जळगाव जिल्ह्यात सिएमपी प्रणाली कार्यान्वित
शासनाकडून वेतन आणि अन्य देयके अदा करण्यासाठी परंपरागत धनादेशाचा वापर करणे बंद होत असून सीएमपी प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. जळगाव जिल्हाही त्यासाठी सज्ज झाला आहे. जळगाव जिल्हा मुख्यालयात सात आहरण संवितरण अधिका-यांकडे ही प्रणाली नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली . ही चाचणी यशस्वी झाली असून याद्वारे कर्मचा-यांची वेतने, भत्ते व त्रयस्थांची देयके (third party paymeant) अदा करण्याची कारवाई यशस्वी झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी शि.बा. नाईकवाडे यांनी दिली आहे.
काय आहे सिएमपी प्रणाली ?
C.M.P. ( Cash management product) शासनाकडून अदा होणारी विविध प्रकारची देयके अदा करण्यासाठी ही यंत्रणा भारतीय स्टेट बॅंकेने ही यंत्रणा विकसित केली असून त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय स्टेट बॅंक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार शासनाची सर्व देयके या प्रणालीद्वारे अदा केली जाणार आहेत. थोडक्यात आता पर्यंत वेतन व बिलांची प्रक्रिया ही आनलाईन होत होती मात्र प्रत्यक्ष वेतन व बिले अदा करतांना धनादेशाद्वारे केली जात होती. आता धनादेशाच्या प्रक्रियेचा टप्पा यातून वगळला जाणार असून ई-पेमेंट पद्धतीने अदा करावयाची रक्कम थेट संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
वर्षभरापासून प्रक्रिया
ही प्रणाली राबविण्याची प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शासन पातळीवर तयारी सुरु आहे. त्यासाठी 22 जानेवारी 2013, 28 जून 2013 व 17 सप्टेंबर 2013 असे तीन शासननिर्णय यासंदर्भात काढ़ण्यात आले आहेत. त्याद्वारे याप्रक्रियेविषयी शासनाच्या विविध विभागांना अवगत करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात यशस्वी चाचणी
जळगाव जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध विभागांचे 166
आहरण संवितरण अधिकारी आहेत. त्यापेकी नोव्हेंबर महिन्यात सात आहरण संवितरण अधिका-यांकडे ही प्रणाली राबविण्यात आली. त्यात जिल्हा कोषागार अधिकारी, सहायक संचालक स्थानिक निधी लेखा, जिल्हा सेनिक कल्याण अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी ( तापी खोरे), विशेष भूसंपादन अधिकारी (नं-1), वार्डन अनुसूचित जाती व जमातीच्या मुलींचे वसतीगृह या कार्यालयांनी आपल्याकडील 152
अदात्यांची (ज्यांना देयक अदा करावयाचे आहे अशा व्यक्ती, संस्था) नोंदणी करुन त्यांना देयके यशस्वीरित्या अदा केलीत. त्याआधी जुले महिन्यात जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिका-यांच्या कार्यालयातून तीन सेवा पुरवठादारांना त्यांनी केलेल्या कामाचे देयक अदा करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सज्जता
ही प्रणाली राबविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व विभागाच्या आहरण संवितरण अधिका-यांशी संपर्कात राहून सर्व सज्जता करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयातील 166 आहरण संवितरण अधिका-यांनी त्यांच्याकडील अदात्यांची माहिती आनलाईन नोंदणी केली आहे. 30
नोव्हेंबर 2013 ही त्यासाठी डेडलाईन ठरविण्यात आली होती. प्रत्येक आहरण संवितरण अधिका-यांना या प्रणालीवर काम करता यावे यासाठी युजर आयडी आणि पासवर्डही पूरविण्यात आले आहेत.
त्यामुळे आता येथून पुढे शासनाची देयके ( वेतन-भत्ते व बिले) ही या प्रणाली मार्फतच वितरीत होतील आणि रकमा थेट संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होतील. त्यामुळे आता सर्व आहरण संवितरण अधिका-यांनी त्यांची बिले ही सीएमपी प्रणालीद्वारेच सादर करावित असे आवाहन जिल्हा कोषागार अधिका-यांनी केले आहे.
यानंतर पुढ़ील टप्प्यात याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे, असेही जिल्हा कोषागार अधिका-यांनी सांगितले.
मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment