जळगाव, दि. 24 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी व बारावी) जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्या विद्यार्थ्यांची जून-जुलै २०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली, त्यात त्यांनी परीक्षेच्या नियोजनाचा आढावा घेतला.
या बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी परीक्षा केंद्रांची संख्या, विद्यार्थी संख्येचा आढावा तसेच कायदा-सुव्यवस्था व कॉपीमुक्त अभियानाच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यंदा इयत्ता दहावीच्या १४ परीक्षा केंद्रांवर ६९८ विद्यार्थी परीक्षा देणार असून, ८ परिरक्षक केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इयत्ता बारावीच्या ८ परीक्षा केंद्रांवर ५०९ विद्यार्थी उपस्थित राहणार असून, ८ परिरक्षक केंद्रे कार्यरत असतील. अशा प्रकारे एकूण २२ परीक्षा केंद्रांवर १६ परिरक्षक केंद्रांच्या माध्यमातून १,२०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यावेळी कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवणे, तसेच कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन, पोलीस व शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, आत्मविश्वासाने व संयमाने परीक्षा द्यावी असे आवाहनही केले आहे.
No comments:
Post a Comment