Wednesday, 31 December 2014

तालुक्यातील सेतु केंद्र बंद महा-ई-सेवा केंद्रामार्फत दाखले प्राप्त करावेत : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

तालुक्यातील सेतु केंद्र बंद
महा-ई-सेवा केंद्रामार्फत दाखले प्राप्त करावेत
                                                       :तहसिलदार बाबासाहेब गाढवे

            चाळीसगांव,दिनांक 31:-  तालुक्यातील नागरिकांना महसुल प्रशासनामार्फत जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र या सारखे विविध दाखले हे सेतु सुविधा केंद्रामार्फत वितरीत करण्यात येत होते. म.जिल्हाधिकारी यांचे दिनांक 31 डिसेंबर, 2014 च्या पत्रान्वये सेतु सुविधा केंद्राच्या कराराची मुदत पुर्ण झाल्याने सदरचे सेतु सुविधा केंद्र बंद करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चाळीसगांव तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये या करिता दिनांक 01 जानेवारी, 2015 पासून नागरिकांनी सर्व प्रकारचे दाखले व प्रतिज्ञापत्रे महा-ई-सेवा केंद्रामार्फत दाखल करावेत असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रांचा तपशिल (१) चाळीसगांव बस स्थानकाशेजारील लकी कॉम्प्लेक्स दुसरा मजला, संचालक अमोल राऊळ मो.क्रं. 9860677849, (२) गणेशपुर, संचालक अविनाश राजपुत मो.क्रं.7620510510 (३) पिंप्री बु.प्र.दे. संचालक हरिश जैन मो.क्रं. 8805508508 (४) तांबोळे बु. संचालक प्रमोद कुमावत मो.क्रं. 9730437357 (५) मेहुणबारे, संचालक दिपक वाघ मो.क्रं.9822158910 (६) रांजणगांव, संचालक महेंद्र निंबाळकर मो.क्रं. 9860827811 (७) टाकळी प्र.चा. संचालीका अरुणा जोर्वेकर मो.क्रं.9423954087 (८) कळमडू, संचालक शाम सोनवणे मो.क्रं.9730109721 (९) चाळीसगांव स्टेशन रोड, साई कॅफे चाळीसगांव, संचालक अमोल देशमुख मो.क्रं.9595848422 (10) सायगांव, संचालक हिलाल रोकडे मो.क्रं.9921675697 (11) पिलखोड, संचालक पराग निकुंभ मो.क्रं.9623577007 (१२) वाघळी, संचालक गिरीश ब-हाटे मो.क्रं.9890879124 (१३) स्टेशन रोड, पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे, चाळीसगांव संचालक संजय पाटील मो.क्रं.9422775134 (14) घाटे कॉम्प्लेक्स, भडगांव रोड, चाळीसगांव, संचालिका जयश्री करंडे, मो.क्रं.8928544720 (15) चाळीसगांव नारायणवाडी, संचालक प्रशांत वाणी मो.क्रं.9921288715 (16) तमगव्हाण, संचालक सुनिल पाटील मो.क्रं.9922447577 असा असून नागरिकांनी वरील महा-ई-सेवा केंद्रामार्फत आपणास हवे असलेले दाखले प्राप्त करण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. तसेच सेतु सुविधा केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करुन सेतु सुविधा केंद्र पुर्ववत सुरु करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.
 * * * * * * * *

Monday, 29 December 2014

शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे : एकनाथराव खडसे


शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे : एकनाथराव खडसे
          नाशिक दि. 29 :- अतिवृष्टी, गारपिट आणि सातत्याने दुष्काळी ‍िस्थतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून रोजगार हमी योजना, जलयुक्त भुमि अभियान अशा तात्पुर्त्या व कायम स्वरुपी योजना राबवितांना शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना उभे करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले.
          राज्याचे महसुल, मदत कार्य व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री श्री. खडसे यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह सर्व प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.
          श्री. खडसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतांना त्यांच्यासाठी स्थायी व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राष्ट्रीय फळबाग योजना, पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यासाठी कर्ज माफी, वीजबील माफी, जल संधारणाची कामे हे करतांनाच शाश्वत शेतीसारख्या उपायोजना अंमलात आणल्या जातील. त्यासाठी नविन धोरण स्वीकारण्यात येत असून सरकार बरोबरच स्वयंसेवी संस्था, वितसंस्था, विमा कंपन्या यांच्याशी चर्चा करण्यात येवून निर्णय घेण्यात येतील असेही ते म्हणाले.
          प्रामुख्याने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्ज व अडचणीतून सोडविण्यासाठी सगळे प्रयत्न केली जातील. त्यामध्ये नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन, फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना, पिक पध्दीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृषि संशोधन आणि कृषी मालाच्या विक्रीसाठी आडत व्यापारी, बाजार समिती यांच्याशी विचार विनिमय करुन उपाय योजना आखल्या जातील, असेही यावेळी श्री. खडसे यांनी सांगितले.
          याप्रसंगी अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत वाटप, द्राक्ष, डाळींब आदि फळबागांच्या पुर्नउभारणीसाठी दिली जाणारी मदत याबाबींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच राज्य उत्पादन शुल्क, नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग या विभागांचाही आढावा घेतला.

* * * * * * * * * *

Friday, 26 December 2014

जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक- ना. एकनाथराव खडसे


जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक- ना. एकनाथराव खडसे

जळगाव, दि. 26- आयुष्यात विविध आनंद, दुःख अशा सर्व प्रसंगांना सामोरे जातांना, जीवनाला पुन्हा एक आल्हाददायक वळण देऊन, जीवनात आनंद फुलविण्यासाठी कलागुण आवश्यक आहेत. म्हणूनच विद्यार्थीदशेतच मिळालेले कलेचे शिक्षण आयुष्यात महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे केले.
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालयात ना. खडसे यांच्या हस्ते कान्ह ललित कला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षाताई खडसे, आ. सुरेश भोळे, आ. गुरुमुख जगवाणी, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते कान्ह संगित महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने ना. खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ना.खडसे म्हणाले की, केवळ शिक्षणाने जीवन परिपुर्ण होते असे नाही. त्यासाठी कला अभिरुची संपन्नता असणे आवश्यक आहे. कान्ह ललित कला केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आतापासूनच कला जीवनाचे संस्कार होतील. त्यातून जागतिक दर्जाचे आदर्श कलाकार समाजाला मिळतील. आणि या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जीवनात या कलांचा जीवन समृद्ध करण्यासाठी वापर करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी केले. कान्ह संगित महोस्तवात गायत्री जोशी यांनी गायन तर स्वाती भालेराव यांनी कथ्थक नृत्य सादर केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सजिव चित्रकला, शिल्पकला यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कला क्षेत्रातील नामांकित प्रभूती, विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

