Friday, 23 January 2015

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा :प्रांताधिकारी गणेश मिसाळ

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा !
:प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगांव,दिनांक 23:- जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन  पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रशासनातर्फे आयोजीत केलेल्या अधिका-यांच्या आढावा बैठकीत केले. शहरातील गिरड रोडवरील कृषी कार्यालयातील बैठकीसाठी पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, भडगाव तहसिलदार कापसे, पाचोरा गट विकास अधिकारी हिराबाई जाधव, भडगाव गट विकास अधिकारी सुभाष जाधव, जि.प.लघुसिंचन उप अभियंता गायकवाड, जलसंधारण उप अभियंता अहिरे, उप विभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधि कारी पाचोरा दिपक ठाकूर, भडगांव चकोर, नायब तहसिलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या सुधारित निकषानुसार पाचोरा तालुक्यातील 17 गावांची निवड करण्यात आली असून त्यात मोहाडी, वडगाव आंबे, सार्वे बु.प्र.लो., वडगांव खु.प्र.पा., हडसण, भोकरी, सावखेडा बु., वडगांव जोगे, कोल्हे, खेडगांव नंदीचे, वेरुळी बु., नाईकनगर, सांगवी प्र.लो., कुऱ्हाड खु. कुऱ्हाड बु., कासमपुरा,पिंप्री बु.प्र.पा. या गावांचा समावेश आहे. तर भडगाव तालुक्यातील 18 गावांची निवड करण्यात आली असून त्यात कजगांव, तांदुळवाडी, आंचळगांव, वडजी, खेडगांव खु., शिवणी, वलवाडी बु., वडगांव नालबंदी, वाक, कोळगांव, पथराड, महिंदळे, रुपनगर, पळासखेडे, पिचर्डे, शिंदी, पासर्डी, भोरटेक बु. या गावांचा समावेश करण्यात आला आहे.  सन 2019 पर्यंत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून  या गावांची टंचाईमुक्त गाव अशी ओळख निर्माण करण्याची आपणा सर्व अधिका-यांवर महत्वपुर्ण जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानात पाणलोट विकासाची कामे, जुन्या बंधा-यांची दुरुस्ती, जुन्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे,  पाझर व लघुसिंचन तलावांची दुरुस्ती, साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे रुंदीकरण/खोलीकरण, पाझर तलाव, नालाबांध आदींचा गाळ काढणे, मध्यम व मोठया प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार वापर करणे आदी कामांचा समावेश असून गेल्यावर्षी गाळ काढण्याच्या मोहिमेला लोकसहभागामुळे कामाची व्यापकता वाढली होती त्याच प्रकारे या मोहिमेत देखील लोकांनी पुढे येऊन लोकसहभाग नोंदवावा व एक मॉडेल व्हिलेज तयार करावे असे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी यावेळी केले.
प्रजासत्ताक दिनी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार भुमिपूजन
जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते येत्या 26 जानेवारी, 2015 रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार असून नगरदेवळा येथे सिमेंट नाला बांधचे दुपारी 1:00 वाजता तर शिंदी येथील सिमेंट नाला बांधचे दुपारी 4:00 वाजता भुमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गावातील पदाधिकारी, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment