Sunday, 25 January 2015

नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा:आमदार उन्मेश पाटील


नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा !
:आमदार उन्मेश पाटील
          चाळीसगांव,दिनांक 25:- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असे महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यांची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात केले.
                     यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य सतिष पाटे, नरेंद्र जैन, प्रभाकर चौधरी, राजेंद्र चौधरी, शरद पाटील आदी उपस्थित होते.
                     यावेळी प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी 017-चाळीसगाव मतदार संघातील दिनांक 21 जानेवारी, 2015 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार एकूण मतदार 321250 असून पैकी 171987 इतके पुरुष मतदार तर 149263 इतके स्त्री मतदार असल्याची माहिती दिली. या मतदारांपैकी एकूण 311394 इतके मतदार ओळखपत्रधारक असल्याचे सांगूण ते म्हणाले की, आपले मत हा आपला हक्क व अधिकार आहे. या बाबतीत जागरूक राहून मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून त्याचे पाचवे वर्ष आज साजरा करतांना मनस्वी आनंद होत आहे या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.
                     यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले  उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थित मतदार व नवमतदारांना निवडणूकांचे पावित्र्य व निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली. आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळख पत्राचे वाटप करण्यात आले तर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवडणूक शाखेतील कैलास सैंदाणे यांच्यासह तालुक्यातील सर्व  बीएलओ, नवमतदार, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment