Sunday, 2 October 2016

भास्कराचार्य गणित नगरीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा : विभागीय आयुक्त एकनाथ डवले


भास्कराचार्य गणित नगरीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा
                                              : विभागीय आयुक्त एकनाथ डवले
       चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे भास्कराचार्यांच्या नावाने जागतिक दर्जाची गणित नगरी उभारण्यासाठी वनविभागासह शिक्षण व सार्वजानिक बांधकाम विभागांनी तांत्रीक बाबींचा सखोल अभ्यास करुन सर्वसमावेशक आराखडा व अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सुचना नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या.
            पाटणादेवी येथील भास्कराचार्य गणित नगरीच्या स्थळ निरीक्षणप्रसंगी वन विभागाच्या विश्रामगृहात आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, मुख्य वनसंरक्षक धुळे उदय आवसक (भा.व.से.), विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरगाबाद श्री.धामगे, सहाय्यक वन संरक्षक (वन्यजीव) औरंगाबाद श्री.जगत, उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, अधिक्षक अभियंता (सा.बा.) श्री.पांढरे, प्रांताधिकारी शरद भगवान पवार, तहसिलदार कैलास देवरे, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी पाटणा एल.एम.राठोड यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक बांधकाम, महावितरण, शिक्षणाधिकारी माध्यमिक आदि  विभागांचे प्रमुख या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            तालुक्याचे गतवैभव आणि वारसा जतन करण्याबरोबरच भास्कराचार्य गणित नगरी साकारतांना पर्यावरणाच्या पोषकतेसह वन्यजीवाला हानी पोहचणार नाही याची दक्षता घेऊन आराखडा तयार केल्यास या जागतिक दर्जाच्या गणित नगरीमुळे पर्यटन विकासालाही गती मिळू शकेल. यासाठी सर्व विभागप्रमुखांनी समन्वयासह सकारात्मक विचाराने सर्वसमावेशक आराखडा तयार करुन येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पाटणादेवी परिसराची ओळख गणिताची ज्ञानार्जन भूमी म्हणून व्हावी : आमदार उन्मेश पाटील
इ.स. 1114 ते 1185 या कालखंडात भास्कराचार्यांनी अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिती, खगोलशास्त्र, नक्षत्रशास्त्र आदि ज्ञानशाखांमध्ये बहुमोल योगदान दिले म्हणून त्यांना गणितसूर्य भास्कराचार्य असे संबोधले जाते. अशा या गणिती भास्कराचार्यांनी या परिसरात केलेल्या या महान कार्यामुळे पाटणादेवी परिसराची ओळख गणिताची ज्ञानार्जन भूमी म्हणून सर्वसामान्यांना व्हावी.  गणित विषयाची भिती नष्ट होऊन अद्यावत आणि जागतिक दर्जाच्या भास्कराचार्य मॅथ सिटीमुळे भावी पिढीला गणिताबद्दल आकर्षण, गणिताचे हसत-खेळत शिक्षण आणि संशोधन करण्यास मोठा हातभार लागू शकेल असा विश्वासही आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
            यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी तयार केलेल्या गणित नगरीवर आधारित चित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले तर प्रा.ल.वी.पाठक, राजेश ठोंबरे व पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी परिसराची सखोल माहिती आयुक्त श्री.डवले यांना सादर केली.
* * * * * * *

1 comment:

  1. जागतिक दर्जाची गणित नगरी उभारण्यासाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete