Friday, 13 December 2013

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राज्यातील आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांना दुर्धर व गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रीया मोफत करून घेणे शक्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2 जुलै  2012 पासून सुरू केली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या पहिल्याप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर या 8 जिल्ह्यांचा समावेश करण्याआला होता. राज्यातील शासकीय, खासगी अशी 120 रुग्णालये या योजनेत सहभागी झाली होती. आता 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातही ही योजना लागू करण्यात आली असून शासकीय रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार उपलब्ध असून आतापर्यंत 10 खाजगी रुग्णालयेही या योजनेत समाविष्ट झाली आहेत. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयात आतापर्यत 98 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी 25 लक्ष 39 हजार 500 रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे.  या योजनेची माहिती अधिकाधिक गरजूंपर्यत पोहचावी यासाठी  या योजनेची माहिती देत आहोत.
अशी आहे योजना
या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका) व दारिद्रयरेषेवरील पण वार्षिक उत्पन्न रु 1. लाखापेक्षा कमी (केशरी शिधापत्रिधारक) अशा कुटुंबाला रु. 1.50 लाखाच्या कमाल मर्यादेपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. 30 विशेषज्ञांच्या 971 प्रोसीजर्स व 121 पाठपुरावा सेवा यात समाविष्ट आहे.   
योजनेत उपचार असा मिळवा
  • लाभार्थीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात /  रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य मित्रास भेटावे. आजाराचे स्वरुप पाहून लाभार्थीची ओळख पटल्यावर आरोग्य मित्र संदर्भ चिठ्ठी देईल. ती घेऊन लाभार्थी वीमा कंपनीच्या निवडक रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकेल. याशिवाय वीमा कंपनीच्या निवडक रुग्णालयात गेल्यास तेथेही ओळख व आजार याची शहानिशा करुन उपचारासाठीची प्रक्रिया सुरु होईल. तसेच शिबिरातून संदर्भीत केलेले व अपघाताचे लाभार्थी थेट निवडक रुग्णालयात जाऊ शकतील.
  • वीमा कंपनीने निवडलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्र संदर्भ चिठ्ठी , हेल्थ कार्ड (शिधापत्र व आधार क्र.)  तपासून उपचारासाठी लाभार्थीला डॉक्टरांकडे पाठवेल.
  • वीमा कंपनीच्या रुग्णालयातील डॉक्टर्स तपासणी व चाचणी करुन रुग्णास दाखल करुन घेतील व प्री ऑथरायजेशन विनंती वीमा कंपनीस पाठवतील.
  • वीमा कंपनी व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे डॉक्टर्स संयुक्तपणे प्री ऑथरायजेशन विनंतीची छाननी करुन ती 971 प्रोसीजर्समध्ये बसत असल्यास ऑथरायजेशनला मान्यता ई मेलने पाठवितील.
  • वीमा कंपनीची रुग्णालये या मान्यता पत्रास अधिन राहून लाभार्थीला पूर्ण उपचार विनामुल्य करतील व बिल वीमा कंपनीकडे पाठवतील.
  • वीमा कंपनीची रुग्णालये बिल पाठविताना सर्व रुग्ण तपशील, रुग्णाचे अभिप्राय, निदानाचे व उपचाराचे रेकॉर्ड पाठवितील.
  • आलेल्या क्लेमची तपासणी वीमा कंपनी व सोसायटीच्या डॉक्टरांकडून संयुक्त पणे होईल. पात्र क्लेमची अदायगी 7 दिवसांत रुग्णालयात करण्यात येईल.
  • वीमा कंपनीने निवडलेली रुग्णालये, रुग्णायातून सुट्टी मिळाल्यावर मोफत पाठपुरावा, सल्लामसलत व निदान तसेच औषध पुरवतील.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला असून या योजनेची विमा कंपनीकडून अंमलबजावणी करण्यासाठी एमडी इंडीया या त्रयस्थ प्रशासकीय कंपनीची निवड करण्यात आली आहे.
योजनेतील समाविष्ट उपचार
 या योजनेंतर्गत 971 आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा उपचारांचा समावेश आहे. या योजनेत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, ह्दय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतडयाच्या शस्त्रक्रिया  व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मुत्रपिंड व मुत्रमार्ग शस्त्रक्रिया व उपचार, कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार, मेंदु व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार (वाहन अपघातावरील उपचार सोडून) कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या सांध्यांच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी उपचार यांचा लाभ मिळेल.
योजनेची वैशिष्टे
  सदर योजना ही संपूर्णत: कॅशलेस असून रुग्णाला या योजनेंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान आवश्यक औषधोपचार, शुश्रृषा व भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च यांच्या समावेश आहे. तसेच या योजनेंतर्गत रुग्णालयांतून मुक्त केल्यानंतर 10 दिवसांपर्यंतचा  फॉलोअप तसेच उपचारा दरम्यान काही गंभीर गुंतागुंत झाल्यास त्याचाही उपचार यामध्ये समाविष्ट आहे.
आरोग्य पत्र
 सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 'आरोग्य पत्राचे' वितरण पात्र लाभार्थी कुटूंबीयांना करण्यात येत आहे. हे आरोग्य पत्र मिळविण्यासाठी लाभार्थी कुटूंबायांनी कुटूंबातील सर्व सदस्यांचा समावेश असलेला 3x2 इंच आकाराच्या रंगीत फोटोच्या तीन प्रतीचे योगदान देणे आवश्यक आहे.
योजनेची अधिक माहिती www.jeevandayee.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तसेच 1800 233 2200 / 155388 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

-         मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव.


* * * * * * *

No comments:

Post a Comment