मुंबई, दि. 29 : दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र
पोलीस आणि संशोधन व सुधारणा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्य पोलीस मुख्यालयात
आयोजित केलेल्या दहशतवादाचा सामना करण्याबाबतच्या दोन दिवसीय राष्ट्रीय
परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री आर.आर.पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस
महासंचालक संजीव दयाळ, तसेच संशोधन आणि सुधारणा विभागाचे पोलीस महासंचालक कुलदीप
शर्मा उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दहशतवादाचे स्वरुप व्यापक बनले
आहे. शेजारील राष्ट्राकडून पसरवला जाणारा दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, दहशतवादासाठी
होणारा सोशल मिडीयांचा वापर यांच्या मदतीने काही विघातक शक्ती लोकशाहीवर आघात
करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीवरील हा हल्ला रोखण्यासाठी सक्षम अशी व्यूहरचना
आखणे गरजेचे आहे. त्यासाठी या परिसंवादाचा निश्चितच उपयोग होईल. प्रत्येक देशाकडे
दहशतवादाबाबत स्वतंत्र असे कायदे आहेत. आपल्याही देशात ‘पोटा’ सारखे
कायदे करण्यात आले आहेत. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच अत्याधुनिक हत्यारांची खरेदी यावर भर देण्याची
आवश्यकता आहे. तसेच रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक अशा महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज
असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय
परिसंवादासाठी देशभरातून 60 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला असून एकत्रितपणे
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल असे सांगून गृहमंत्री
आर. आर. पाटील म्हणाले, या परिसंवादाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,
गुप्तचर यंत्रणांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, सुसंवाद, परस्परातील समन्वय व सहकार्य
वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दहशतवादाचा मुकाबला, तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्था बळकट
करण्यासाठी फोर्सवनची स्थापना करण्यात आली. तसेच 55 हजार पोलिसांची भरती करण्यात
आली असून आगामी पाच वर्षात आणखी 63 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचेही श्री.
पाटील यांनी सांगितले.
दहशतवाद सुरक्षा
व्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या परिसंवादाच्या माध्यमातून त्याचा
मुकाबला करण्यासाठी अधिकाधिक उपाय सुचवले जातील, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री सतेज
पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment