Friday, 27 June 2025

सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर १८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

            पुणे,दि.२७ :- राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  सहकारी संस्थांनी १८ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक  कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.

            या पुरस्कारांतर्गत  ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१ , ‘सहकार भूषण’- २१ तसेच  ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

            पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्थाप्रकारनिहाय  नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक,व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी  प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.

            शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना

जळगाव, दि. २७ जून (जिमाका): शेतकरी व इतर कर्जदार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या "महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४" अंतर्गत राज्यातील सर्व परवानाधारक सावकारांनी आपल्या व्यवसाय स्थळी व्याजदरासंबंधी स्पष्ट माहिती असलेला फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या फलकावर सावकाराचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना जारी करणाऱ्या कार्यालयाचे नाव व विविध प्रकारच्या कर्जांवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांची माहिती देणे आवश्यक आहे. हा फलक व्यावसायिक ठिकाणाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने केली आहे.
शासनाने सावकारांसाठी व्याजदराची मर्यादा ठरवून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर जास्तीत जास्त ९ टक्के व विनातारण कर्जावर १२ टक्के प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी १५ टक्के, तर तारण कर्जासाठी १८ टक्के अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे. हे नियम सर्व परवानाधारक सावकारांसाठी बंधनकारक असून, अशा फलकाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.

"शासन आपल्यादारी – समाधान आपल्या अंगणात!"





📍छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – वाघळी
🙏🏻 आज दि. 27 जून 2025 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, वाघळी येथे चाळीसगाव विधानसभा क्षेत्रात "महाराजस्व समाधान शिबिर" उत्साहात पार पडले.
🪑 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. श्री. मंगेश चव्हाण साहेब उपस्थित होते.
🎤 उद्घाटनानंतर आमदार साहेबांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन अधिकाऱ्यांना लोकाभिमुख सेवा द्यावी असे मार्गदर्शन केले.
👥 हजारो नागरिकांना उद्देशून बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,
“समाधान शिबिरे ही फक्त सेवा वितरण नव्हे, तर शासनाने लोकांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा एक आदर्श उपक्रम आहे.”
🟢 या शिबिरात विविध विभागांनी मिळून एकूण 1776 लाभ थेट नागरिकांना वितरित केले.

सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट संस्थांना सन 2023-24 मधील सहकार पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 जळगाव दि. २७ जून (जिमाका): सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा सन्मान करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पात्र संस्थांची निवड करण्यासाठी कार्यपद्धती आणि निकष निश्चित केले असून, जिल्ह्यातील पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या पुरस्कारासाठी सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव दिनांक ०२ जुलै २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत सादर करावेत. प्रस्ताव संस्थेच्या मुख्यालयाच्या तालुक्यातील संबंधित उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.
सहकारी संस्था जळगावचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Thursday, 26 June 2025

यशकथा






विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा....!!

शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान – बोदवडच्या राजेंद्र कांडेलकर यांचा जैविक उत्पादनांचा यशस्वी प्रयोग
महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करत स्वतःचा स्वतंत्र ब्रँड उभा केला आहे. पारंपरिक रासायनिक शेतीपासून दूर जाऊन पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शाश्वत शेतीची दिशा त्यांनी स्वीकारली. शासनाच्या कृषी विभागाच्या सहाय्याने व मार्गदर्शनातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक तयार करत एक छोटासा उद्योग उभा केला, जो आज हजारो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. सध्या काही तांत्रिक कारणासाठी लोकांना देण्याचे शक्य होत नाही. पण लवकरच पुन्हा जैविक उत्पादनांची गरज ओळखून, सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या शेतात मात्र ते पूर्णपणे सेंद्रिय अन्न पिकवतात. यासाठी शासनाने त्यांचा वेळोवेळी गौरव केला आहे. ते सेंद्रिय शेतीचे जिल्ह्याचे दूत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामावर प्रकाश टाकणारा व सेंद्रिय शेती कशी करावी यावर प्रकाश टाकणारा हा लेख....!!

सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक शेतीची दिशा नसून, भविष्यातील शाश्वत अन्नसुरक्षेचा मूलमंत्र आहे. याच मार्गावर गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी सेंद्रिय शेतीला व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोन दिला आहे. त्यांनी रसायनमुक्त उत्पादनांचा प्रसार करताना पर्यावरणाच्या रक्षणालाही प्राधान्य दिले आहे.

सेंद्रिय शेतीकडे वळण्यामागील प्रेरणा
राजेंद्र कांडेलकर यांनी पारंपरिक रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग २५ वर्षांपूर्वीच स्वीकारला. सुरुवातीला बाजारातून विकत घेतलेली कीटकनाशके व तणनाशके निकृष्ट दर्जाची असून पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी अनुभवलं. रासायनिक पदार्थांचा अतिरेक केवळ उत्पादनाचे नुकसान करत नव्हता, तर मातीची सुपीकता, जलस्रोत आणि पर्यावरणही बाधित होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी नैसर्गिक उपायांचा शोध घेतला.

प्रशिक्षण आणि जैविक उत्पादननिर्मितीची सुरुवात
श्री. कांडेलकर यांनी नैनीताल आणि पंजाब येथे जाऊन सेंद्रिय शेती व जैविक उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी ‘जय भोले नीम शक्ती अॅग्रो’ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक – तेल, अर्क आणि पावडर तयार करण्यास सुरुवात केली. या उत्पादनांमध्ये कोणतेही रासायनिक घटक नसून त्याचा पिकांवर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

निंबोळी उत्पादने: शाश्वत कीटकनाशकांचा पर्याय
श्री. कांडेलकर दरवर्षी सुमारे १०० टन निंबोळी खरेदी करतात आणि त्याचे साठवण करून उत्पादन तयार करतात. त्यांच्या निर्मित निंबोळी अर्कात ३५% निंबोळीचा अंश असतो, जो बाजारातील अन्य अर्कांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो. हे अर्क ८० रुपये प्रति लिटर दराने विकले जातात. उत्पादन ५, ३५ आणि ५० लिटरच्या प्लास्टिक डब्यांमध्ये पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवले जाते.

उत्पादन प्रक्रिया:
२०० लिटर क्षमतेच्या टाकीत निंबोळी, बुरशीनाशक व उपयुक्त सूक्ष्मजीव एकत्र करून २१ दिवस नैसर्गिक किण्वन प्रक्रिया राबवली जाते. तयार अर्क फवारणीसाठी वापरण्यात येतो. याशिवाय ते जैविक गांडूळ खत, कंपोस्ट खत, व सुकवलेली निंबोळी पावडर देखील तयार करतात, जी फळबागांमध्ये खतासोबत मिसळून वापरली जाते.

लघुउद्योगाचा विकास आणि रोजगारनिर्मिती
फक्त ४ ते ५ लाख रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक करून त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आज या यंत्रणेवर ७ ते ८ मजुरांचे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यांचे उत्पादन ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांवर फवारणीसाठी वापरले जाते, जे पर्यावरणपूरक, कार्यक्षम व दीर्घकाळ टिकणारे आहे.

व्यापारीकरण आणि बाजारव्यवस्था
सुरुवातीला राजेंद्र कांडेलकर यांनी आपले उत्पादन स्थानिक पातळीवर विकण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्थानिक कृषी कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेऊन स्थानिक कंपन्यांनी त्यांना बाहेरील कंपन्यांच्या माध्यमातून विक्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी कृषी प्रदर्शनात भाग घेणे, पॅम्पलेट्स, पोस्टर लावणे आणि प्रत्यक्ष संवाद साधणे यावर भर दिला.

आज त्यांच्या उत्पादनांचा वापर नाशिक, अकोला, बुलढाणा ते मध्यप्रदेश या विस्तृत परिसरातील सुमारे दीड ते दोन लाख शेतकरी करत आहेत. केळी, द्राक्ष, संत्री, हळद अशा उच्चमूल्य पिकांमध्ये या जैविक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

शासनाची मदत आणि गौरव
शेती व जैविक उत्पादने यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा कृषी पुरस्काराने सन्मान केला आहे. शासनातर्फे त्यांना विविध योजना, अनुदान व बाजार सल्ला यांचे सहकार्य देखील लाभले आहे.

जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार
राजेंद्र कांडेलकर यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ते इतर शेतकऱ्यांनाही जैविक शेतीसाठी प्रेरित करतात. ते स्वतः केळी व मका यांसारख्या पिकांमध्ये जैविक पद्धतीने शेती करत असून कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतात. या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक प्रेरणादायी यशोगाथा
आजच्या काळात जेव्हा रासायनिक शेतीमुळे आरोग्य व पर्यावरणाचे संकट निर्माण झाले आहे, तेव्हा राजेंद्र कांडेलकर यांचा सेंद्रिय शेतीचा प्रवास ही एक आशेची किरणं देणारी यशोगाथा आहे. त्यांनी शाश्वत शेती, पर्यावरण रक्षण आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकता यांचा सुरेख संगम साधला आहे.

अशा शेतकऱ्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक स्तरावर करावा, जेणेकरून इतर शेतकरीही सेंद्रिय शेतीच्या दिशेने प्रेरित होतील आणि शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव.

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम



जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा ) :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नंदा रायते, उपयुक्त राकेश महाजन, राजेंद्र कांबळे, नाट्य कलावंत शंभु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र, वसतिगृह प्रवेश पत्र यांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी व लाभांचे वाटप करण्यात आले.
आमदार भोळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सामाजिक न्याय धोरण हे गोरगरीबांना न्याय देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. शाहू महाराजांनी समाजासमोर आदर्श राज्यकर्त्याचे उदाहरण ठेवले. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. याच भावनेने आपण त्यांच्या जयंती निमित्त एकत्र यावे व ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शाहू महाराज हे प्रशासकीय सुधारणांचे जनक होते. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुधारणा यावर त्यांचा भर होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “जातीमुक्त समाज” या स्वप्नाची पायाभरणी शाहू महाराजांनी केली. त्यांनी सांगितले की, मानसिक शक्ती ही यशाचा मुख्य घटक असून व्यसनमुक्त जीवन ही यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेऊन त्यातून शिकण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खासदार मा. स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काढण्यात आलेल्या समता दिंडीने झाली. समाजिक समतेचा संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समारोपाला आली.या वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर नाट्य कलावंत शंभु पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तर विनोद ढगे यांच्या चमुने विविध पथनाट्य या वेळी सादर केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
या सामाजिक न्याय दिनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Wednesday, 25 June 2025

समतेचे प्रेरणास्थान राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

 


संवाद वारी - आळंदी पालखी मार्गावरील महिला वारकऱ्यांनी प्रदर्शनातून जाणून घेतली शासनाच्या विविध योजनांची माहिती

 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

 


राजस्थानचे जन स्वास्थ्य अभियांत्रिकी व भू-जल विभागाचे मंत्री कन्हैयालाल यांचा जळगाव दौरा

 जळगाव, दि. २६ जून (जिमाका वृत्तसेवा) :

राजस्थान राज्याचे जन स्वास्थ्य अभियांत्रिकी व भू-जल विभागाचे मंत्री श्री. कन्हैयालाल यांचा आज दिनांक २६ जून २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा पुढील प्रमाणे.

सकाळी १२.३० वाजता सर्किट हाऊस, मांडव (मध्यप्रदेश) येथून प्रयाण संध्याकाळी ५.३० वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव (महाराष्ट्र) येथे आगमन.

महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्याशी शिष्टाचार भेट. या भेटीत दोन्ही राज्यांतील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात चर्चा. रात्रीचा मुक्काम अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे.

संवादवारी - देहू पालखी मार्गावरील महिला वारकऱ्यांनी प्रदर्शनातून जाणून घेतली शासनाच्या विविध योजनांची माहिती

 


#राजर्षीछत्रपतीशाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
























जळगाव, दि. २५ जून (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे "आणीबाणी @५०" हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि त्यावरील मांडणीचे कौतुक केले.
*प्राचीन ते वर्तमान – लोकशाहीचा प्रवास*
या विशेष प्रदर्शनात भारतातील प्राचीन लोकशाही संकल्पनांपासून ते १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीपर्यंतचा व त्यानंतरचा प्रवास माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. महाजनपद काळातील लोकसहभाग, बुद्धकालीन राजनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, महात्मा बसवेश्वर यांचा अनुभव मंडप, ईशान्य भारतातील स्वशासन, भारताचे स्वातंत्र्य, संविधान, प्रजासत्ताक भारत आणि त्यानंतरची आणीबाणीतील राजकीय-समाजपरिवर्तन घडामोडी याचे यथार्थ दर्शन या माध्यमातून घडवण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे बदल घडले, त्या काळात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्र कात्रणे, तसेच आणीबाणीत सहभागी व्यक्तींची नावे व योगदान यांचा समावेश आहे.
*दस्ताऐवज आणि दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर*
या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालक्रमानुसार मांडणी केलेले घटनाक्रम, त्या काळातील राजकीय निर्णय आणि त्याचे लोकशाहीवर झालेले परिणाम यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे माहिती फलक. त्याशिवाय संविधानिक मूल्ये, मुलभूत अधिकारांचे उल्लंघन, माध्यमांवरची नियंत्रणाची परिस्थिती, अटकसत्रे आणि सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरणही या प्रदर्शनात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.
*लोकसहभागासाठी खुले निमंत्रण*
या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.

आपल्या मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


आपल्या मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर