ग्राम दक्षता पथकाव्दारे वाळु चोरी
रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात
:प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगांव,दिनांक 22:-
पाचोरा व भडगांव तालुक्यातील गिरणा व तितुर या नदीकाठच्या गावांमध्ये वाळू लिलावा
बाबत दिनांक 12 मार्च, 2013 च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभा घेण्यात आल्या
ग्रामसभेतील ठरावानुसार गावात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने व
गावक-यांचा विरोध असल्याने वाळू लिलाव न घेण्याबाबत जिल्हाधिकारी जळगांव यांना
प्रस्ताव सादर करण्यात आला असून तसा पत्रव्यवहार संबंधित ग्रामपंचायतींनाही
करण्यात आला आहे.
ज्या ग्रामपंचायतींमधील
ठरावाच्या अनुषंगाने वाळू लिलाव प्रक्रीया थांबविण्यात आली आहे अशा गावातील
वाळूचोरी रोखण्याची जबाबदारी प्रशासनासोबत समस्त गावकरी व ग्रामपंचायतींचे
पदाधिकारी यांची देखील राहणार आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे चोवीस तास खडा पहारा देऊ शकत नसल्याने
गावक-यांनी तसेच पदाधिकारी यांनी वाळू साठयांची निगराणी ठेवण्यासाठी गावातील
तरुणांचे ग्राम दक्षता पथकाची नेमणूक करुन वाळु चोरी रोखण्यासाठी उपाय योजना
करण्याचे आवाहन प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
त्याच बरोबर वाळू लिलाव प्रक्रिया ज्या गावात थांबविण्यात आली आहे अशा गावातील
वाळु चोरीचे प्रकार उघडकीस आल्यास संबंधित ग्रामपंचायत पदाधिका-यांचे सदस्यत्व
रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार
असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
तसेच प्रांताधिकारी यांनी
ज्या गावांमधून वाळूचोरी होत नाही असे भडगांव तालुक्यातील सावदे, वडजी, गुढे,
भातखंडे बु. तर पाचोरा तालुक्यातील भातखंडे खु.प्र.पा., होळ, वरताडे प्र.बो.,
परधाडे या गावांचे खास अभिनंदन व कौतुकही केले आहे.
* * * * * * * *
ध्वजसंहितेतील तरतूदींचे काटेकोर पालन करावे
:प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
चाळीसगांव,दिनांक 22:-
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिनासारखे राष्ट्रीय कार्यक्रम,
महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रिडा सामन्यांच्यावेळी स्थानिक पातळीवर
जनतेमार्फत राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा व अभिमान दर्शविण्याकरिता
वैयक्तीरित्या छोटया राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा योग्य तो
मान राखला जावा या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सुचना प्रसारित केल्या जातात.
त्याअनुषंगाने ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करणे
तसेच खराब झालेल्या, माती लागलेल्या राष्ट्रध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गृह विभागाने या संदर्भात मार्गदर्शक
सुचना दिल्या आहेत. नागरिकांनी कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या
तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. कार्यक्रम पार पडल्यानंतर कार्यक्रमाच्या
ठिकाणी इतरत्र पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण
करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर
संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी सदर राष्ट्रध्वज स्थानिक प्रशासन तथा
तहसिलदार यांचेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन प्राताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी
केले आहे.
* * * * * * * *
प्रजासत्ताक दिनाचा 65 वा वर्धापन
दिन समारंभ पोलीस परेड मैदानावर
:तहसिलदार बाबासाहेब गाढवे
चाळीसगांव,दिनांक 22:-
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2015
रोजी सकाळी 9:15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उप विभागीय अधिकारी मनोज
घोडे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार
बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. शहरातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या
नियोजनासाठी तहसिल कार्यालय चाळीसगाव येथे उप विभागीय अधिकारी चाळीसगांव यांच्या
अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व कार्यालय
व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली प्रसंगी ते बोलत होते.
प्रजासत्ताक
दिनी ध्वज सरंक्षणासाठी पोलीस प्रमुखांना
दोन पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या, तर वन्य जिवांचे
सरंक्षण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रीका प्रदर्शित करण्याच्या
सुचना वन विभागाला देण्यात आल्या, विविध शाळांनी आपले सांस्कृतीक कार्यक्रमाचे
आयोजनाची मंजूरी घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती
यांना सुचना देण्यात आल्या तर आदर्श आचारसंहितेचे यथोचित नियोजन सर्व विभाग प्रमुखांनी
करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
शहरातील
जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी,
2015 रोजी सकाळी 08:30 ते 10:00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही
शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा
संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी
08:30 पूर्वी किंवा 10:00 वाजेनंतर करावे असे आवाहनही उप विभागीय अधिकारी मनोज घोडे
यांनी केले आहे.
* * * * * * * *
चाळीसगांव न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न
चाळीसगांव,दिनांक 22:-
विधी सेवा समिती, चाळीसगांव पंचायत समिती तसेच वकील संघ चाळीसगांव तर्फे न्यायालय
परिसरात कायदेविषयक चर्चा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात शालेय तसेच
सामाजिक स्तरावरील विधी विषयक, शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणा-या
विविध प्रकारच्या योजना, अंधश्रध्दा निर्मुलन, शेतकऱ्यांसाठी विविध योजना व
कायदे, विधी विषयक कायदा, बंदीस्त असणाऱ्या कैद्याबाबतचे सुधारित अधिकार व कायदे
या विषयांवरील चर्चा शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष
न्या.डी.पी.खंडेलवाल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून न्या.एम.आर.सोनी,
न्या.पी.ए.पत्कि, होते तर सहाय्यक गट विकास अधिकारी तथा विधी सेवा समितीचे सचिव
सुरेश नरवाडे, तालुका कृषी अधिकारी जी.आर.पाटील, मेहुणबारे पोलीस निरीक्षक जयवंत
सातव, वकील संघाचे अध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह वकील संघाचे सभासद, पक्षकार व
नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment