Friday, 13 December 2013

जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी
तात्काळ दुरुस्तीचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

जळगाव, दि.13- जिल्हा क्रीडा संकूलातील जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार आवश्यक दुरुस्त्या तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हा क्रीडा संकूल समितीच्या बैठकीत दिले.
 जिल्हा क्रीडा संकूल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस  जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. जयकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,  कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, मनपाचे अपर आयुक्त साजीदखान पठाण, उपशिक्षण अधिकारी ए.एम. सोनार तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकूलातील जलतरण तलाव  कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी  सदर जलतरण तलावात दि. 13 जुले 2012 रोजी घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ॲक्वेटिक्स असोसिएशन व उपसंचालक क्रीडा , अमरावती विभाग या दोन वेगवेगळ्या समित्यांनी  सादर केलेल्या पाहणी अहवालावर त्यात सुचविण्यात आलेल्या उपायांवर चर्चा झाली.  त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या जलतरण तलावाची खोली कमी न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच समितीने सुचविलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना,  फिल्ट्रेशन प्लॅंट दुरुस्त करणे, ऑटो क्लोरिनेटर पॅनल बसविणे, जीवनरक्षा उपकरणे सज्ज ठेवणे आदी दुरुस्त्या तात्काळ करण्यात याव्या अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या कामांसाठी व क्रीडा संकूलात करावयाच्या अन्य सुविधांसाठी वास्तूरचनाकारांची सेवा उपलब्ध करावी व त्यासाठी दरपत्रके मागविण्यात यावे, अशा सुचनाही समितीने केल्या. क्रीडा संकूलात  सिंथेटीक लॉन टेनिस, कुस्तीचे मैदान, खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.


* * * * * * *

No comments:

Post a Comment