Monday, 16 June 2025

जळगाव जिल्ह्यात १५ जून ते ३० जून प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविणार

जळगाव दि. 16 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा) :

आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” अंतर्गत जळगाव जिल्ह्यात १५ जून ते ३० जून या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ११२ आदिवासी बहुल गावांमध्ये शिबिरे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियानाचा उद्देश आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट गावपातळीवर पोहोचवणे हा असून, जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापण्यात आल्या आहेत. या माध्यमातून आरोग्य, पोषण, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी १७ विभागांमार्फत सेवा देण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत चोपडा-२७, यावल-१८, रावेर-१८, मुक्ताईनगर-०६, भुसावळ-०४, जळगाव-१६, एरंडोल-०३, धरणगाव-०३, अमळनेर-०५, चाळीसगाव-०२, पाचोरा-०१ व जामनेर-०९ अशा ११२ गावांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
शिबिरांमधून नागरिकांना खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत:
▪️आधारकार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी
▪️जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड तयार करणे
▪️पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड व जनधन खाते उघडणी
▪️ई-सेवा सुविधा, सिकलसेल आजारावरील जनजागृती
▪️विविध विभागांमार्फत लाभ व आवश्यक कागदपत्रांचे वाटप
यासोबतच, आगामी पाच वर्षांत पक्के रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा, वीज, मोबाईल मेडिकल युनिट, उज्वला गॅस, अंगणवाडी, पोषण, कौशल्यविकास, कृषी, मत्स्यव्यवसाय, पर्यटनविकास, शासकीय निवासी शाळा व वसतीगृहांची उभारणी यांवर भर देण्यात येणार आहे.
या अभियानात सिकलसेल डे (ता. १९ जून) निमित्त आरोग्य शिबिरे तर आंतरराष्ट्रीय योग दिन (ता. २१ जून) निमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये योगविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. मिनल करनवाल (भा.प्र.से.) यांनी दिली.
या अभियानामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केला. आदिवासी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, स्वयंसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment