Thursday, 8 January 2015

आदर्श गावाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक :खासदार ए.टी.पाटील


भोरस येथे सांसद आदर्शग्राम योजनेचा शुभारंभ
आदर्श गावाचे स्वप्न साकारण्यासाठी
प्रत्येकाचा सहभाग आवश्यक
                                                              :खासदार ए.टी.पाटील

            चाळीसगांव,दिनांक 8:- आदर्शगाव ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रशासनातले सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी एकदिलाने कामाला लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे, म्हणूनच भोरस बु. हे गाव आदर्श करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी गावातील प्रत्येकाने सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी केले.
चाळीसगाव तालुक्यातील भोरस हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत खासदार ए.टी.पाटील यांनी दत्तक घेतले असून या आदर्शग्राम योजनेचा शुभारंभ आज विविध लोकोपयोगी उपक्रमांनी करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ‍आमदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, ‍जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हा परिषद सदस्य विमलताई पाटील, पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, सदस्य सुवर्णा मांडोळे, सरपंच शोभा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
            खा.पाटील म्हणाले की, आदर्शग्राम योजनेच्या कामाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. भोरस बु. च्या गावक-यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली आहे, त्याचप्रमाणे आता गावक-यांना शौचालयाचे बांधकाम व वापर, वृक्षारोपण व संवर्धन, ग्रामस्वच्छता आदी कामे प्राधान्याने करावे लागतील. या योजनेतंर्गत गावातील नाल्याची सफाई लोकसहभागातुन होत आहे. गावातील घनकच-याच्या व्यवस्थापनासाठी प्रक्रिया प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मगच ते नाल्यात सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाव आदर्श करतांना गावातील प्रत्येकाच्या संकल्पनांना वाव मिळावा म्हणून ग्रामदिवस निश्चित करुन एक मताने गावाचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी आमदार उन्मेष पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी गट-तट विसरून एकत्र यावे व अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. भोरस गावातील सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या की, सांसद आदर्शग्राम योजनेतंर्गत भोरस गावात विविध योजनांचा निधी आणून पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल. मात्र केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करणे हे या योजनेचे उद्दिष्ट नाही तर सामाजिक परिवर्तन यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी गावात वृक्षारोपण, शौचालय बांधून त्याचा वापर, महिला सक्षमीकरण व बेटी-बचाओ-बेटी-पढाओ हे उपक्रम गावक-यांनी राबवावेत. प्रत्येक घरात शौचालय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पथनाटय सादर करुन स्वच्छ भारत अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम.मुगळीकर यांनी केले तर के.बी.साळुंखे यांनी सूत्रसंचलन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजीराव पवार, प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, राजन पाटील, सुनिल दुसाणे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment