मुंबई,दि.१४: मुंबईत वाहनांचीसंख्या वाढत असूनपार्किंगसाठीच्या जागेत पुरेशी वाढ
करण्यासह एकात्मिक वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेने मोकळ्या
जागांबाबतच्या सध्याच्या धोरणाचे कोणतेही उल्लंघन न करता वाहनतळ उभारण्याबाबतच्या शक्यतेचा
विचार करावा, तसेच पर्यायी जागांचा शोधही घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज येथे केली.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीच्या समस्येचा आढावा घेतला. बैठकीला
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, परिवहन विभागाचे अपरमुख्य सचिव गौतम चटर्जी, मुंबई
पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, एमएमआरडीएचे
आयुक्त यू. पी.एस मदान, गृह विभागाचे सचिव विनित अग्रवाल, बेस्टचे महाव्यवस्थापक
जगदीश पाटील, परिवहन आयुक्त महेश झगडे, ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे, मुंबई
शहराचे सह पोलीस आयुक्त डॉ. बी.के
उपाध्याय आदी उपस्थित होते. बैठकीला माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर विशेष
निमंत्रित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
करून घेण्यात येईल. मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचा सुरक्षेसह
वाहतूक नियंत्रणासाठीही उपयोग होईल. तसेच मुंबई शहरातील महत्वाच्या पाँईटवर विशेष कॅमेरे
बसविण्यात येतील. त्यामुळे सिग्नल तोडणे, स्टॉप लाईनच्या पुढे वाहने उभे करणे,
वाहन बेदरकारपणे चालवणे आदी गुन्हे करणाऱ्या चालकांवर कारवाई करणे शक्य होईल.
रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थित आणि सुरक्षित होण्यासाठी कायद्याच्या प्रभावी
अंमलबजावणी सोबतच लोकांमध्ये जनजागृतीचीही गरज आहे. कायदा आणि लोकांचा सकारात्मक प्रतिसाद यातून राज्यात एक उत्तम वाहन संस्कृती रुजवणे शक्य असून
त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर सहकार्याने हे काम हाती घ्यावे, अशी सूचना
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शासन या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न
करत असून उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम
करण्यावरही भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनातर्फे वाहतूक सुरक्षितता कायद्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांनुसार
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही देखील
नव्या दुरूस्तीत समाविष्ट झाली आहे.
मुंबईतील टॅक्सी आणि रिक्शाच्या पार्किंगसाठी पालिकेच्या पार्किंग धोरणात विचार
करावा, अशी मागणी श्री. चटर्जी यांनी केली. मुंबई महापालिकेतर्फे शहरात हाती
घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात एरियाट्रॅफीक
कंट्रोल सिस्टीम, मुंबईतील रस्त्यांचा मास्टर प्लान, कोस्टल रोड प्रकल्प, गोरेगाव-
मुलुंड लिंक रोड, ट्रक टर्मिनलची उभारणी, बोरिवली ते कांदिवलीच्या दरम्यान एसव्ही
आणि लिंक रोडला डीपीप्लान मध्ये पर्यायी समांतर व्यवस्थेची उभारणी, कुर्ला
रेल्वेस्टेशन ट्रॅफिक सुधार कार्यक्रम, रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती,
कॉम्प्रेहेन्सीव्ह मोबॅलिटी प्लान, पादचारी प्रथम संकल्पनेची अंमलबजावणी आणि वाहनतळ
धोरण यांचा समावेश होता.
मुंबईत १९९१ मध्ये वाहनांची संख्या ६.२८ लाख इतकी होती. ती सप्टेंबर २०१४ अखेर
२४.७५ लाख एवढी झाली आहे. मुंबईतील नोंदणीकृत वाहनांच्या व्यतिरिक्त
बृहन्मुंबईच्या हद्दीमध्ये दररोज १.५ लाख वाहने प्रवेश करतात. मोठ्या प्रमाणात येणारी वाहने आणि अपुऱ्या
पार्किंग सुविधा यामुळे शहरातील जागा आणि रस्त्यांवरील ताण वाढत आहे. मुंबई शहरात
किमान ५० हजार वाहनतळ सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.
मुंबई प्रमाणेच ठाणे शहराची वाहतूक समस्याही मोठी आहे. वडाळा- घाटकोपर
-मुलूंड- कासारवडवली हा मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने
मंजूर केला आहे. ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यात ४० मीटर रुंद हाय कॅपासिटी मास ट्रान्झिट रुट
प्रस्तावित आहे. या रस्त्याचा काही भाग हा मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. याबाबतही
मुंबई महापालिकेच्या मदतीने काम सुरु असल्याचे आजच्या बैठकीत सांगण्यात आले.
विकास आरखड्यात ठाणे आणि मुलुंड दरम्यान एक नवीन रेल्वे स्टेशन सुचविण्यात आले
आहे. रेल्वे विभागाच्या मागणीनुसार याबाबतच्या तांत्रिक वैधतेच्या पडताळणीसाठी महापालिके
तर्फे तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई तसेच जवाहरलाल नेहरू बंदर येथून उत्तर
भारताकडे जाणारी वाहतूक नागरी वस्ती असलेल्या घोडबंदर रस्त्यावरून होते. ही वाहतूक
इतर मार्गाने वळवण्यासाठी ठाणे शहराबाहेरील मार्गाची आखणीकरून मिळावी, अशी मागणी
करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
संजय मांजरेकर यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली
पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांनी यावेळी ”मुंबई” ही
छोटी चित्रफित सादर केली. “कमऑन
मुंबई... लेटअस बिहेव्ह अवरसेल्फ” असं म्हणत त्यांनी मुंबईकरांना वाहतुक नियमांचे
पालन करण्याचे आवाहन केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment