हा एक आल्हाददायक वळण देऊन, जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक आहेत. म्हणूनच विद्यार्थीदशेतच मिळालेले कलेचे शिक्षण आयुष्यात महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले.
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालयात ना. खडसे यांच्या हस्ते कान्ह ललित कला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षाताई खडसे, आ. सुरेश भोळे, आ. गुरुमुख जगवाणी, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते कान्ह संगित महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने ना. खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ना.खडसे म्हणाले की, केवळ शिक्षणाने जीवन परिपुर्ण होते असे नाही. त्यासाठी कला अभिरुची संपन्नता असणे आवश्यक आहे. कान्ह ललित कला केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आतापासूनच कला जीवनाचे संस्कार होतील. त्यातून जागतिक दर्जाचे आदर्श कलाकार समाजाला मिळतील. आणि या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जीवनात या कलांचा जीवन समृद्ध करण्यासाठी वापर करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी केले. कान्ह संगित महोस्तवात गायत्री जोशी यांनी गायन तर स्वाती भालेराव यांनी कथ्थक नृत्य सादर केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सजिव चित्रकला, शिल्पकला यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कला क्षेत्रातील नामांकित प्रभूती, विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment