उसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना,
आमदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी सूचना. तालुक्यातील हजारो
उसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार – आमदार उन्मेश पाटील.
महाराष्ट्र राज्यातील उसतोड व तत्सम कामगारांच्या
हितासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ स्थापण
करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून यासंदर्भात आमदार उन्मेश पाटील
यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार एकनाथरावजी खडसे, नामदार पंकजाताई मुंडे,
नामदार गिरीशभाऊ महाजन यांना निवेदन – भेटी घेऊन हा प्रलंबित प्रश्न अधिवेशनात
मांडण्याची विनंती केली होती. चाळीसगाव तालुक्यात उसतोड
कामगार हजारोंच्या संख्येने असून विशेषतः
बंजारा समाज त्यात प्रामुख्याने येतो. अधिवेशना अगोदर उसतोड कामगारांच्या
शिष्टमंडळाने आमदार उन्मेश पाटील यांची भेट घेऊन याविषयी विधानसभेत आवाज उठवण्याची
मागणी केली होती, तेव्हा आमदार उन्मेश पाटील यांनी उसतोड कामगारांचा प्रश्न हा
माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित
करण्याबरोबरच एप्रिल महिन्यामध्ये उसतोड कामगारांची राज्यव्यापी परिषद घेऊन आवाज
उठवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
झाल्यामुळे उसतोड कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
गोपीनाथराव मुंडे साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली –
आमदार उन्मेश पाटील
शासनाच्या या
निर्णयामुळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना खऱ्या अर्थाने सरकारने
श्रद्धांजली अर्पण केली असून तालुक्यातील उसतोड कामगारांची मोठी संख्या बघता
महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा कामगारांना मिळवून देणार असल्याचेही उन्मेश
पाटील यांनी सांगितले
अशी होती लक्षवेधी सूचना –
चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उसतोड कामगार
उसतोडी या अत्यंत कष्टाच्या – खडतर कामावर उदरनिर्वाह करत असणे, बहुतांशी उसतोड
कामगारांच्या जवळपासच्या परिसरातील साखर कारखाने नसणे किंवा बंद असणे यामुळे शेकडो
मैल गावापासून लांब पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह कठीण प्रवास करत उसतोडीच्या
हंगामात स्थलांतरित होणे, या स्थलांतरामध्ये तसेच प्रत्यक्ष उसतोडीच्या ठिकाणी
दरवर्षी हजारो कामगारांचा अपघाती मृत्यू होणे, या उसतोड कामगारांसाठी अत्यल्प
मजुरी मिळणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अपुऱ्या साखरशाळा उपलब्ध असणे,
व्यसन, पूर्वापार गरिबी – शिक्षणाचा अभाव, वस्त्यांवरील अपुऱ्या वैद्यकीय,
रस्त्यांच्या सुविधा यामुळे जीवनमान खालावणे, अपघाती मृत्यूनंतर विमा संरक्षण
नसल्यामुळे कुटुंबाचे होणारे आर्थिक हाल, यासाठी उसतोडकामगारांचे हित साधणारे
कल्याणकारी महामंडळ स्थापून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने लक्ष घालून
करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया.
No comments:
Post a Comment