Sunday, 18 January 2015

टोकरे कोळी समाजाच्या सवलतींसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु : ना. एकनाथराव खडसे यांची ग्वाही


टोकरे कोळी समाजाच्या सवलतींसाठी
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु
                                          -ना. एकनाथराव खडसे यांची ग्वाही
जळगाव, दि. 18- टोकरे कोळी समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असून या समाजाला सवलती मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे यांनी दिली.
जळगाव शहरात आयोजित आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या प्रबोधन मेळाव्यात ना. श्री. खडसे बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, जळगावच्या महापौर सौ. राखीताई सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रयागताई कोळी, आमदार सर्वश्री गुलाबराव पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, सौ. भारती सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. खडसे म्हणाले की, टोकरे कोळी समाजाच्या मागण्यांसाठी विशेषतः आरक्षणाच्या संदर्भात १९९१ पासून विधीमंडळात आपण वारंवार पाठपुरावा केला आहे.  टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आदी उपजातींना आरक्षण देण्याच्या विषयावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता टोकरे कोळी समाजाचा तिस-या सूचीत समावेश करुन सवलती देण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही ना. खडसे यांनी सांगितले. या विषयासंदर्भात प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून हा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील ना. खडसे यांनी यावेळी दिली. सामाजिक न्याय किंवा आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून जातवैधता प्रमाणपत्रांच्यासंदर्भात जिल्हास्तरावर निर्णय घेण्याकरिता जळगाव येथे समिती कार्यरत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ना. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले की, आदिवासी बांधवांच्या हक्कावर गदा येणार नाही आणि कोळी समाजबांधवांवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका आहे आणि त्यादृष्टीने कार्यवाही देखील सुरु आहे. कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही ना. महाजन यांनी यावेळी दिले.
प्रारंभी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने पालकमंत्री ना. खडसे आणि जलसंपदामंत्री ना. महाजन यांचा भव्य  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
* * * * * * * * * * * * *
६० व्या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ
विजेतेपदाचे ध्येय ठेवूनच नेहमी खेळा : ना. एकनाथराव खडसे
जळगाव, दि. 18- क्रीडा क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून खेळाडूंनी हे बदल आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. विजेतेपद  मिळविण्याचे ध्येय ठेवूनच नेहमी खेळत रहा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी केले.
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच ॲम्युचर टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६० व्या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ना. एकनाथराव खडसे बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जळगावच्या महापौर श्रीमती राखीताई सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती प्रयागताई कोळी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. गणपतराव पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. खडसे यांनी आपल्या राज्याचे नाव उज्वल करण्यासाठी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करण्याचे आवाहनही खेळाडूंना केले. जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी देशाच्या विविध भागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करुन आपल्या खेळाच्या प्रदर्शनातून जळगावकरांना खूप शिकायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री ना. खडसे आणि जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या हस्ते आकाशात रंगीत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक जगन्नाथ आधाने यांनी तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी मानले.
२० जानेवारीपर्यंत चालणा-या या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, तेलंगणा, गोवा,केरळ, झारखंड या ९ राज्यातील दीडशे खेळाडू सहभागी झाले आहेत.
* * * * * * * * * * * * *
रस्ता सुरक्षा अभियाननिमित्त चित्र व चलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
वाहतूक नियमांचे पालन यातच खरी सुरक्षितता : पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे
जळगाव, दि.१८-वेगवान वाहने मानवी जीवनाच्या विकास-प्रगतीसाठी आवश्यक आहे. या संशोधनातून उपलब्ध झालेल्या सुविधांचा वापर योग्यपद्धतीने करुन आपले जीवन सुखकर करायचे असते. त्यामुळे वाहने चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करणे यातच खरी सुरक्षितता आहे.त्यासाठी रहदारीच्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे, असे आवाहन राज्याचे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क,  पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त  जनजागृतीसाठी आयोजित चित्र व चलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ना. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, महापौर राखीताई सोनवणे, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, गुलाबराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक पांडे, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे आदी उपस्थित होते.
            यावेळी ना. खडसे म्हणाले की, देशात दरवर्षी एक लाखाहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात.एका अपघातामुळे कुटूंबच उद्ध्वस्त होतात. दरवर्षी वाहनांची संख्या वाढते आहे.अधिक वेगवान वाहने बाजारात येऊ लागली आहेत.अशा परिस्थितीत अपघातांचे प्रमाण कमी करणे हे समाजासमोर मोठे आव्हान आहे. वाहनांना नंबरप्लेट न लावणे ही फॅशन किंवा प्रतिष्ठा मानली जाते. अशाप्रकारे नियमभंग करणा-यांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-यांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करा, पण कायदा मोडण्याची प्रवृत्ती वाढता कामा नये. मद्यपानामुळेही अनेक अपघात होतात. अपघातग्रस्तांना दुर्घटनेनंतर इतरांनी तातडीने मदत केली पाहिजे.  माणूसकी ही निघून जाण्यात नाही तर थांबून मदत करण्यात आहे. पोलीस नंतर चौकशी करतात ही भिती निरर्थक आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांना जेव्हा सुशिक्षित माणसेच  विरोध करतात, तेव्हा वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुरक्षित राहण्याची जबाबदारी ही सा-यांचीच आहे, त्यातला वाटा प्रत्येकाने उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी काळात जळगाव जिल्ह्यात रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात होत असलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सा-यांनी मिळून प्रयत्न करु या,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ना. गिरीष महाजन म्हणाले की, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर हे अपघाताचे मोठे कारण आहे. वाहन चालवितांना वाहनचालकाने आपल्या घरी असणा-या लोकांचा विचार करावा. वाहनांची नोंदणी करणे, परवाना असणे अशा कायदेशीर बाबींची पुर्तता आवश्यक आहे. दुर्देवाने अपघात झालाही तर किमान आर्थिक नुकसान भरपाई त्यामुळे मिळते. रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक नियमांची माहिती सा-यांना होते आहे. शालेय विद्यार्थ्यांना ती अवश्य द्या, तेच उद्याचे वाहन चालक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, आमदार गुलाबराव पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी केले. अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली. याप्रसंगी रस्ते सुरक्षा जनजागृती दिनदर्शिका व चित्रफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद केदारे यांनी तर आभारप्रदर्शन वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, वाहतूक क्षेत्रातील संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
* * * * * * * * * * * * *
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे
अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांचा जळगांव दौरा कार्यक्रम
      जळगाव, दि. 18 – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा.श्री.मोहम्मद हुसेन खान  हे कालपासून जळगाव  जिल्हा दौ-यावर  असून दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी ते पाचोरा शहराला भेट देणार आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे
दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी सकाळी 08:00 वाजता मुक्ताईनगर येथून पाचोराकडे प्रयाण, सकाळी 09:00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी 10:00 वाजता अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट व तक्रारी स्विकारने, दुपारी 12:00 वाजता नुकसानग्रस्त घटना स्थळांना भेट, दुपारी 02:00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व इतर संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक (कायदा व सुव्यवस्थेबाबत), नंतर जळगावकडे रवाना दुपारी पत्रकार परिषद नंतर मुक्ताईनगरकडे प्रयाण, मुक्ताईनगर  येथे राखीव व मुक्काम
* * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment