ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज
: आमदार राजीव
देशमुख
चाळीसगाव दिनांक 24 :- लोकशाही
अर्थव्यवस्थेत ग्राहकाचे महत्व मोठया प्रमाणावर आहे. परिस्थितीच्या अभ्यासाने
मतदान करुन समाजाच्या अर्थव्यवस्थेला वळण लावण्याचे सामर्थ्य या ग्राहकांकडे आहे.
लोकशाहीत प्रत्येक नागरीक एकाच वेळी मतदार आहे. आणि ग्राहक पण आहे. दुखावलेला
ग्राहक हा रागावलेला मतदार असतो. मतदाराची इच्छा, अधिकार दाबून जसे प्रजातंत्र उभे
राहणार नाही. त्याचप्रमाणे अर्थक्षेत्रात ग्राहकांचे अधिकार इच्छा दाबून सामाजिक
अर्थव्यवस्था उभी राहणार नाही आणि राहिली तरी ती कल्याणकारी असणार नाही. म्हणून
माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर
होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची
गरज असल्याचे प्रतिपादन आमदार राजीव देशमुख यांनी आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक
दिनाच्या कार्यक्रमात केले. महसूल प्रशासन व बी.पी.महाविद्यालय तसेच ग्राहक
पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय ग्राहक दिन-2013 या कार्यक्रमाचे
बी.पी.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे रोड चाळीसगांव येथे सकाळी 09:30
वाजता आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब
चंद्रात्रे, तर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजीव देशमुख होते, या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिता चौधरी, व्यापारी असोसिएशनचे प्रदीप
देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील, नगर परिषद शिक्षण
मंडळाचे सभापती रामचंद्र जाधव, प्रांताधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब
गाढवे, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.वाणी , रोटरीचे
रामभाऊ शिरोडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, पुरवठा विभागातील अधिकारी,
कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले
की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे असे महत्व असूनही त्याचे अस्तित्व ओळखण्यास कोणी
तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज होरपळून निघत आहे.
ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक व्यवहारात शोषण
होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती, त्याचे असंघटीत
स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा ग्राहक दुबळा
होत आहे. मी स्वत: व्यापारी वर्गात असूनही मी या विषयावर स्पष्टोक्ती देतांना मला
अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच मी धन्यता
मानतो. ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर, 1986 साली पारित झाला असून ग्राहकांना
न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली
आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून
येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे
त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे यांनी मार्गदर्शन करतांना
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, तरुण वर्गात माहितीची देवाण-घेवाण
करिता उपलब्ध असलेल्या सोशन नेटवर्कींगच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्याबाबत
जनजागृती केल्यास शासनाच्या या
कार्यक्रमाचा उद्देश नक्कीच सफल होईल असे सांगून ग्राहक सरंक्षण कायद्याविषयी
मार्गदर्शन केले.
त्याच बरोबर ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, तहसिलदार बाबासाहेब
गाढवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न
बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील यांची समायोजित भाषणे झाली. या कार्यक्रमाची
प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य जी.पी.वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन
प्राध्यापक गंगापुरकर यांनी केले.
No comments:
Post a Comment