* * * * * * * *

जनतेला योग्य दराने वीज देण्यासाठी सामुहीक प्रयत्न आवश्यक : मुख्यमंत्री


जनतेला योग्य दराने वीज देण्यासाठी सामुहीक प्रयत्न आवश्यक : मुख्यमंत्री

       नाशिक, दि. 26 :-   सामान्य माणसाला योग्य दराने वीज मिळावी यासाठी शासन, वीज क्षेत्रातील  तीन कंपन्या  आणि कर्मचारी  यांचे सामुहीक प्रयत्न आवश्यक असून एकत्रित काम केल्यास वीज क्षेत्राची क्षमता वाढेल, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवधर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोल होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, महासंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बिचवे आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, वीजेचा वाढता दर हे राज्यासमोर मोठे आव्हान आहे. वीज निर्मितीचा दर कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन यासाठी कटिबद्ध असून त्यादिशेने प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या कोळशाबाबतच्या नव्या धोरणामुळे वीज निर्मितीत फायदा होणार आहे. एका बाजुला कृषी क्षेत्राला सवलतीच्या दरात वीज देत असताना उद्योग क्षेत्रासाठी  हे दर जास्त आहेत. त्यामुळे औद्योगिकरणाला अपेक्षित गती देता येत नाही. उद्योगक्षेत्राला योग्य दरात वीज देण्यासाठी वीजेची तूट कमी करण्याचे चांगले प्रयत्न होत असताना निर्मिती आणि वितरणातील क्षमता वाढविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या उन्नतीत श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. ही श्रमशक्ती जेव्हा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन कार्य करते तेव्हा राष्ट्र वेगाने पुढे जाते. समाज व राष्ट्राचे हीत लक्षात घेत असताना कर्मचाऱ्याच्या हितालाही तेवढेच महत्व आहे. हे लक्षात घेऊनच वीज कामगारांच्या पेन्शनबाबत सकारात्मक भावनेने चर्चा केली जाईल. तसेच कंत्राटी कामगारांना योग्य जीवन जगण्याची संधी देण्याच्यादृष्टीने धोरण आखण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वीज क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल झाले असून कामगारांनी आपल्या श्रमाच्या बळावर वीज कंपन्यांना पुढे नेण्याचे कार्य केले आहे, असे सांगतांना महाराष्ट्र वीज कामगार संघाच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी  विशेष उल्लेख केला.

------

Thursday, 25 December 2014

संविधानामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



संविधानामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
        नागपूर दि.25- कोणतेही संविधान चुकीचे असत नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच संविधानाची निर्मिती झालेली असते. कोणतीही व्यवस्था खराब नसते तर ती व्यवस्था चालविणाऱ्या लोकांवर तिचे भवितव्य अवलंबून असते असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 1990 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
            समारंभास कुलगुरु विनायक देशपांडे, सेवानिवृत्त प्राचार्य अरुण दत्तात्रय गोडबोले, प्राचार्य श्रीमती प्रमिला खोब्रागडे, डॉ.श्रीमती महाजनी, डॉ.श्रीमती स्नेहा देशपांडे, डॉ. श्रीमती रिंगे, डॉ.एस.के.कडाव आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, मी  या महाविद्यालयातील 1990 च्या बॅचचा विद्यार्थी आहे. शिक्षण घेत असतांना पहिल्या ते चौथ्या बॅच पर्यंतच्या विद्यार्थ्यांत समन्वय असायचा. स्नेहसंमेलनात भाग घ्यायचो, महाविद्यालयीन निवडणूका लढवायचो असे सांगून त्यांनी त्यावेळच्या स्नेह संमेलनातील आनंदाचे क्षण कथन केले. विधी महाविद्यालयामुळे मला जीवनात खूप काही शिकायला मिळाले. माझे व्यक्तिमत्व याच महाविद्यालयात तयार झाले. त्यावेळच्या वक्तृत्व स्पर्धांचा आवर्जून उल्लेख केला. हे सर्व करत असतांना माझा आत्मविश्वास वाढत गेला असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधान कोणतेही चुकीचे नसते. ते लोकांना न्याय मिळवून देते. व्यवस्था खराब नसते तर तिला चालवणारे लोक खराब असतात असे वाक्य वर्गात लिहिलेले होते. हे वाक्य मी जीवनात कायमचे कोरुन ठेवले आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाचे महत्व येथे मला मिळाले. अध्ययन करत असतांना कायदा आणि त्याच्या मागील मुलभूत तत्वे मी शिकलो. कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत मी नेहमी अग्रेसर राहिलो. कायद्यामागील मुलभूत तत्व समजले की कायदा समजायला सोपे जाते. 
            विधी महाविद्यालयातील शिक्षण घेतांना आपण चुकीचे काम केले नाही. आनंदी जीवन व्यतीत केले. आपण सर्वजणही पुढील काळात आनंदी जीवन व्यतीत करावे, अशा शुभेच्‍छा त्यांनी यावेळी सहकारी मित्रांना दिल्या.
            यावेळी ॲड. भारती डांगरिया यांनी सर्वांतर्फे मनोगत व्यक्त्त केले. त्यावेळच्या शिक्षकांमुळेच आम्ही उच्चपदापर्यंत जाऊ शकलो असे आदराने सांगितले. 1990 च्या बॅच मधील विद्यार्थ्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे, असे सांगून त्यांनी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असणारे न्यायमूर्ती, न्यायाधीश, सचिव, अन्य उच्च पदस्थ वर्ग मित्र मैत्रिणींच्या नावांसह उल्लेख केला.
            प्रारंभी सेवानिवृत्त प्राचार्य अरुण गोडबोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा तसेच अन्य मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. श्रीमती सरिता यांनी सरस्वती स्तवन गायिले. मुकूल कानिटकर यांनी सुत्रसंचालन करुन शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
* * * * * * * * *

