जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा !
:आमदार उन्मेष पाटील
चाळीसगांव,दिनांक 17:-
जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा अशा सुचना आमदार उन्मेष पाटील यांनी तहसिल
कार्यालयात तालुका प्रशासनाने आयोजीत केलेल्या अधिका-यांच्या आढावा बैठकीत केल्या.
यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, सहाय्यक गट
विकास अधिकारी सुरेश नरवाडे, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील यांच्यासह सर्व
विभाग प्रमुख उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या
दिनांक 02 जानेवारी, 2015 च्या निकषानुसार तालुक्यातील 24 गावांची निवड करण्यात
आली असून त्यात लोंजे, शेवरी, डोण दिगर, टाकळी प्र.चा., ओझर, खरजई, वाकडी, रोकडे,
शिरसगांव, टाकळी प्र.दे., तळोंदे प्र.दे., माळशेवगे, डामरूण, वडाळा-वडाळी, पिंप्री
खु. परशरामनगर, रांजणगांव, सांगवी, खेरडे, सोनगांव, आंबेहोळ, तळोंदे प्र.चा.,
बोढरे, भोरस या गावांचा समावेश असून सन 2019 पर्यंत जलयुक्त शिवार अभियान
राबविण्यात येणार आहे. तरी या गावांची टंचाईमुक्त गाव अशी ओळख निर्माण करण्याची
आपणा सर्व अधिका-यांवर महत्वपुर्ण जबाबदारी असून कर्तव्य पार पाडतांना हयगय
करणा-या अधिका-यांची गय करणार नाही अशी तंबी देखील आमदार पाटील यांनी या बैठकीत
दिली. जलयुक्त शिवार अभियानास जलसाक्षरतेची देखील जोड मिळणार असून शिरसगांवचा
ब्रिटीश कालीन बंधार, बोढरे तसेच ओझर येथील नैसर्गिक स्त्रोताचे सरंक्षण व संवर्धन
करणे महत्वाचे असल्याचे आमदार पाटील यावेळी म्हणाले.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी दिनांक 20 ते 23 जानेवारी, 2015 या कालावधीत संपुर्ण शिवार फे-या
पुर्ण करण्याच्या सुचना केल्या तर येत्या
27 जानेवारी, 2015 रोजी पुन्हा या बैठकीचा आढावा आमदार उन्मेष पाटील यांच्या
उपस्थित घेणार असल्याचे सांगितले.
* * * * * * * *
77 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
चाळीसगांव,दिनांक 17:- तालुक्यातील 77
ग्रामपंचायतींचा मा.राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्या दिनांक 12.01.2015 च्या
पत्रानुसार प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर झाल्याचे तहसिलदार बाबासाहेब
गाढवे यांनी कळविले आहे. जुलै-2015 ते डिसेंबर-2015 या कालावधीत मुदत संपणा-या
ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर झाला असून प्रभाग
रचनेच्या कामकाजासाठी तालुक्यातील एकूण 31 अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले
आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच, आजी माजी
सदस्य, तसेच सर्व संबंधीत पदाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या दिनांकास उपस्थित
राहण्याचे आवाहनही केले आहे. नेमणूक केलेल्या अधिका-यांनी त्यांनी दिलेल्या
कार्यक्रमाप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियमाप्रमाणे बैठक घेऊन ग्रामविकास
अधिकारी/ ग्रामसेवक व तलाठी यांच्या मदतीने प्रभाग रचनेचे कामकाज पुर्ण करुन अहवाल
सादर करण्याच्या सुचनाही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सर्व संबंधितांना दिल्या
असून कामात हयगय झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची सुचनाही दिली आहे.
* * * * * * * *
तिळगुळ घ्या, विज बील भरा
महावितरणच्या अभियानाला देवळीचा सकारात्मक प्रतिसाद
चाळीसगांव,दिनांक 17:- महावितरणचे चाळीसगांव ग्रामीण-1 मार्फत तिळगुळ
घ्या, विज बील भरा हे अभियान राबविण्यात आले याला या अभियानाला तालुक्यातील देवळी
ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद देत सरपंच भगवान पाटील यांनी उप कार्यकारी
अभियंता धिरज चव्हाण यांच्याकडे 60
हजाराची थकीत विज बीलाची रक्कम भरणा करुन आदर्श घालुन दिला आहे.
चाळीसगाव
ग्रामीण-1 च्या वतीने मकरसंक्रातींचे निमीत्त साधत आगळे-वेगळे अभियान राबविले.
उपविभागातील सर्व ग्रामपंचायतींना भेट देऊन पाणीपुरवठा विज कनेक्शनची थकबाकी
भरण्याविषयी आवाहन करण्यात आले. या अभियानात उप कार्यकारी अभियंता धिरज चव्हाण
यांच्यासह अभियंता पवार, मोरे, सरोदे, महाजन व गवळी यांनी सहभाग घेतला असून सदर
अभियान राबविण्यासाठी प्रताप सपकाळे यांनी
विशेष परिश्रम घेतले आहेत.
ग्रामपंचायतींमार्फत
पाणी पुरवठयाची विज बीलाची थकीत रक्कम भरण्यासाठी देवळी ग्रामपंचयातीचा आदर्श घेऊन
इतर थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीनी देखील विज बील भरणा करुन महावितरणला सहकार्य
करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कृषि संजिवनी योजनेला शासनामार्फत
मार्च-2015 पर्यंत मुदत वाढ मिळाली असल्याने या योजनेचाही शेतक-यांनी लाभ घ्यावा
असे आवाहन उप कार्यकारी अभियंता धिरज चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
* * * * * * * *
नवे वर्ष नवे संकल्प जानेवारी-2015
चा लोकराज्य अंक प्रकाशित
लोकराज्य अंकाचे वार्षीक वर्गणीदार होण्यासाठी आवाहन
चाळीसगांव,दिनांक 17:- नव्या वर्षात महाराष्ट्राला अधिक समृध्द आणि
गौरवशाली करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
लोकराज्यच्या या अंकात विविध विभागांच्या मंत्रीमहोदयांनी केलेल्या नवीन वर्षाच्या
संकल्पावरील लेखांना समाविष्ट करण्यात आले असून वेगवेगळया क्षेत्रात महाराष्ट्राला
नव्या उंचीवर नेऊन जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्याचा संकल्प आणि निर्धार
यामधून अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणा-या या
मासिकाचे वार्षीक वर्गणीदार होण्यासाठी आता चाळीसगावातही सोय उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. चाळीसगाव येथील उप माहिती कार्यालय, छाया निवास स्टेट बँक इमारत पहिला
मजला भडगाव रोड चाळीसगाव येथे या महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकाचे वार्षीक
वर्गणीदार होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन प्र.माहिती सहाय्यक मनोहर पाटील
यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment