जळगाव, दि. १९ जून 2025 (जिमाका) :
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सर्व १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्यासाठी एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण ९२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
राज्यात अलीकडेच बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून नविन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचे कार्य प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत बाजार समितीचा कारभार, कलम ३७ अंतर्गत बाजार फीचा उपयोग, बाजार समिती गुणांकन, शासकीय योजनांची माहिती, कृषी उत्पादने व नियमन, तसेच खाजगी क्षेत्रातील आव्हाने व उपाय यावर तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली.
या उपक्रमामागे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची संकल्पना असून, कार्यकारी संचालक, कृषी पणन मंडळ आणि संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या वेळी कृषी पणन मंडळ नाशिक विभागाचे उपसरव्यवस्थापक शिवपुरी पुरी यांनी बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीसाठी विविध मार्गांचा शोध घेण्याचे आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे घेण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांची शंका समाधानही केले.
कार्यशाळेस जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील विशाल ठाकरे, डीएमआय कार्यालयाचे बुद्धी विलास, कृषी पणन मंडळ कार्यालयाचे बहादुर देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर वाघ, दीपक साळुंखे, नितीन शेवाळे आणि नारायण टापसे यांचे विशेष योगदान लाभले.
No comments:
Post a Comment