Wednesday, 24 December 2014

ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य चिरकाळ टिकविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा : बाबासाहेब चंद्रात्रे


ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य चिरकाळ टिकविण्यासाठी
ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा !
ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांचे प्रतिपादन

                चाळीसगांव,दिनांक 24:- ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून त्याला ग्राहकराजा या ब्रिदवाक्याने संबोधले जाते. ग्राहक राजा हा केवळ वस्तु/सेवा घेण्यापुरताच राहतो तो चिरकाळ टिकविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब करावा असे प्रतिपादन चाळीसगाव ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांनी  जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. तालुका प्रशासन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धुळेरोड चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहकदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
                या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाखले, व्यापारी असो. चे अध्यक्ष प्रदीप देशमुख, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे चेअरमन अशोक हरी खलाणे, भैय्यासाहेब पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक रमेश सोनवणे, ग्राहकमंचचे जिल्हा सचिव विजय पाटील, अण्णा धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
                ग्राहकांच्या मुलभूत गरजा ‍मिळविण्याचा अधिकार हा ग्राहक संरक्षण कायद्यातून मिळतो करिता त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्राहकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे असे  प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विकास महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले ग्राहक प्रबोधनसाठी आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रीत प्रमुख वक्ते या नात्याने त्याचे व्याख्यान ठेवण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आकर्षक जाहिराती, मनमोहक पॅकिंग आणि विक्री कलेचा  ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होतो. म्हणून त्यांना काही प्रमाणात कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता असल्याने  24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहकांसाठीचा कायदा संमत झाला आहे. ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपूर्ण माहिती व शिक्षणाच्या अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
स्वस्त धान्य वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणार : जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे
            शासनामार्फत शिधापत्रीका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात येत असलेल्या धान्याच्या वजनात फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी यावेळी केले. स्वस्त धान्य दुकानात येणा-या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार असून त्याला अनुज्ञेय असलेल्या धान्याचा संपुर्ण पुरवठा झाल्याखेरीज या प्रणालीतुन पावती उपलब्ध होणार नसल्याने ग्राहकांना ख-या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातुन केला जाणार असल्याचे गजरे यांनी यावेळी सांगितले.
                या कार्यक्रमात ग्राहक कायद्याचा इतिहास, ग्राहकाची कर्तव्ये, ग्राहकांचे अधिकार, ग्राहक संघटना, ग्राहक चळवळीचे उद्दीष्टे आदि विषयावर तहसिलदार बाबासाहेब गाढवे, चाळीसगांव तालुका व्यापारी असो. चे अध्यक्ष प्रदीप देशमुख, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणीक संस्थेचे चेअरमन अशोक हरी खलाणे यांचे मार्गदर्शनपर समायोचित भाषणे झालीत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी ग्राहक प्रबोधपर पथनाटयाचेही सादरीकरण केले.
ग्राहक प्रबोधन विषयावरील निंबध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीकांचे वितरण
                ग्राहकांचे प्रबोधन होण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधील विविध शाळा, महाविद्यालयातील विजेत्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
                या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश सोनवणे यांनी तर आभार ॲड.पोतदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लता महाजन, अभिजीत खलाणे, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, विकास वाणी, तालुका प्रशासनातील पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान लाभले. तर या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

Monday, 22 December 2014

चाळीसगावात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

चाळीसगावात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

            चाळीसगांव,दिनांक 22:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक 24 डिसेंबर, 2014 रोजी  तालुका प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांच्या अध्यक्षतेखाली जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे रोड चाळीसगांव येथे सकाळी 10:30 वाजता आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्राहकांचे प्रबोधन होण्याच्या दृष्टीकोनातून सदर कार्यक्रमात विकास महाजन यांचे व्याख्यान, चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तालुका व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, महात्मा फुले सामा. व शैक्षणीक विकास मंडळाचे चेअरमन अशोक हरी खलाणे हे उपस्थित राहणार आहेत.
            तरी आयोजित कार्यक्रमातील व्याख्यान, चर्चासत्र व प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

Wednesday, 17 December 2014

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी पथनाट्याद्वारे जनजागरण यात्रा

जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी
पथनाट्याद्वारे जनजागरण यात्रा
       जळगाव, दि. 17-  महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या प्रसारासाठी आणि स्वच्छतेशी निगडीत असलेल्या डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने पथनाट्याद्वारे जिल्हाभर जनजागरण यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरु होणारा हा जनजागृतीचा कार्यक्रम जिल्ह्यातील दीडशे ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
            जळगाव जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानउत्स्फूर्तपणे राबविले जात असून या अभियानाची व्याप्ती अधिक वाढावी त्याबरोबरच स्वच्छतेशी निगडीत असलेल्या डेंग्यू आजाराच्या निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीने सहा लक्ष रुपयांची तरतूद केली असून  दिशा समाज प्रबोधन बहुउदेशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 15 तालुक्यांची मुख्यालये, शाळा-महाविद्यालये, बसस्थानक, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय अशा वर्दळीच्या दीडशे ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
            या पथनाट्यातून संबंधित कलापथके स्वच्छ भारत अभियानाची माहिती देऊन या कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निश्चित केलेला कृती कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवतील. लोकसहभागाद्वारे स्वच्छतेच्या सवयी लोकांच्या मनावर बिंबवणे आणि एकूणच जनतेच्या सवयीमध्ये स्वच्छतेस पूरक असे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराची लक्षणे, उपचार, शासनाच्या उपाययोजना आणि करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची जागृती पथनाट्याद्वारे केली जाणार आहे.
            पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ व सुंदर भारताच्या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील जनतेने या जनजागृती कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

00000

Tuesday, 16 December 2014

ध्वजदिन निधीसाठी योगदान हे प्रत्येकाचे कर्तव्य


ध्वजदिन निधीसाठी योगदान हे प्रत्येकाचे कर्तव्य
ध्वजदिन निधी संकलन शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी अग्रवाल यांचे प्रतिपादन

जळगाव, दि. 16- देशासाठी आपले तारुण्य आणि प्राणाची आहुती देणा-या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरल्या जाणा-या ध्वजदिन निधीत योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि प्रत्येकाने ते कृतज्ञ भावनेने पार पाडावे,असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज केले.
सशस्त्रसेना ध्वजदिन निधी संकलन 2014 चा शुभारंभ आज जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त अल्पबचत भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमानेअपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, 18 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर  कर्नल राव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर चंद्रसेन कुलथे आदी मान्यवर उपस्थित होतेप्रारंभी जिल्ह्यातील शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिका-यांनी ध्वजदिन निधीत आपले योगदान देऊन या निधी संकलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांनी निधीसाठी आपले योगदान दिले.
प्रास्ताविकात मेजर कुलथे यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा 2013 चा इष्टांक जिल्ह्याने पुर्ण केला असल्याची माहिती दिली. तसेच  या निधीचा उपयोग माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणा-या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केला जातो, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या की, ध्वजदिन निधी हा सैनिकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. हा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी संकलित करुन माननीय राज्यपालांच्या नावे जमा होतो. हा निधी कसा उपयुक्त आहे, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविल्यास योगदान नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली व आगामी वर्षासाठी निधी संकलनासाठी शासनाच्या सर्व विभागांना आवाहन केले. पोलीस अधिक्षक डा. सुपेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता त्यांचा सत्कार जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संकलित निधीतून सैनिकांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती तसेच कुटूंबियांना इतर लाभांचे धनादेश देण्यात आले. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2013 मध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या शासकीय विभागाच्या प्रमुखांचा  सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कर्मल पी.आर.सिंह, कमांडर श्रीधर मोरे, मेजर यशवंत लिमये, कॅप्टन मोहन कुलकर्णी, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व सैनिकांचे पाल्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोरी वाघुळदे यांनी केले. यावेळी निवृत्ती वेतनातून ध्वजदिन निधीसाठी 11 हजार रुपयांची देणगी देणा-या पेन्शनर्स असोसिएशनचे  जे.जे.साळी यांचाही सत्कार करण्यात आला.
वीरमाता, वीरपत्नींचा हृद्य सत्कार
या कार्यक्रमात वीरमाता साकरबाई धनाजी ठाकरे,इंदूबाई पुंडलिक पाटील, लक्ष्मीबाई भिवसन पाटीलअनुसयाबाई काशिनाथ शिंदे, तुळसाबाई रोहिदास बागुल, चंद्रकला आनंदा जाधवशैला अनंतराव साळूंखे, निर्मला सुवालाल हनुवतेकल्पना विलास पवार, सरला भानुदास बेडिस्कर, सुनंदा वसंत उबाळे, सुरेखा पोपट पाटील, कविता राजू साळवे, कल्पना देविदास पाटील, सुनंदा मनोहर पाटीलरंजना अविनाश पाटील, वीरपिता रमेश देवराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कल्पना देविदास पाटील यांनी घरकुलासाठी आर्थिक मदत तर पूजा संजय महाजन, स्नेहा राजेंद्र कासार, राजेश्वरी  सोनवणे, प्रियंका भदाणे, आश्विनी पाटील, विजया सतिश कदम, निकिता माळी, आकाश शिंदे, अमोल बडगुजर, ऋषभ पाटील, कृष्ण राजेंद्र मराठे, मिनाक्षी रघुनाथ माळी, वृषाली अनिल पाटील या सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती लाभाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

00000

Sunday, 14 December 2014

फळबागा वाचविण्यासाठी विशेष उपाययोजना -मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस


                     फळबागा वाचविण्यासाठी विशेष उपाययोजना
                                                   -मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस
       नाशिक, दि. 14 :-  जिल्ह्यातील  फळबागांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याने  भविष्यात  शेतकऱ्यांचे  होणारे नुकसान टाळण्यासाठी  फळबाग  वाचविण्यावर विशेष  लक्ष देण्यात येईल,  असे  प्रतिपादन  राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी केले.
शिंदवड आणि वडनेर भैरव येथे नुकसानग्रस्त फळबागांची  पाहणी  केल्यानंतर  शेतकऱ्यांशी  संवाद साधतांना  ते बोल होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)  मंत्री एकनाथ शिंदे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , सहकार राज्यमंत्री दादाजी  भुसे,   आमदार अपूर्व हिरे, नरहरी झिरवळ, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप , मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव  प्रवीण परदेशी  विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी  विलास पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर , पोलीस अधिक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले,  आच्छादलेल्या बागांचे  कमी नुकसान  होत असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यासाठी  आवश्यक आच्छादन नेट  परदेशातून  आयात करावी लागते. ती शेतकऱ्यांना सुलभतेने मिळावी यासाठी योग्य उपाय करण्यात येतील. तसेच फळबागा वाचविण्यासाठी संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी निराश होवू नये. शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेवून मदतीबाबतचा निर्णय अधिवेशन असल्याने विधीमंडळात जाहीर करण्यात येईल.पीक विमा पद्धतीत फळबागांच्या नुकसानाच्या तुलनेत आर्थिक सहाय्य कसे देता येईल याबाबतही विचार करण्यात येईल. राज्यात  2 हजार हवामानदर्शक यंत्रे लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून ग्रामस्तरापर्यंत असे केंद्र स्थापन करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी वडनेर भैरव येथे नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी दिंडोरी तालुक्यातील वणी तळेगाव आणि सोनजांब येथील नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली. शेतकऱ्याची विज बिल माफी,कर्ज माफी, शेतकऱ्यांना पुढल्या वर्षासाठी कर्ज सहजपणे उपलब्ध करून देणे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
                                                **************  

Saturday, 13 December 2014

तालुक्यातील हजारो उसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार – आमदार उन्मेश पाटील.


उसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना, आमदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी सूचना. तालुक्यातील हजारो उसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार – आमदार उन्मेश पाटील.
महाराष्ट्र राज्यातील उसतोड व तत्सम कामगारांच्या हितासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ स्थापण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून यासंदर्भात आमदार उन्मेश पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार एकनाथरावजी खडसे, नामदार पंकजाताई मुंडे, नामदार गिरीशभाऊ महाजन यांना निवेदन – भेटी घेऊन हा प्रलंबित प्रश्न अधिवेशनात मांडण्याची विनंती केली होती. चाळीसगाव तालुक्यात उसतोड कामगार हजारोंच्या  संख्येने असून विशेषतः बंजारा समाज त्यात प्रामुख्याने येतो. अधिवेशना अगोदर उसतोड कामगारांच्या शिष्टमंडळाने आमदार उन्मेश पाटील यांची भेट घेऊन याविषयी विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी केली होती, तेव्हा आमदार उन्मेश पाटील यांनी उसतोड कामगारांचा प्रश्न हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच एप्रिल महिन्यामध्ये उसतोड कामगारांची राज्यव्यापी परिषद घेऊन आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यामुळे उसतोड कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
गोपीनाथराव मुंडे साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली – आमदार उन्मेश पाटील
  शासनाच्या या निर्णयामुळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना खऱ्या अर्थाने सरकारने श्रद्धांजली अर्पण केली असून तालुक्यातील उसतोड कामगारांची मोठी संख्या बघता महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा कामगारांना मिळवून देणार असल्याचेही उन्मेश पाटील यांनी सांगितले
अशी होती लक्षवेधी सूचना –

चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उसतोड कामगार उसतोडी या अत्यंत कष्टाच्या – खडतर कामावर उदरनिर्वाह करत असणे, बहुतांशी उसतोड कामगारांच्या जवळपासच्या परिसरातील साखर कारखाने नसणे किंवा बंद असणे यामुळे शेकडो मैल गावापासून लांब पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह कठीण प्रवास करत उसतोडीच्या हंगामात स्थलांतरित होणे, या स्थलांतरामध्ये तसेच प्रत्यक्ष उसतोडीच्या ठिकाणी दरवर्षी हजारो कामगारांचा अपघाती मृत्यू होणे, या उसतोड कामगारांसाठी अत्यल्प मजुरी मिळणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अपुऱ्या साखरशाळा उपलब्ध असणे, व्यसन, पूर्वापार गरिबी – शिक्षणाचा अभाव, वस्त्यांवरील अपुऱ्या वैद्यकीय, रस्त्यांच्या सुविधा यामुळे जीवनमान खालावणे, अपघाती मृत्यूनंतर विमा संरक्षण नसल्यामुळे कुटुंबाचे होणारे आर्थिक हाल, यासाठी उसतोडकामगारांचे हित साधणारे कल्याणकारी महामंडळ स्थापून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने लक्ष घालून करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया.